“शाल आय कम्पेअर दी टू ए समर्स डे?” १९ वर्षांची फैझा अन्सारी हळू आवाजात, अगदी कुजबुजत म्हणते. आम्ही मुंब्रातील एकमेव महिला ग्रंथालयाच्या – रेहनुमा वाचनालयाच्या फरशीवर मांडी घालून बसलो आहोत.
दारूल फलाह मशिदीजवळ असलेल्या एका पडक्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील या दोन खोल्यांमध्ये थाटलेल्या ग्रंथालयात बऱ्याच तरूण मुली येतायत, जातायत. रिकाम्या प्लास्टिक खुर्च्यांवर आपले बुरखे ठेवून त्या थंड फरशीवर आरामात बसतात. मध्यवर्ती मुंबईपासून ३५ किमी दूर असलेल्या या ईशान्य उपनगरात बाहेर तापमान ३६ अंश आहे.
फैझा शेक्सपीअरचं १८ वं सुनीत पाठ करत असताना मी तिला आणखी काही ऐकवण्याची गळ घालते. तिची बहीण रझियासकट सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळतात. मग फैझा रोमिओ अॅंड जुलिएट मधील एक ओळ तिच्या शब्दात म्हणते: “ए ब्युटीफुल हार्ट इझ बेटर दॅन ए ब्युटीफुल फेस” रझिया तिच्या बहिणीकडे लाजून पाहते. इतर मुली कुजबुजतात, एकमेकींना खिजवतात आणि खळखळून हसतात. यातील गंमत काही वेगळी सांगायची गरज नाही.
रझिया अन्सारी, १८, काही लाजरी-बुजरी नाही. शेक्सपीअरच्या तिने वाचलेल्या एकमेव कथेचा अचंबित करणारा सारांश सांगितला: “ट्वेल्वथ नाईट ही गोष्ट एखाद्या हिंदी चित्रपटासारखी आहे. त्यात व्हायोलाची दुहेरी भूमिका आहे,” कथेतील व्हायोलाच्या सिझेरिओ या सोंगाविषयी तिचं हे मत आहे. रझियाला आपलं इंग्रजी सुधरायचं आहे आणि म्हणूनच तिने ग्रंथालयात इंग्रजी बोलण्याचे वर्ग लावले आहेत. येथे आठवड्यातील पाच दिवस ११:०० ते ६:०० दरम्यान एक एक तासाचे वर्ग घेतले जातात.













