तीन महिने झाले, ३० वर्षांपासून जिथे नोकरी केली त्या डेल्टा साखर कारखान्यातून यर्रागुंटला नागराजू यांना कमी करण्यात आलं आहे. कारखाना सुरू झाला तेव्हा, १९८३ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी ते तिथे इलेक्ट्रिशियन म्हणून लागले ते तीन महिन्यापूर्वीपर्यंत.
२०१७ नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना आणि त्यांच्यासह इतर २९९ कामगारांना डिसेंबरपासून कामावर येऊ नका असं सांगण्यात आलं. यातले बहुतेक सगळे भूमीहीन दलित आहेत. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना किंवा तसा कालावधी देण्यात आला नाही. "गेल्या दोन महिन्याचा आमचा पगारही आम्हाला दिलेला नाही आणि आता तोट्यात असल्याचं कारण पुढे करून व्यवस्थापन हा कारखाना बंद करण्याचा घाट घालतंय," मी नोव्हेंबरमध्ये नागराजूंना भेटलो तेव्हा ते सांगत होते. या कारखान्यात ते आयटकशी संलग्न कामगार संघटनेचं नेतृत्व करत होते.
२६ नोव्हेंबरपासून, कामावरून काढून टाकलेल्या या कामगारांनी कारखान्याच्या समोर तात्पुरता तंबू ठोकून उपोषण सुरू केलं आहे. त्यांनी दोन महिने काम केलं असतानाही न दिलेला पगार मिळावा आणि कामावरून काढून टाकल्याची भरपाई म्हणून प्रत्येक कामगाराला २४ महिन्यांच्या पगाराइतकी रक्कम देण्यात यावी या त्यांच्या काही मागण्या होत्या. यातले अनेक कामगार त्यांच्या घरातले एकटे कमावते सदस्य आहेत आणि जेव्हा कारखान्याबाहेर उपोषण सुरू होतं त्या काळात घर चालवणं त्यांच्यासाठी फार मुश्किल होतं. नागराजू कारखान्यात कायमस्वरुपी नोकरीत होते आणि कामावरून हकालपट्टी झाली तेव्हा त्यांचा पगार १४,००० रुपये होता. नोकरी गेल्यावर आतापर्यंतच्या पुंजीवर ते गुजराण करू लागले. त्यांची पत्नी शेतमजुरी करते आणि मुलगा रिक्षा चालवतो.











