जमिनीपासून २५ फूट उंचीवर लाकडी फळकुटावर बसलेल्या संगीता कुमारी साहूच्या उजव्या हाताच्या हालचाली सावकाश आणि स्थिर आहेत. कित्येक वर्षं छताकडे झालेलं दुर्लक्ष आणि जीर्णोद्धाराचे वाईट प्रयोगच जणू ती तिच्या हातांनी खरवडून काढत असते. “मी काही सामान्य कामगार नाहीये, मी एक कलाकार आहे,” ती ठामपणे सांगते. मी तिला धुळीपासून संरक्षण म्हणून तोंडाला बांधलेली ओढणी काढायची विनंती केली, तेवढ्या काही क्षणासाठी तिचं काम थांबलं आणि ती सांगू लागली.
छत्तीसगडमधल्या दुर्ग जिल्ह्याच्या बेमतरा तालुक्यातलं बाहेरा हे संगीताचं गाव, इथनं ८०० किलोमीटर लांब आहे. १९ वर्षाची संगीता आणि तिची आई ४५ वर्षीय नीरा भिंतीवरचे थर खरवडून काढण्याचं काम करतात. कृत्रिम केसांनी बनवलेल्या रंगाकामाच्या कुंचल्याने त्या सिमेंट आणि रंगांचे थर हलक्या हाताने काढून टाकतात. त्यांच्याकडे ०.७ इंच ते ४ इंच अशा वेगवेगळ्या लांबीच्या केसांचे कुंचले आहेत, काम किती नाजूक त्यावर कोणता कुंचला वापरायचा ते ठरतं. लखनौच्या सगळ्यात महत्त्वाच्या वास्तूंपैकी एक म्हणजे कॉन्स्टंटिया. या इमारतीची मूळ वास्तुरचना उजागर करण्याचं काम अशाच नाजूक कामांपैकी एक. ही इमारत म्हणजे इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या बेंगाल आर्मीच्या मेजर जनरल क्लॉड मार्टिन यांनी बांधलेला महाल. आता तिथे मुलांचं ला मार्टिनिएर कॉलेज भरतं.
संगीता तिच्या कामात कितीही कुशल असली तरी त्यामुळे तिला होणारा त्रास काही कमी होत नाही. बहुतेक वेळा माझा अवतार एखाद्या भुतासारखा असतो,” भिंती खरवडल्यानंतर तिचे कपडे माखून टाकणाऱ्या बारीक धुळीबद्दल ती सांगते
कुठल्याही जीर्णोद्धाराच्या कामामध्ये भिंतीवरची पुटं खरवडून काढणं ही पहिली पायरी असते. २०१३ पासून ज्यांनी हा प्रकल्प हातात घेतला आहे त्या ५० वर्षीय अन्सारुद्दिन अमान यांच्या मते हे ‘नाजूक काम’ आहे. “जर काळजीपूर्वक हे थर काढले गेले नाहीत तर कुठलंही जीर्णोद्धाराचं काम हाती घेणं शक्य नाही,” अमान सांगतात. सुरुवातीला साधे फलक रंगवायचं काम करणाऱ्या अमान यांना २०१६ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांच्या लक्षणीय योगदानासाठी सन्मानित केलं आहे.
कॉन्स्टंटिया ही २०० वर्षांहून जुनी फ्रेंच बरूक शैलीत बांधलेली इमारत आहे. असंख्य छोटे पुतळे, आकृत्या आणि भित्तीचित्रांनी तिच्या भिंती सजल्या आहेत. या मायलेकींसाठी मात्र “फुलं, पानं आणि चेहरे” स्पष्ट दिसू लागणं हीच त्यांच्या कामाची निष्पत्ती. कधी कधी त्यांच्या कामामुळे एखादी मूळ आकृती समोर येते आणि त्यांचाच श्वास रोखला जातो. “एखादं बाळ जन्माला आलं की त्याला आपण पहिल्यांदा पाहतो – अगदी तसा आनंद होतो आम्हाला,” संगीता खुशीत सांगते. कधी तरी फार वाईटही वाटतं. “कधी कधी एखाद्या आकृतीचा चेहराच ठिकाण्यावर नसतो, मग मीच तो चेहरा कसा असेल याची कल्पना करते,” काही तरी अगदी खाजगी सांगितल्यासारखं ती दबक्या आवाजात मला सांगते.
या दोघी मायलेकी जिथे कुठे राहतात किंवा जातात त्यातल्या कुठल्याच वास्तू कॉन्स्टंटिआसारख्या नाहीत. संगीताच्या घरी तिचे आई वडील, भाऊ श्यामू आणि धाकटी बहीण आरती आहे. लखनौच्या बऱ्यापैकी श्रीमंत भागामध्ये असली तरी त्यांची खोली एका चाळीसारख्या वसाहतीत आहे, आणि जागा कशी बशी सहा बाय आठ फूट. खोलीच्या भिंती भडक गुलाबी रंगाच्या आहेत आणि दोन भिंतींवर हिंदू देवदेवतांची चित्रं चिकटवली आहेत. देवतांच्या रंगीबेरंगी चित्रांखाली वेगवेगळे कपडे टांगलेले आहेत. एका भिंतीवर या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एक फळी ठोकलेली आहे ज्यावर वेगवेगळ्या पत्र्याच्या पेट्या, फोटो आणि घरगुती वस्तूंचा पसारा ठेवलेला आहे. फळीखालीच टीव्ही आहे ज्यावर संगीता “फॅमिली ड्रामा आणि प्रेमकथा” पाहते. घरातलं एकमेव फर्निचर म्हणजे एक लाकडी दिवाण, नायलॉनच्या पट्ट्यांची एक खाट दुमडून समोरच्या भिंतीला लावून ठेवलीये. बाहेर खोलीएवढीच रिकामी जागा आहे जिचा वापर स्वयंपाकासाठी आणि रात्री झोपायला होतो.
ही खोली (आणि अशाच इतर अनेक खोल्या ६०० रु. महिना भाड्याने दिल्या आहेत) एका २० गुंठ्यांच्या भूखंडावर बांधलेल्या आहेत. मात्र मोकळ्या जागी भाडेकरूंनी फिरलेलं (शिक्षक असणाऱ्या) जागामालकाला पसंत नाही.
तसंही या मैदानाच्या बाहेर जाण्याची हिंमत संगीतामध्ये नाही. सकाळी ८.१५ वाजता आईला मागे बसवून ती १५ मिनिटात सायकलने कामाच्या ठिकाणी पोचते आणि ५.३० वाजता घरी परतते तेवढाच काय तो तिचा बाहेरच्या जगाशी संपर्क. “लखनौ काही फार सुरक्षित ठिकाण नाही असं मी ऐकलंय. मुलींसाठी तर ही फारशी चांगली जागा नाहीये,” ती सांगते. बाहेरामध्ये ती तिच्या मैत्रिणींसोबत गुजगोष्टी करत, हसत खेळत शिवारं, गावं पालथी घालायची.
बाहेरामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होतं आणि बरेच जण गाव सोडून बांधकामांवर मजूर म्हणून काम करू लागतात. साहू कुटुंबाचा गावी जमिनीचा एक लहानसा तुकडा आहे – एकराहूनही कमी. “आम्ही जर दुसऱ्यांच्या रानात काम केलं तर आम्हाला फक्त १०० रुपये रोज मिळतो,” नीरा सांगतात. त्यांनी त्यांची जमीन बटईने कसायला दिली आहे आणि बटईदार त्यांना वर्षाला १०-२० पोती तांदूळ किंवा गहू देतो. अर्थात कसं पिकतंय त्यावर हे अवलंबून असतं. जवळ जवळ चार वर्षं लखनौमध्ये काम केल्यानंतर आपल्या कमाईतून त्यांनी गावी तीन खोल्यांचं विटांचं बांधकाम केलं आहे. आता संडास बांधायचाय आणि मग सगळ्या खोल्यांना गिलावा करून घ्यायचं त्यांचं नियोजन आहे.
दिवसाकाठी साडेसात तास इतक मोलाचं काम केल्यानंतर संगीता आणि नीरा यांना प्रत्येकी ३५० रुपये रोजगार मिळतो – इतर मजुरांइतकाच. एकही सुट्टी नाही आणि जर त्यांनी खाडा केला तर पैसे कापले जातात. संगीताचे वडील सलिकराम याच ठिकाणी मिस्त्री म्हणून काम करतात. श्यामूला मजुराहून जास्त पण मिस्त्रीहून कमी, ४०० रुपये रोज मिळतो. आणि सगळ्यात धाकटी आरती जागामालकाकडे स्वयंपाकाचं काम करते आणि महिन्याला ६०० रुपयाची भर घालते. सगळ्यांच्या म्हणजे पाचही जणांच्या कमाईतून महिन्याला या कुटुंबाची १०,००० रुपयाची बचत होत असावी.
इथल्या बहुतेक बांधकामांवर स्त्रिया मजूर म्हणून काम करतात. ५० किलोची सिमेंटची पोती आणि कालवलेला माल पाठीवर, डोक्यावर वाहून नेण्याचं काम असतं त्यांचं. संगीताची थोरली बहीण संतोषी मात्र याला अपवाद ठरली. तिची तीक्ष्ण नजर आणि चिकाटी पाहून अन्सारुद्दिननी तिला भिंतींवरचे थर काढण्याचं प्रशिक्षण द्यायचं ठरवलं. “ती जवळ जवळ ७०% मिस्त्रीचंच काम करत होती. पण मग तिचं लग्न झालं,” ते सांगतात. संतोषी आता तिच्या नवऱ्याबरोबर पुण्यात साधी मजूर म्हणून काम करते, मिस्त्रीचं नाही जी ती बनू शकली असती.
संतोषीचं काम सुटल्यावर ती हानी भरून काढण्यासाठी अन्सारुद्दिनने सलिकरामला भिंतींचे थर खरवडण्याचं काम करण्याची गळ घातली. “म्हणजे मग जेव्हा केव्हा त्याला इमारतींच्या जीर्णोद्धाराची कामं मिळतील तेव्हा संगीताचं कौशल्य तरी चांगल्या पद्धतीने वापरलं जाईल.” ते असंही सांगतात की त्यांच्या २० वर्षांच्या कामात त्यांना आजपर्यंत संगीतासारखी उपजत जाण, कौशल्य असणारं कुणीही भेटलेलं नाही. पण सलिकरामने फारसा काही उत्साह दाखवलेला नाही. त्यामुळे संगीताला कल्पना नसली तरी तिच्या भविष्यात तिला ज्या संधी मिळू शकतात त्याला आळा बसला आहे.
संगीता तिच्या कामात कितीही कुशल असली तरी त्यामुळे तिला होणारा त्रास काही कमी होत नाही. “माझे डोळे आणि खांदे दुखतात. आणि बहुतेक वेळा माझा अवतार एखाद्या भुतासारखा असतो,” भिंतीच्या रंगाची आणि सिमेंटची बारीक धूळ तिचे कपडे माखून टाकते, त्याबद्दल ती सांगते. तिचा रोजचा दिवस सकाळी ६ वाजता सुरू होतो. सगळ्यात पहिलं काम म्हणजे मैदानात २० फुटावर असलेल्या हातपंपावरून १५-२० बादल्या पाणी भरून आणणं. त्यानंतर ती कपडे धुऊन टाकते आणि मग अंघोळ करते. तेवढ्या वेळात आरती नाश्ता आणि दुपारचे जेवण बनवते. कामाहून परतल्यावर ती परत ४-५ बादल्या पाणी भरते आणि मग रात्रीचा स्वयंपाक करते – नूडल्स, चिकन आणि मच्छी खायला तिला सगळ्यात जास्त आवडतं. घरचे पुरुष लागला तर किराणा आणायला घराबाहेर पडतात किंवा मग आराम करतात. श्यामू कधी काळी एका केटररबरोबर काम करत होता त्यामुळे तोही कधी-कधी त्याची पाककला दाखवतो आणि काही पदार्थ बनवतो. पण बहुतेक वेळा “ते त्याच्यापुरतंच असतं,” संगीता सांगते. याबाबत कुणाला टोकावं, किंवा ‘असं का’ हा विचार दोघीही बहिणींच्या मनात कधी आला नाहीये.
तिच्या कामाचं स्वरुप पाहता आणि खरं तर तिनी आताच काही चौकटी मोडल्या असल्या तरी मनोमन संगीताचं प्राधान्य मात्र लग्नालाच आहे. “हे थकवून टाकणारं काम जर मला सोडता आलं तर... हे काम करण्यापेक्षा मी मस्त भटकेन आणि माझ्या आवडीचं काय-काय खाईन,” ती सांगून टाकते. नीराच्या नजरेतली नाराजी लपत नाही. “तिची सगळी स्वप्नं एकदम शाही आहेत. पण वास्तव काय आहे ते तिने समजून घ्यायला हवं.”
संगीताला काही फरक पडत नाही. ती तिच्या लग्नाच्या रुखवतात काय-काय असणार याची मनोमन एक यादी तयार करून ठेवते. (“मुलगी कितीही सुंदर असली तरी हुंडा तर द्यावाच लागणार,” ती हलक्या आवाजात सांगते). मग काय, एक टीव्ही, एक फ्रीज, स्टीलचं कपाट आणि कपडे धुण्याचं मशीन आधीच यादीत आलंय. “हां, चांदीचे पैंजण आणि सुरेख असे रंगीबेरंगी कपडे,” ती म्हणते. तिचं बोलणं तिच्या हसण्यात मिसळून जातं.