“आम्हाला काही कर्फ्यू वगैरे काही नाही. आम्हाला एक दिवसदेखील सुटी घेता येत नाही. लोक सुरक्षित रहायला पाहिजेत ना – आणि त्यासाठी आम्ही शहर साफ ठेवतोय,” दीपिका सांगते. थाउजंड लाइट्स परिसरात ती सफाई कर्मचारी म्हणून काम करते.
२२ मार्च रोजी अख्खा देश ‘जनता कर्फ्यू’ दरम्यान घरी राहिला – अर्थात ५ वाजता ‘कृतज्ञता’ व्यक्त करण्यासाठी लोक जमा झाले ते सोडून. आणि ज्यांच्याप्रती ही तथाकथित कृतज्ञता व्यक्त करायची होती ते सफाई कर्मचारी मात्र पूर्ण दिवस काम करत होते. हे महानगर झाडून चकाचक करण्यात मग्न होते. “सध्या एरवीपेक्षा आमच्या कामाची गरज जास्त आहे,” दीपिका सांगते. “या रस्त्यातून तो विषाणू झाडून लावायचाय.”
रोजच्याच प्रमाणे दीपिका आणि इतरही कर्मचारी कुठलंही संरक्षक साहित्य नसताना रस्ते झाडत होते. मात्र रोजच्या पेक्षा सध्या परिस्थिती आणखीच बिकट झालेली आहे. देशभरात संचारबंदी लागू केल्यामुळे अनेकांना कचऱ्याच्या गाड्यांमधून कामाच्या ठिकाणी पोचायला लागलंय. काही जण तर मोठं अंतर पायी गेले. “२२ मार्च रोजी मला जास्त रस्ते झाडायला लागले कारण लांब राहणाऱ्या माझ्या सहकारी कामावरच पोचू शकल्या नाहीत,” दीपिका सांगते.
या छायाचित्रांमधल्या बहुतेक स्त्रिया मध्य आणि दक्षिण चेन्नईच्या थाउजंड लाइट्स आणि अल्वरपेटमध्ये तसंच अन्ना सलईच्या एका रस्त्यावर काम करतायत. यातल्या बहुतेक जणी चेन्नईच्या उत्तरेला राहतात आणि तिथून इथे कामावर येतात.
त्यांच्याप्रती व्यक्त होतीये ती कृतज्ञताही जरा विचित्रच म्हणायला पाहिजे. २४ मार्च रोजी संचारबंदीची घोषणा झाली आणि तेव्हापासून या कर्मचाऱ्यांचा असा आरोप आहे की त्यांना सुटी घेणं दुरापास्त झालंय. “जर ते कामावर हजर राहिले नाहीत तर त्यांना कामावरून कमी करण्यात येईल असं त्यांना सांगण्या आलंय,” सीटूशी संलग्न चेन्नई मनपा लाल बावटा युनियनचे सचिव बी. श्रीनिवासुलु सांगतात. ते असंही सांगतात की प्रवास करण्यासाठी बसची सोय करण्यात आली असली तरी त्या पुरेशा नाहीत आणि अनेकदा त्या उशीरा धावतात. त्यामुळे मग या कामगारांना कचऱ्याच्या घंटागाड्यांमधून प्रवास करण्यावाचून पर्याय नाही. सफाई कर्मचाऱ्यांना महिन्याला साधारणपणे ९,००० रुपये पगार मिळतो. आणि एरवीसुद्धा त्यांना दररोज ६० रुपये प्रवासावर खर्च करावे लागतात. कर्फ्यू आणि संचारबंदीच्या काळात ज्यांना सार्वजनिक बस किंवा मनपाने पाठवलेली वाहनं मिळाली नाहीत त्यांना चालत कामावर यावं लागलं आहे.



















