मार्च २०२० मध्ये कोविड-१९ पसरायला लागला आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अरुण गायकवाड यांच्या १० एकर रानात चिटपाखरू पण दिसेना. “जवारी काढली होती, हरभरं, कांदा तयार होता,” गायकवाडांच्या पत्नी, ४८ वर्षीय राजश्री सांगतात. उस्मानाबाद तालुक्यातल्या महाळिंगी गावी त्यांच्या घरी आम्ही बोलत होतो.
पण देशव्यापी टाळेबंदीमुळे बाजार बंद होते. “आम्हाला काही आमचा माल बाजार समितीत नेणं जमलं नाही. सगळा माल आमच्या नजरेसमोर नासून गेला,” राजश्री सांगतात.
५२ वर्षीय अरुण आणि राजश्रींनी १० क्विंटल ज्वारी, १० टन कांदा आणि १५ क्विंटल हरभरा काढला होता. ज्वारीला त्या वेळी क्विंटलमागे २,२५० रुपये किमान भाव मिळत होता. हरभऱ्याला ४,८०० आणि कांदा १,३०० प्रति क्विंटल भाव जाहीर झाला होता. निव्वळ मालाची किंमत मोजली तरी या दांपत्याचं २ लाख २७ हजार पाचशे रुपयांचं नुकसान झालं असावं. बी-बियाणं, खतं. औषधं आणि इतर निविष्ठावरचा खर्च तर यात धरलेलाच नाही.
शेतात केलेल्या कष्टांची तर मोजदादच नाही, राजश्री सांगतात. “कोविड पसराया लागला त्याच्या अदुगरच त्यांनी ट्रॅक्टर घेतला होता. महिन्याचा १५ हजारांचा हप्ता भरणं देखील मुश्किल झालतं. बँकेच्या नोटिसा यायला लागल्या होत्या.”
पण खरिपात (जुलै-ऑक्टोबर २०२०) हे नुकसान भरून निघेल अशी अरुण यांना आशा होती. कोविड-१९ ची पहिली लाट जुलैच्या सुमारास ओसरायला लागली होती आणि पेशंटची संख्याही कमी व्हायला लागली होती. संकट ओसरलं असंच त्यांना वाटत होतं. “लवकरच सगळं पहिल्यासारखं येईल असं वाटायलं होतं. पीडा टळली होती. सगळेच व्यवहार हळू हळू पूर्वपदावर यायला लागले होते,” अरुण यांचा जावई, ३० वर्षीय प्रदीप ढवळे सांगतो.
गेल्या वर्षी जून महिन्यात अरुण आणि राजश्री यांनी शेतात सोयाबीन पेरलं. पण ऑक्टोबर महिन्यात जेव्हा पीक काढणीला येतं तेव्हा आलेल्या अवकाळी पावसात उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी सगळी पिकं वाहून गेली. “आमचं अख्खं रान पाण्यात होतं,” राजश्री सांगतात. “काही देखील हाती लागलं नाही. किती नुकसान झालं ते काही तेव्हा यांनी सांगितलं नव्हतं. माझं टेन्शन वाढायला नको म्हणून बोलले नसतील.” आपलं कर्ज १० लाखाला पोचलंय असं एकदा अरुण म्हणाल्याचं त्यांना आठवतं. ४-५ वर्षांच्या काळात कर्जाचा बोजा इतका वाढला होता.







