शास्ती भुनिया हिने मागील वर्षी शाळा सोडली. नंतर तिने सुंदरबनमधील तिच्या सीतारामपूर गावाहून सुमारे २,००० किमी लांब बंगळूरला जाणारी ट्रेन पकडली. "आम्ही अतिशय गरीब आहोत. मला शाळेत दुपारचं जेवण मिळत नाही," ती म्हणते. १६ वर्षांची शास्ती इयत्ता ९वीत गेली होती, आणि पश्चिम बंगाल व भारतभर शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना इयत्ता ८वी पर्यंतच मध्यान्ह भोजन देण्यात येतं.
या वर्षी मार्चमध्ये शास्ती साऊथ २४ परगणा जिल्ह्यातील काकद्वीप तहसिलातल्या आपल्या गावी परतली. टाळेबंदी झाल्यापासून तिचं बंगळूरमधील घरकाम बंद झालं होतं. त्यासोबत तिच्या पगाराचे रू. ७,००० मिळणंही बंद झाले – यातलेच थोडे ती दर महिन्याला घरी पाठवायची.
शास्तीचे वडील, ४४ वर्षीय धनंजय भुनिया, येथील बऱ्याच गावकऱ्यांसारखे सीतारामपूरच्या किनाऱ्याहून थोड्याच अंतरावर असलेल्या नयाचर बेटावर मच्छीमार म्हणून काम करतात. ते कधी नुसत्या हातांनी, तर कधी लहान जाळ्यांचा वापर करून मासळी व खेकडे धरतात, जवळपासच्या बाजारांत विकतात आणि दर १०-१५ दिवसांनी घरी परत येतात.
धनंजय यांची आई महाराणी, त्यांच्या मुली जंजली, २१, व शास्ती, १८, आणि मुलगा सुब्रत, १४, यांना घेऊन त्यांच्या मातीच्या, गवताने शाकारलेल्या झोपडीत राहते. त्यांची पत्नी सुब्रतचा जन्म झाल्यानंतर काही महिन्यांनी मरण पावली. "आज काल बेटावर पूर्वीसारखे मासे अन् खेकडे मिळत नाहीत, [गेल्या काही वर्षांत] आमची कमाई पुष्कळ कमी झाली आहे," धनंजय म्हणतात, ते महिन्याला रू. २,००० ते रू. ३,००० कमावतात. "आम्हाला जगण्यासाठी मासे अन् खेकडे पकडणं भाग आहे. त्यांना शाळेत पाठवून आम्हाला काय मिळणार?"
शास्तीने जशी शाळा सोडली, तसेच सुंदरबनच्या वर्गांतून इतर विद्यार्थीही झपाट्याने गायब होऊ लागले आहेत. खाऱ्या मातीमुळे इथे शेती करणं कठीण जातं, आणि नद्यांचं रुंदावतं पात्र आणि वारंवार येणाऱ्या चक्रीवादळांमुळे त्यांची खोऱ्याच्या प्रदेशातील घरं उद्ध्वस्त होत राहतात. परिणामी, या भागातील बरेच गावकरी पोटापाण्यासाठी स्थलांतर करतात. मुलांनाही वयाच्या १३ किंवा १४ व्या वर्षी कामासाठी घराबाहेर पडावं लागतं. बरेचदा कुटुंबातली शिकणारी पहिलीच पिढी असणारे हे विद्यार्थी पुन्हा वर्गात परतून येऊ शकत नाहीत.

























