“मी फारच आनंदात होते. मी म्हटले, ‘नमस्कार’. ते [राष्ट्रपती] म्हणाले, ‘राष्ट्रपती भवनात तुमचे स्वागत आहे’,” ‘पद्मश्री’ पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला दिलेल्या भेटीची आठवण सांगताना कमला पुजारी सांगत होत्या.
कमलाजींनी अनेक धानांचे वाण जतन केले आहेत, त्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. (शीर्षक छायाचित्र पहा). चाळीस वर्षांपूर्वी लग्न करून त्या कोरापुट जिल्ह्यातील पात्रपुट पाड्यावर राहायला आल्या तेव्हापासून त्यांच्या या कार्याचा प्रवास सुरू झाला. त्या सांगतात की त्यावेळी गावकरी धानाचे १५ स्थानिक वाण पिकवत असत – कालाजीरा, गोठिया, हलदीचुडी, उमुरियाचुडी, माछ कांटा, गोडी काबरी आणि इतरही वाण मुबलक प्रमाणात होते.
“प्रत्येक कुटुंब दोन किंवा तीन वाण पिकवत असे आणि ती इतरांपेक्षा वेगळी असत,” त्या सांगतात. “सुगीच्या वेळी गावकरी आपलं धान्य आणि बी एकमेकांत वाटत असत. या प्रथेमुळे गावात चिक्कार वाण असत.”
साधारण २५ वर्षांपूर्वी, वाणांची विविधता कमी होऊ लागली. “स्थानिक वाणांचा वापर कमी होऊ लागल्याचं माझ्या लक्षात आलं,” त्या सांगतात. कमलाजी भूमिया आदिवासी असून आता सत्तरीला टेकल्या आहेत.
एकत्र कुटुंबं विभागली आणि छोटी कुटुंबं अधिक उत्पादन देणारी संकरित बी वापरू लागली त्यामुळे स्थानिक वाण मागे पडले. त्याचबरोबर सरकारी धोरणांमुळेही हा बदल वेगाने घडला. “सरकारी बाजारात सगळ्या प्रकारची पिके खरीदली जात नाहीत कारण काही बियाणे [‘सर्वसाधारण गुणवत्तेचे’] निकष पूर्ण करत नाहीत,” कमलाजींचा मुलगा टंकधर पुजारी सांगतो. “कधी कधी माछकांटा, हलदीचुडी यांसारखी उत्तम वाणं सरकारी बाजारात विकली जातात. पण आम्ही बहुधा माछकांटा आणि हलदीचुडी घरी खाण्यासाठी पिकवतो आणि ‘सरकारी धान १०१०’ (एक नवीन संकरित वाण) सरकारी बाजारात विकण्यासाठी.










