सित्तिलिंगीच्या काही तरुणांची पावलं परत शाळेकडे वळलीयेत. मात्र या वेळी शिक्षण घेण्यासाठी नाही तर तुलिर शाळेची नवी इमारत बांधण्यासाठी.
त्यांच्यातला एक, २९ वर्षीय ए. पेरुमल, वायरी आणि बाकी फिटिंग करणारा इलेक्ट्रिशियन. “तो जमिनीलगतचा छोटा वायुवाहक पाहिला? त्यातून येणारी हवा इथल्या पिटुकल्यांनाही मिळेल,” तो सांगतो. प्रचंड मागणी असणारं टीव्ही आणि पंखा दुरुस्तीचं काम बाजूला ठेवून पेरुमल या शाळेच्या इमारतींचं काम करायला आलाय.
जवळच २४ वर्षांचा एम जयबल, चिखलमातीच्या विटांचं काम करण्यात पटाईत असलेला मिस्त्री आहे. या खोऱ्यातल्या सरकारी शाळेत स्वतः कधीही हातात कागद किंवा रंगीत खडू न घेतलेला जयबल आज मातीमध्ये काही रंग मिसळून नक्षीकाम केलेल्या खांबांना आकार देण्याचं काम करतोय. डिसेंबर २०१६ मध्ये या नव्या इमारतीची कोनशिला ठेवण्यात आली तेव्हापासून जयबल इथे काम करतोय, गरज पडली तर तो सुतारकामही करतो. त्याला आणि बाकीच्यांना आठ तासांच्या कामासाठी ५०० रुपये मिळतात आणि ते पडेल तसं इथे येऊन काम करतात.
त्यांनी इमारत बांधणीचे पहिले धडे गिरवले तुलिरच्या शाळेनंतरच्या वर्गांमध्ये, २००४ साली. सित्तिलिंगीच्या सरकारी शाळेतल्या प्राथिमक आणि माध्यमिक वर्गांमधली जयबल आणि इतर मुलं इथे स्वतः वेगवेगळे प्रयोग करून विज्ञान शिकत होती, चित्रं काढून कला तर पुस्तकांमधून भाषा शिकत होती.
२०१५ मध्ये ‘तुलिर’ (तमिळमध्ये तुलिर म्हणजे पालवी) ही इयत्ता ५ वीपर्यंतची प्राथमिक शाळा सित्तिलिंगीमध्ये सुरू करण्यात आली. तमिळ नाडूच्या धर्मापुरी जिल्ह्यातल्या दूरवरच्या कोनाड्यातल्या या खोऱ्याची लोकसंख्या अंदाजे १०,००० इतकी आहे. इथे एकूण २१ पाडे आहेत, ज्यातले १८ मल्याळी पाडे, दोन लमाणी तांडे तर एक दलित वस्ती आहे.
या इमारतीवर कामाला असलेले सगळे जण मल्याळी समुदायाचे आहेत. राज्यामध्ये या समुदायाचं साक्षरतेचं प्रमाण सर्वात कमी, ५१.३ टक्के इतकं आहे (जनगणना, २०११). ३,५७,९८० इतकी लोकसंख्या असणारे हे मल्याळी म्हणजे तमिळ नाडूतल्या अनुसूचित जमातींपैकी संख्येने सगळ्यात मोठा गट आहेत. ते जास्त करून धर्मापुरी, नॉर्थ अरकॉट, पुडुकोट्टई, सालेम, साउथ अरकॉट आणि तिरुचिरापल्ली जिल्ह्यांमध्ये राहतात.
“मी इथे [शाळेनंतरच्या वर्गांमध्ये] सगळ्यात पहिल्यांदा काय शिकलो तर झाडांना पाणी देण्यासाठी ‘एल्बो जॉइंट’चा वापर करून पाइप कसा जोडायचा,” तुलिरच्या शाळेत शिक्षक असणारा २७ वर्षीय एम. शक्तिवेल सांगतो. तो मुल्ला सित्तिलिंगी या मल्याळी आदिवासी पाड्यावर लहानाचा मोठा झालाय.
शक्तिवेल एका शिडीवर चढलाय, वरचं सौर पॅनेल आणि बॅटरी काढून त्याला शाळेच्या नव्या इमारतीवर बसवायचंय. सध्याच्या भाड्याच्या जागेतून शाळा आता एक किलोमीटरवरच्या नव्या इमारतीत स्थलांतरित होतीये. नव्या शाळेत भरपूर महागडी उपकरणं आहेत, हा सौर दिवा रात्री चालू असला म्हणजे चोरांची भीती नाही, शक्तिवेल सांगतो.
त्याच्यापासनं जवळच २८ वर्षांचा कुमार ए. लोखंडी सळया आणि पत्रे वाकवून खिडक्यांसाठी गज तयार करतोय. तो आणि त्याचे सहकारी मजेत म्हणतात की खिडक्या म्हणून जी जागा मोकळी ठेवलीये तिथनं एखादं सात वर्षांचं पोर आरामात बाहेरची मजा घ्यायला सटकू शकेल.
कुमार, पेरुमल, जयबल आणि शक्तिवेल ज्या सित्तिलिंगी सरकारी शाळेत शिकत होते तिथे कशाचा काही शोध घेणं असला प्रकारच नव्हता. वर्ग खचाखच भरलेले असायचे, शिक्षकांचा बहुतेक वेळा पत्ता नसायचा आणि शाळा हा तणाव निर्माण करणारा अनुभव होता. माध्यमिक शाळेत प्रवेश घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी शाळाच सोडून द्यायचा पर्याय निवडला. शक्तिवेल सांगतो, “वर्गात काय चालायचं तेच मला समजायचं नाही आणि परीक्षांचा तर मला तिरस्कार होता,” पेरुमल सांगतो. “माझे आई वडील काही शिकलेले नव्हते, त्यामुळे घरी काही [अभ्यास] भरून काढण्याचा प्रश्नच नव्हता.”
भारतभरात प्राथमिक स्तरावर आदिवासी मुलांचं शाळा गळतीचं प्रमाण ६.९३ टक्के आहे. माध्यमिक शाळेसाठी हे वाढून एकदम २४.६८ टक्के इतकं होतं (भारतासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी हेच प्रमाण अनुक्रमे ४.१३ आणि १७.०६ इतकं आहे). ही आकडेवारी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या २०१८ साली प्रकाशित झालेल्या शिक्षणविषयक सांख्यिकी या अहवालात नमूद केली आहे. यात म्हटलंय, “[शाळा गळतीचं प्रमाण जास्त असण्याचं] कारण केवळ घरकाम करायला लागणं इतकंच नसून शिक्षणात रस नसणं हेही आहे.”
“आम्ही एका ठिकाणी फक्त बसलेले असायचो, फार काही शिकवायचेच नाहीत,” जयबल सांगतो. सित्तिलिंगीच्या माजी पंचायत अध्यक्ष, पी. थेनमोळी सांगतात, “आठवी संपत आली तरी मला साधं माझं नाव इंग्रजीत लिहिता येत नव्हतं.”
आणि जरी मुलांनी कसं तरी करून शाळा सुरू ठेवलीच, तर त्यांना कोटापट्टीच्या माध्यमिक शाळेत पोचण्यासाठी राखीव वनातून १० किमी अंतर चालत जावं लागे. बसने जायचं म्हटलं तर ती खूप लवकर किंवा खूप उशीरा पोचत. (२०१० सालापासून जयबल आणि इतर जण शिकत होते ती सरकारी शाळा इयत्ता १० वी पर्यंत सुरू झाली आहे.) सित्तिलिंगी खोऱ्याच्या चहु बाजूंनी कलरायन आणि सित्तेरी डोंगररांगा आहेत. पूर्वी या खोऱ्यात येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे उत्तरेकडून – कृष्णगिरी ते तिरुअन्नामलाईकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग ४५ए. २००३ साली दक्षिणेला रस्त्याचं काम झालं आणि सालेम (८० किमी) आणि तिरुप्पूर, इरोडे आणि अविनाशी या औद्योगिक कापड पट्ट्याला वेढून जाणाऱ्या राज्य महामार्ग ७९ ला हा रस्ता जोडण्यात आला.
या भागात मोठ्या संख्येने मजूर लागतात. नव्या रस्त्यामुळे लोकांना कामासाठी बाहेर पडणं सोपं होऊ लागलं, गावातल्या ज्येष्ठ ६५ वर्षीय आर. धनलक्ष्मी सांगतात. त्यांच्या तीन मुलांनी सातवीनंतर शाळा सोडली आणि ट्रक क्लीनर म्हणून काम करण्यासाठी तिघं गावाबाहेर पडली. चारही मुलींनी शाळा सोडली आणि शेतात मदत करायला सुरुवात केली. त्यांच्या शेतात त्या भात, ऊस, डाळी आणि भाजीपाला पिकवतात. “पावसाने दगा दिला की बरीच लोकं कामासाठी गाव सोडायची...” धनलक्ष्मी सांगतात.
नियोजन आयोगाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या तमिळ नाडू स्थलांतर सर्वेक्षण २०१५ च्या अहवालात अशी नोंद करण्यात आली आहे की स्थलांतरितांपैकी ३२.६ टक्के जणांनी केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. आणि त्यांचं सरासरी वय आहे १४ – भारतात अनेक क्षेत्रांमध्ये रोजगारासाठी कायद्याने मंजूर वय. रोजगाराची कोणतीच कौशल्यं नसल्याने अनेक जण बांधकामावर काम करायला लागतात. राज्यात याच क्षेत्रात सगळ्यात जास्त अकुशल कामगारांना काम मिळते, दर दहा स्थलांतरित कामगारांपैकी एक जण या क्षेत्रात आहे.
जयबलने आठवीनंतर शाळा सोडली आणि तो केरळमध्ये गेला मात्र तिथे त्याला केवळ बांधकामांवर कामगारांच्या हाताखाली काम मिळायचं आणि आठवड्याला त्याची १५०० रुपयांची कमाई व्हायची. तिथलं काम आणि राहण्याच्या सोयीला कंटाळून सहा महिन्यातच तो घरी परतला आणि आपल्या कुटुंबाच्या पाच एकर रानात काम करू लागला. पेरुमलदेखील वयाच्या १७व्या वर्षी केरळला गेला. “मी रोजंदारीवर काम केलं, जमिनी साफ करायच्या, झाडं तोडायची. दिवसाचे ५०० रुपये मिळायचे. पण फार दमछाक व्हायची. मग मी एक महिन्यानी पोंगलसाठी घरी आलो आणि [घरच्या तीन एकर शेतात काम करण्यासाठी] इथेच राहिलो.”
श्रीराम आर बारावी पास होऊ शकला नाही त्यामुळे त्याने शाळा सोडली आणि २०० किमीवरच्या तिरुप्पूरला गेला. “मी कापड विणायची यंत्रं तयार करणाऱ्या एका कारखान्यात सहा महिने काम केलं, तिथे आठवड्याला १५०० रुपये अशी कमाई व्हायची,” तो सांगतो. “मात्र मला सुताच्या तुसाचा त्रास व्हायला लागला आणि त्यानंतर मला घरी परतावं लागलं.”
शाळा सोडलेल्या आणि बाहेर जाऊन काम करण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेल्या या मुलांसाठी तुलिरची स्थापना करणाऱ्या टी. कृष्णा, वय ५३ आणि अनुराधा, वय ५२ या वास्तुविशारद जोडप्याने एक ‘बेसिक टेक्नोलॉजी’ (बीटी) कोर्स सुरू केला. या मुलांप्रमाणेच त्यांच्या डोळ्यासमोर ५०० मुलं तुलिरमधून शाळेनंतरचं प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडली होती. या बीटी कोर्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, बांधकाम आणि इतर विषयांवरचं एका वर्षाचं प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येणार होतं. “आम्ही विचार केला, जर का त्यांना एखादं कौशल्य शिकता आलं ज्या आधारे त्यांना इथेच काम करून काही कमवता येऊ शकेल, तर त्यांना गाव सोडून बाहेर जायची गरज भासणार नाही,” कृष्णा सांगतात.
२००६ मध्ये १२ मुलांबरोबर पहिल्या बीटी कोर्सची सुरुवात झाली (आतापर्यंत ६५ मुलगे आणि २० मुलींनी हा कोर्स पूर्ण केला आहे). सायकल दुरुस्तीपासून सुरुवात करून मुलं चिखल, सिमेंट आणि मलबा (गावांमध्ये विहिरींच्या खोदकामात बाहेर आलेला माल) वापरून शाश्वत स्वरुपाची वास्तुविद्या शिकली. तसंच अभियांत्रिकीसाठी लागणारं प्राथमिक चित्रण कौशल्य, वास्तुचा प्लॅन किंवा सेक्शन कसा वाचायचा, सध्याची स्विच आणि सॉकेट्स मानकं, सुरक्षा प्रक्रिया आणि इतरही अनेक बाबी मुलं खोऱ्यामध्ये चालू असलेल्या विविध बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी - ट्रायबल हेल्थ इनिशिएटिव्ह, सित्तिलिंगी फार्मर्स असोसिएशन आणि पोरगई कारागीर संघटनेची इमारत - प्रत्यक्ष काम करताना शिकत होती.
हे प्रशिक्षण चालू असताना त्यांना महिन्याला रु. १००० इतकं विद्यावेतन देण्यात येत होतं. आता गावाबाहेर जाऊन ते जी कमाई करत होते – अगदी दिवसाला ५०० रुपये – त्याच्या आसपासही हे नव्हतं मात्र तेवढी तरी कमाई असल्याने त्यांना कामासाठी बाहेर न जाता प्रशिक्षण पूर्ण करता आलं. “मी विचार केला मी [एखादा व्यवसाय] शिकू शकतो आणि घरबसल्या कमाई करू शकतो,” पेरुमल सांगतो.
या प्रशिक्षणानंतर शिक्षणाविषयी आत्मविश्वास वाढल्याने अनेकांनी परत औपचारिक शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि शाळेचं आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यातले दोघं आता तुलिरच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक आहेत. त्यातली एक आहे ए. लक्ष्मी, वय २८. ती म्हणते, “मी बीटी कोर्स केला आणि मग शाळा पूर्ण केली. मला विज्ञान फार आवडतं आणि ते शिकवायलाही मजा येते.”
पेरुमल एकदम कुशल आणि कामच काम असणारा इलेक्ट्रिशिय आहे. तो ट्रॅक्टर भाड्याने देतो आणि महिन्याला सगळं मिळून १५,००० रुपये कमावतो. “[२००७ मध्ये] मी बीटी कोर्स पूर्ण केला आणि मग मी १० वी आणि १२ वी पण पूर्ण केली. सालेममध्ये मी पदार्थविज्ञान विषयात बीएससीला प्रवेश घेतला,” तो खूश होऊन सांगतो. (त्याने बीएससीची पदवी काही पूर्ण केली नाही, मात्र ती एक वेगळीच कथा आहे.)
शक्तिवेल तुलिरमध्ये काम करून ८००० रुपये कमावतो, वर त्याला घरी रहायला मिळतं आणि घरची एक एकर शेती पाहता येते. “मी महिन्याला ५०० रुपयांपर्यंत जास्तीची कमाई करू शकतो, मोबाइल फोन दुरुस्त करणं, काही इलेक्ट्रिकची कामं करणं.”
२०१६ साली जेव्हा तुलिरच्या नव्या इमारतींचं बांधकाम सुरू झालं तेव्हा बीटी कोर्सच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून तिथे नेण्यात आलं. विद्यावेतनाऐवजी त्यांना दिवसभराच्या कामासाठी त्यांना रु. ३०० मजुरी देण्यात येऊ लागली. बांधकामावरचा बाकीचा सगळा चमू, फक्त एक सुतार, ए. साम्यकन्नू सोडून (त्यांचा मुलगा एस. सेन्थिल बीटी कोर्सचा विद्यार्थी होता) म्हणजे बीटी कोर्स पूर्ण केलेले माजी विद्यार्थी.
तुलिरच्या नव्या इमारतीचा पहिला टप्पा – सहा वर्गखोल्या, कचेरी आणि सगळ्यांसाठी सभागृह – जवळ जवळ तयार आहे. एक वाचनालय, स्वयंपाकघर आणि हस्तव्यवसायासाठीच्या खोल्या अजून बांधून व्हायच्या आहेत. यासाठी लागणारी ५० लाखांची रक्कम तुलिर ट्रस्टच्या देणगीदारांकडून गोळा झाली आहे.
“मुलं शिकूच शकत नव्हती कारण कधी कधी दोघाही पालकांना कामासाठी गावाबाहेर जावं लागत असे,” थनिमोळी म्हणतात. “आमच्या गावातल्या मुलांना नवनवी कौशल्यं शिकायला मिळतायत म्हणून मी खरंच खूश आहे. त्यांना इथे घरच्यांबरोबर राहता येतंय आणि कमवताही येतंय.”
ही कहाणी लिहिण्यासाठी सहाय्य केल्याबद्दल तुलिरमध्ये शिक्षक असणारे राम कुमार आणि मीनाक्षी चंद्रा व दिनेश राजा या वास्तुविशारद विद्यार्थ्यांचे आभार.
अनुवादः मेधा काळे