राष्ट्रीय महामार्ग ३० वरून छत्तीसगडची राजधानी रायपूरहून बस्तरचं जिल्हा मुख्यालय असणाऱ्या जगदलपूरला जाता येतं. याच मार्गावर वाटेत कांकेर जिल्ह्यातलं चरमा नावाचं एक लहानसं गाव आहे. आणि चरमाच्या जरासा आधी एक छोटा घाटरस्ता आहे. काही आठवड्यांपूर्वी हाच घाट उतरून येत असता शेजारच्या जंगलांमधून डोक्यावर सरपणाच्या मोळ्या घेऊन येणारे १०-१५ गावकरी, बहुतांश स्त्रियाच, माझ्या नजरेस पडले.
हे सगळे जण हमरस्त्याच्या जवळच असणाऱ्या दोन गावातले होते – कांकेर जिल्ह्यातलं कोचवाही आणि बलौंद जिल्ह्यातलं माछांदूर. बहुतेक जण गोंड आदिवासी आहेत आणि सीमांत शेतकरी किंवा शेतमजूर म्हणून काम करतात.
अनुवादः मेधा काळे