सगळं बंद करण्याआधी थोडी तरी तयारी करण्यासाठी त्याला कसलाच वेळ का देण्यात आला नाही हे काही मोहम्मद खोकन याला कळत नाहीये. जर इतके दिवस सगळं ठप्प होणार आहे याची जरा जरी कल्पना असती तर त्याने खाण्यापिण्यासाठी काही पैसा बाजूला काढून ठेवला असता असं बृहत बंगळुलु महानगरपालिकेमध्ये सफाईचं काम करणारा खोकन सांगतो.
मोहम्मदचं घर दूर आहे – दक्षिण दिल्लीच्या वेशीवर असणारं, जसोला – एक ‘शहरी’ खेडं. बंगळुरुच्या उत्तरेला असणाऱ्या अमृतहळ्ळी भागातल्या सुक्या कचऱ्याच्या एका डंपिंग साइटवर तो काम करतो. आणि तिथेच राहतो. “आम्हाला जर या टाळेबंदीविषयी आधी कळालं असतं तर आम्ही गाठीला काही पैसा तरी ठेवला असता. माझ्या मुकादमाला भेटून मी आमचे काय हाल सुरू आहेत ते तरी सांगितलं असतं, थोडे फार पैसे मागितले असते,” तो सांगतो.
आता कसली कमाई नाही, सोबत काही अन्न पाणी नाही, मोहम्मद सांगतो की तो आता स्वयंसेवकांनी दिलेल्या अन्नाच्या पाकिटातनं जेवतोय. “सगळ्यांचीच मोठी अडचण झालीये कारण सगळं अचानकच जाहीर केलंय,” तो म्हणतो.
शहराच्या दक्षिणेच्या टोकाला, सुंदर रामस्वामी देखील हेच म्हणतात – टाळेबंदीआधी काहीच वेळ देण्यात आला नाही. “आम्हाला या सगळ्यासाठी काही तरी तयारी करता यायला पाहिजे होती – आम्ही सोबत थोडा तरी अन्नाचा साठा करून ठेवला असता. अन्नपाण्याशिवाय आम्ही घरात कसं बसून रहावं?” सुमारे चाळिशी पार केलेले सुंदर विचारतात. ते व्यावसायिक रंगकाम करतात.




