क्रिकेटच्या इंडियन प्रीमियर लीग सामन्यांचा मोसम सुरु आहे पण नयागावमधील रहिवाश्यांना त्याचा मागमूसही नाही. जवळच्या धुमासपूर गावात झालेल्या हिंसाचाराची सावट अजूनही इथे रेंगाळतंय. २१ मार्चला, होळीच्या दिवशी, क्रिकेट खेळणाऱ्या छोट्या मुलांच्या भांडणातून एका मुस्लिम कुटुंबावर हल्ला झाला. माध्यमातून या प्रसंगाला बरीच प्रसिद्धी मिळाली. हल्लेखोरांनी काठ्या आणि सळ्या वापरल्या होत्या आणि म्हणे त्या कुटुंबाला सांगितलं की ‘जा पाकिस्तानात आणि खेळा क्रिकेट’. हल्लेखोरांच्या पाच म्होरक्यांपैकी तीन जण नयागावचे आहेत.
“या भागातल्या प्रश्नांमध्ये लक्ष घालताना पोलीस जसे नेहमीच हलगर्जी असतात, तसेच ते याही वेळी होते,” गृहिणी असलेली ३१ वर्षांची राखी चौधरी म्हणते. “आम्ही ८-१० जणींचा एक गट बनवलाय, कुठलीही वादावादी झाली तर आम्ही त्यात मध्यस्थी करतो [बहुतेक प्रसंग गावातल्या मुलांनी मुलींची छेड काढण्याचेच असतात]. स्वसंरक्षणाचा हाच एक मार्ग आहे. पोलिस एक तर रहदारी सांभाळत असतात किंवा राजकारण्यांच्या भेटीत गुंतलेले असतात. हां, एखाद्या श्रीमंताने बोलावलं तर मात्र ते ताबडतोब हजर होतात. आम्हाला किड्यांसारखं वागवलं जातं.”
राखी नयागावमधील कृष्ण कुंज कॉलनीत राहते. (गावात मारुती कुंज कॉलनी सुद्धा आहे. काँग्रेस नेता संजय गांधी यांनी १९७० नंतरच्या दशकात जपानी मोटर कंपनीला इथे कारखाना काढायला बोलावलं तेव्हा कामगारांना राहायला तिथे घरं दिली होती.)
हरयाणातील भोंडसी, ता. सोहना, जि. गुरुग्राम या गावाच्या ग्रामपंचायतीतून जानेवारी २०१६ मध्ये नयागावची पंचायत वेगळी करण्यात आली. मेच्या १२ तारखेला नयागावचे मतदार गुरुग्राम लोकसभा मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत.
२०१४ मध्ये, तब्बल १३.२१ लाख मतदान झालं, (एकूण मतदार १८.४६ लाख) त्यात भाजपचे राव इंदरजित सिंघ यांनी इंडियन नॅशनल लोक दलाचे झाकीर हुसेन यांना २,७०,००० च्या मोठ्या मताधिक्याने हरवलं. गुरुग्राम मध्ये २००९ पर्यंत प्रबळ असलेल्या काँग्रेसचे राव धरमपाल सिंघ यांना १,३३,७१३ (१०.१२%) मते मिळाली तर आम आदमी पक्षाचे योगेंद्र यादव यांना ७९,४५६ (६.०२%) मते मिळाली.









