“संध्याकाळी ७ ते सकाळी ७ अत्यावश्यक कामे वगळता इतर कुणीही संचार करणार नाही.”
- गृह मंत्रालयाचे परिपत्रक (१७ मे रोजी इंडिया टुडेमध्ये प्रकाशित)
या परिपत्रकाद्वारे ‘राज्यांतर्गत प्रवासी वाहने आणि बसगाड्यांना परवानगी देऊन (दोन शेजारी राज्यांची मान्यता असेल) स्थलांतरित कामगारांच्या अपेष्टा कमी करण्यात’ आल्या. पण लाखो लोक महामार्गावर आपल्या पायाचे शिक्के मारत चालत चालले आहेत याबद्दल काही या परिपत्रकात चकार काढण्यात आला नाही.
संचाराच्या वेळांवर घातलेल्या या निर्बंधांमुळे त्यांना तीव्र उन्हात, जिथे तापमान ४७ अंशापर्यंत पोचलं होतं, अशा स्थितीत चालावं लागत होतं.
एक महिनाच झाला असेल, तेलंगणातल्या मिरचीच्या शेतांमध्ये काम करणारी जामलो मडकम ही १२ वर्षांची आदिवासी मुलगी टाळेबंदीने काम आणि कमाई हिरावून घेतल्यामुळे छत्तीसगडमधल्या आपल्या घरी पायी निघाली. तीन दिवसात या लेकराने १४० किलोमीटर अंतर पायी कापलं. आणि घर ६० किलोमीटर दूर असताना, थकवा, शोष आणि स्नायूंवर ताण आल्यामुळे ती मरण पावली. वेळाच्या या निर्बंधांतून अशा आणखी किती जामलो मरण पावणार आहेत?
एक तर, २४ मार्च रोजी पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेमुळे प्रचंड खळबळ माजली कारण या १.३ अब्ज लोकांच्या देशाला पूर्णपणे सगळे व्यवहार थांबवण्यासाठी फक्त चार तासांची मुदत दिली गेली. सगळीकडच्या स्थलांतरित कामागारांनी आपापल्या घराचा रस्ता धरला. ज्या कामगारांना दंडुक्याचा प्रसाद देऊन शहरातल्या कोंडवाड्यांमध्ये कोंबून ठेवता आलं नाही त्यांना राज्यांच्या सीमांवर रोखून धरण्यात आलं. लोकांवर आपण निर्जंतुकाचे फवारे मारले. अनेक जण ‘मदत शिबिरांमध्ये’ दाखल झाले, अर्थात ‘मदत’ नक्की कुणाला झाली हे सांगणं अवघडच आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरची वर्दळ एरवीपेक्षा टाळेबंदीच्या काळात वाढल्याचं दिसलं. शक्य आहे त्या मार्गाने लोक घरी निघाले. काही वर्षांपूर्वी अपघातात एक पाय गमावलेल्या बिमलेश जैस्वाल यांनी तर महाराष्ट्रातले पनवेल ते मध्य प्रदेशातील रेवा हे १,२०० किलोमीटर अंतर दुचाकीवर, तेही पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीसह पार केलं. “अख्खा देश केवळ चार तासांची पूर्वसूचना देऊन कुणी तरी बंद करतं का?” ते विचारतात. असं काय करता राव, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर चांगलंच माहित आहे.










