कलावती बंदुरकर यांनी त्यांच्या पाचही नातवंडांच्या वेळी लेकींची घरीच बाळंतपणं केलीयेत. त्यांच्या लग्न झालेल्या लेकींची आर्थिक स्थिती त्यांच्याइतकीच बिकट आहे आणि दवाखान्याचा खर्च त्यांना परवडणारा नाही. त्यामुळे मग ते काम त्यांनी स्वतःच केलंय. आम्ही त्यांना भेटायला गेलो तर त्यांच्या घरी १० माणसं रहायला होती. त्या सगळ्यांचं पहायचं वर पिकेनाशी होत असलेली नऊ एकर शेती कसायची आणि दुसऱ्यांच्या रानात ३० रुपये रोजाने कामाला जायचं. काहीच काम नसतं, जसं की आता आहे, तेव्हा जळण गोळा करून आणि विकून त्या दिवसाला फक्त २० रुपये कमावतायत. त्यांच्या म्हशीचं दूध हा त्यांच्याकडचा काही तरी कमाई करण्याचा शेवटचा मार्ग.
त्या सांगतात की त्यांनी त्यांच्या चौथ्या लेकीचं लग्न कसलाही खर्च न करता केलं. आणि आता पाचव्या लेकीचं लग्नही “जास्त काही खर्च न करता जमतंय का” त्याचा प्रयत्नात त्या आहेत. कलावती विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या जळका गावच्या रहिवासी आहेत. त्यांना सात लेकी आणि दोन लेक आहेत. गेल्या १४ वर्षांत देशभरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि लाखभराहून जास्त स्त्रियांना वैधव्य आलं, त्यातल्याच त्या एक.
नुकसान भरपाई नाही
“मला एका पैशाची भरपाई मिळाली नाही जी,” चेहऱ्यावर कायमचं हसू आणि रोखठोक स्वभावाची ही आजी सांगते. आणि याचं कारण कायः त्या जी जमीन कसतात ती त्यांची स्वतःच्या मालकीची नसून, दुसऱ्यांकडून खंडाने कसायला घेतली आहे. त्यामुळे जेव्हा त्यांचे पती परशुराम यांनी कर्जाचा विळखा आणि नापिकीमुळे स्वतःचं जीवन संपवलं तेव्हा त्यांचा मृत्यू आत्महत्या म्हणून नोंदवला गेला, मात्र “शेतकरी आत्महत्या” म्हणून नाही. यामागचा सरकारी तर्कः जर त्यांच्या नावावर जमीन नाहीये, तो शेतकरी नाही. मात्र या कुटुंबाला विदर्भ जन आंदोलन समितीकडून थोडीफार मदत मिळाली आहे.




