आज मागे वळून पाहते तेव्हा उज्ज्वला पेठकरला स्वतःचंच आश्चर्य वाटतं. कसं काय आपण या बिकट परिस्थितीत तगू शकलो...
महाराष्ट्रातल्या विदर्भात एकामागोमाग एक शेतकरी आत्महत्या करत होते तेव्हाच उज्ज्वलाच्या नवर्याने, प्रभाकरने आत्महत्या केली. दशकभराहून अधिक काळ झाला त्याला. पण चाळिशी पार केलेली उज्ज्वला अजूनही आपल्या आयुष्याचं आणि कुटुंबाचं विखुरलेलं चित्र जुळवतेच आहे.
असं काय होतं ज्या आधारे ती तगून राहिली? “माझ्या मुलांमुळे,” ती क्षणभर थांबते, “कदाचित.”
प्रभाकर कीटकनाशक प्याला तेव्हा उज्ज्वलाने नुकतीच तिशी ओलांडली होती. धपकन सगळी जबाबदारी तिच्या अंगावर पडली... शेतीची कामं, कर्जाची परतफेड, दोन मुलांना वाढवणं... नवरा गेला म्हणून दुःख करायला तिला वेळच नव्हता. विश्रांती घ्यायला सवड नव्हती आणि ज्यावर टेकावं असा आधारही नव्हता.
गेली दहा वर्षं उज्ज्वला अशीच शांत आहे... शेतातला हरभरा काढत असताना हळूच डोळे टिपते, तेवढंच. वर्धा जिल्ह्यात, वर्धा शहरापासून २० किलोमीटर अंतरावर कुरझडी गावात तिची पाच एकर जमीन आहे. आम्ही गेलो तेव्हा तापलेला सूर्य वसंत ऋतूच्या आगमनाची द्वाही देत होता. उज्ज्वला मात्र उन्हाची पर्वा न करता चटचट काम करत होती. “मी काम केलं नाही, तर माझ्या मुलांच्या भविष्यात फक्त अंधार असेल. त्यांच्यासाठी मी कितीही वेळ रानात राबू शकते.”
स्वतःच्याच सावलीचा आधार घेत एकटीच काम करणारी उज्ज्वला हा पावलोपावली झगडणार्या विदर्भातल्या शेतकर्यांच्या विधवांचा एक निग्रही चेहरा आहे. चिकाटी न सोडणाऱ्या शेतकर्याचं ती प्रतीक आहे, आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या विधवांची प्रतिमा आहे. कुटुंबाचं ओझं तिच्या खांद्यावर आहे, धड मरूही न देणार्या शेतीच्या समस्यांशी ती अथक झगडते आहे. ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी शाखे’च्या अहवालानुसार १९९५ ते २०१३ या काळात भारतात तीन लाख शेतकरी आणि मजुरांनी आत्महत्या केल्या आहेत. उज्ज्वलाच्या नवर्याने २००३ मध्ये आत्महत्या केली. विदर्भातला कापसाचा प्रश्न फार तीव्र झाला नव्हता, तेव्हाची ही गोष्ट.






