कडलूरच्या बंदरावर वेणीने वयाच्या १७ व्या वर्षी मासळीचा धंदा सुरू केला होता. आणि तिच्या गाठीला होते केवळ १,८०० रुपये, तिच्या आईने या धंद्यासाठी भांडवल म्हणून दिलेले. आज वयाच्या ६२ व्या वर्षी वेणी या बंदरावच्या लिलावातली एकदम तरबेज व्यावसायिक आहे. खूप अडचणींवर मात करत तिने जसं तिचं घर बांधलं तसंच हा धंदा देखील “एकेक पायरी” रचत तिने उभा केला. आणि त्याचा तिला सार्थ अभिमान आहे.
वेणीचा नवरा व्यसनी होता. तो सोडून गेल्यानंतर तिने आपल्या चार मुलांना एकटीने मोठं केलं. तिची रोजची कमाई फारशी काही नव्हती. जगण्यासाठी कशीबशी पुरेल एवढी. रिंग सिएन मासेमारी सुरू झाल्यावर तिने बोटींमध्ये पैसा गुंतवला. लाखोंचं कर्ज काढलं. या गुंतवणुकीचा परतावा मात्र चांगला आला आणि त्यातूनच तिने आपल्या मुलांची शिक्षणं केली आणि घर बांधलं.
१९९० चं दशक संपत असतानाच कडलूरमध्ये रिंग सिएन मासेमारी लोकप्रिय व्हायला लागली होती. २००४ च्या त्सुनामीनंतर तिचा वापर जास्त वाढला. या प्रकारच्या मासेमारीमध्ये बांगडा, टारली, वेरली किंवा मांदेलीसारख्या माशांच्या थव्यांभोवती वेढा घालून त्यांना जाळ्यात घेतलं जातं.


