आमची गाडी नागपूर रेल्वे स्थानकात पोचली होती. डिसेंबरमधील दुपार होती. जोधपुर-पुरी एक्सप्रेस इंजिन बदलायला नागपूरला थोडा वेळ थांबते. डोक्यावर सामान घेतलेला एक जथ्था फलाटावर होता. ते होते पश्चिम ओडिशाहून निघालेले स्थलांतर करणारे मजूर आणि सिकंदराबादकडे जाणाऱ्या गाडीची ते वाट पाहत होते. ओडिशामध्ये सप्टेंबर आणि डिसेंबर दरम्यान पिकं काढली की अनेक छोटे शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर आपली गावं सोडून तेलंगणातील वीटभट्ट्यांवर काम करायला जातात. अनेक जण आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू अशा इतर राज्यांतही जातात.
याच गटातील एक होता रमेश (त्याने आपले पूर्ण नाव सांगण्यास नकार दिला). त्याने सांगितलं की हे मजूर बारगढ आणि नौआपाडा जिल्ह्यांतले होते. आपापल्या गावांतून ते वाहनांतून कांटाबांजी, हरिशंकर किवा तुरेकाला यांपैकी एका स्टेशनवर येतात आणि नागपूरला जाण्यासाठी गाडीत चढतात. तिथून तेलंगणातील सिकंदराबादकडे जाणाऱ्या गाडीत बसतात आणि तिथून एखाद्या चारचाकी वाहनाद्वारे ते वीटभट्ट्यांवर पोहोचतात.
ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये नवीन भात कुलदैवताला अर्पण करण्याच्या ‘नुआखाई’ (नवान्न) या सणाआधी हे मजूर ठेकेदाराकडून तीन जणांच्या गटाचे २० ते ६० हजार रुपये उचल म्हणून घेतात. त्यानंतर सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान ते वीटभट्ट्यांवर पोहोचतात आणि पुढचे सहा महिने तिथे काम करून पावसाळ्यापूर्वी माघारी परततात. कधी कधी ते ही उचल फेडण्यासाठी दीर्घकाळ इतके कठोर कष्ट करतात की जणू वेठबिगारी असावी!



