रोज सकाळी पेंटापल्ली राजा राव डोक्यावर किंवा पाठीवर लाल मिरचीचं पोतं लादून हळू हळू सहा मजले चढून जातो. पोत्याचं वजन सुमारे ४५ किलो तरी आहे आणि पुढच्या काही तासात तो अशा अनेक खेपा करेल. “या १३० पायऱ्या चढण्यापेक्षा उतरणं तसं सोपं जातं,” २९ वर्षांचा असणारा राजा राव सांगतो. वयाच्या १९ व्या वर्षापासून पाठीचा काटा ढिला करणारं काम तो करतोय.
विश्व कोल्ड स्टोरेजच्या तळमजल्यावर एकदा का या गोण्या उतरवल्या की राव आणि इतर ११ कामगार आवारात थांबलेल्या ट्रकमध्ये त्या लादतात. ट्रक पूर्ण भरला की तो ७ किलोमीटरवरच्या गुंटूरच्या एनटीआर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिशेने प्रस्थान करतो.
“ट्रकमधून पोतं उतरवून शीतगृहात नेण्याचे पोत्यामागे १५ रुपये आणि परत खाली उतरवून ट्रकमध्ये लादण्याचे आम्हाला १० रुपये मिळतात,” राजा राव सांगतो. श्रीकाकुलम जिल्ह्याच्या गारा मंडलातल्या कोरनी गावचा तो रहिवासी आहे. “पण आमच्या हातात पोत्यामागे २३ रुपयेच पडतात. मिस्त्री दोन रुपये कमिशन घेतो.” म्हणजेच वर चढवलेल्या आणि खाली उतरून आणलेल्या प्रत्येक पोत्यामागे १ रुपया.
फेब्रुवारी ते मे मिरचीचा हंगाम जोरावर असतो तेव्हा राजा राव दिवसाला ३०० रुपयांची कमाई करतो. विश्व कोल्ड स्टोरेजमध्ये फक्त मिरची साठवली जाते. बाकी वर्षभर त्याची कमाई शंभर रुपये किंवा त्याहून कमीच असते.












