“सुंदरबनमध्ये आमच्यासाठी रोजचं जगणं म्हणजे संघर्षच असतो. सध्या कोरोनामुळे सगळंच तात्पुरतं बंद झालं असलं तरी आम्हाला माहितीये की आम्ही यातून तरून जाऊ. आमच्या रानांमध्ये बटाटा, कांदा, कारली, पडवळ आणि शेवगा आहे. साळीची कमी नाही. तळ्यांमध्ये चिक्कार मासे आहेत. त्यामुळे उपाशी मरण्याचा सवालच येत नाही,” मौसानीतून फोनवर सरल दास सांगतात.
देशभरातल्या टाळेबंदीमुळे देशभरातली अन्नधान्याची वितरणाची साखळी विस्कळित झाली असली तरी मौसानीत लोक बिनघोर आहेत – भारतात येणाऱ्या सुंदरबनच्या पश्चिमेकडे २४ चौरस किलोमीटर क्षेत्रावर या बेटाचा विस्तार आहे. “टाळेबंदीमुळे बेटांवरून रोज नामखाना किंवा काकद्वीपच्या बाजारात बोटी भरून जाणारा भाजीपाला आता पाठवता येत नाहीये,” दास सांगतात.
आपात्कालीन परिस्थितीसाठी ठेवण्यात आलेल्या काही ‘विशेष नौकां’मधून अजूनही मौसानीतून अनुक्रमे २० आणि ३० किलोमीटरवर असलेल्या नामखाना आणि काकद्वीपच्या ठोक बाजारांना भाजीपाल्याची जावक सुरू आहे. बोटीने या प्रवासाला ३० मिनिटं लागतात. पण तिथून हा माल कोलकात्याला नेणाऱ्या रेल्वेगाड्या आणि ट्रक मात्र सध्या सुरू नाहीत.
मौसानीची तीन प्रमुख पिकं आहेत – तांदूळ, कारलं आणि विड्याची पानं. कोलकात्याच्या बाजारात या तिन्हीला प्रचंड मागणी आहे. “त्यामुळे आता या वस्तू कशा येणार याचा शहराला घोर लागून राहिला आहे,” ५१ वर्षीय दास सांगतात. ते मौसानी बेटावरच्या बांगडांगा सहकारी शाळेत कारकून म्हणून काम करतात. त्यांची बागडांगा गावात पाच एकर जमीन आहे आणि ते ती भाड्याने कसायला देतात.








