"लॉकडाऊनने आम्हाला बरबाद केलं," अब्दुल माजीद भट म्हणतात. "माझ्या दुकानात अखेरचा पर्यटक आला तो मार्चमध्ये."
जूनपासून टाळेबंदी शिथिल करण्यात आली तरीसुद्धा श्रीनगरच्या दल लेकमध्ये भट यांच्या चामड्याच्या वस्तू आणि स्थानिक हस्तकला विकणाऱ्या तीन दुकानांमध्ये एकही गिऱ्हाईक फिरकलेला नाही. आणि आता ५ ऑगस्ट, २०१९ रोजी कलम ३७० रद्द केल्यापासून आलेली मंदी हटता हटत नाहीये. जवळपास वर्ष पूर्ण होत आलंय.
पर्यटनावर या दोन्हीचा विपरीत परिणाम झाला आहे आणि भट यांच्यासारखे बरेच जण उत्पन्नासाठी पर्यटनावरच अवलंबून आहेत.
"बंदच्या ६-७ महिन्यांनंतर पर्यटनाचा मोसम सुरू होणार होता तोच हा कोरोना लॉकडाऊन सुरू झाला," ६२ वर्षीय भट म्हणतात. ते दल लेकच्या बाटापोरा कलान भागाचे रहिवाशी असून या भागातले जाणते वयस्क आहेत. ते लेकसाईड टुरिस्ट ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्षही आहेत, त्यांच्या मते या संस्थेचे जवळपास ७० सभासद आहेत.
श्रीनगरमधील बऱ्याच जणांचं अगदी असंच म्हणणं आहे, कारण तेही या सरोवराच्या पर्यटनकेंद्री अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहेत. पिवळ्या बोटी चालवणारे शिकारावाले, फेरीवाले, दुकानदार अशा सगळ्यांची परिस्थिती गेल्या १२ महिन्यांत पर्यटनाच्या माहितीपत्रकांमध्ये दिसणाऱ्या दल लेकच्या आकर्षक फोटोंच्या अगदी विपरीत झाली आहे. (पाहा: श्रीनगरचे शिकारेः स्तब्ध पाण्यात, खोल गर्तेत)
नेहरू पार्कमध्ये राहणारी २७ वर्षीय हफसा भट ही त्यांच्यापैकीच एक होय, जिने कोरोनामुळे लावलेली टाळेबंदी सुरू होण्यापूर्वी घरून एक लघु उद्योग सुरू केला होता. जम्मू काश्मीर स्वयंरोजगार विकास संस्थेतून २४ दिवसांचं प्रशिक्षण घेतल्यावर हफसाला संस्थेकडून कमी व्याजात रू. ४ लाखांचं कर्ज मिळालं होतं. हफसा श्रीनगरच्या एका शाळेत शिक्षिकाही आहे. "मी ड्रेस आणि कपड्याचा माल खरेदी केला होता. लॉकडाऊन जाहीर झालं तेव्हा मी जेमतेम १०-२० टक्केच मालच विकला होता. आता मला हफ्ते फेडणं देखील मुश्किल झालंय," ती म्हणते.











