जेव्हा शिक्षकाच्या जागी पारी असतं आणि विषय असतो ग्रामीण भारत तेव्हा शिकणं असतं खरंखुरं, प्रत्यक्षात दिसणारं आणि चिरंतन.
आमच्यासोबत इंटर्नशिप करणाऱ्या आयुष मंगलचंच उदाहरण घ्या. पारीसोबत काम करत असताना त्याने छत्तीसगडच्या आदिवासींना आरोग्यसेवांपर्यंत पोचण्यात येणारे अडथळे समजून घेतले आणि झोला छाप डॉक्टरांच्या दुनियेत डोकावण्याचा प्रयत्न केला. “खाजगी आणि सार्वजनिक सेवा, पात्र आणि अपात्र डॉक्टर आणि त्यांचे रुग्ण यांच्यामधलं नातं सरळसाधं नाही हे मला उमजलं. आणि धोरण ठरवताना या गुंतागुंतीचा विचार करावाच लागणार हेही,” आयुष सांगतो. तो छत्तीसगडच्या जांजगीर चंपा जिल्ह्याचा रहिवासी असून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतोय.
आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये उल्लेखही नसलेल्या परिघावरच्या लोकांविषयी ही तरुण मुलं जाणून घेतायत. ओडिशातल्या कोरापुटमधल्या गौरासारख्या अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींसाठी शासकीय योजनांचा लाभ घेताना किती अडथळे येऊ शकतात हे पत्रकारितेची विद्यार्थिनी असणाऱ्या सुभश्री मोहापात्राला समजलं ते पारीसोबत काम करत असताना. आणि मग ती प्रश्न विचारते, “गौराला इतका शारीरिक आणि मानसिक त्रास झाला त्याला शासनाचा अभावच जबाबदार आहे की नाही?”
सप्टेंबर २०२२ मध्ये पारीमध्ये शिक्षणासंबंधी काम करणाऱ्या पारी एज्युकेशनला पाच वर्षं पूर्ण झाली. या काळात कॉलेज, विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या, सामाजिक बदलासाठी काम करणाऱ्या संघटनांमधल्या तरुण मुला-मुलींमध्ये तसंच अगदी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही साध्यासुध्या माणसांकडे किती विविध प्रकारची कौशल्यं आणि ज्ञान असतं याची सखोल जाण तयार झाली आहे. आणि त्यासोबतच त्यांच्या आयुष्यातले ताण तणाव, सुख-दुःखंसुद्धा त्यांनी जवळून पाहिली आहेत. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये धान झूमरबद्दल जाणून घेतल्यानंतर माध्यमिक शाळेत शिकणारा प्रज्वल ठाकूर म्हणतो, “सणवारांमध्ये शेतकऱ्यांचं स्थान किती तसंच धान किती मोलाचं आहे हे मला अधिक समजून घेता आलं. पारी एज्युकेशनसोबत काम करत असताना मी राहतो त्या समाजाबद्दल मला नवा दृष्टीकोन मिळाला.”



