घराबाहेर, मोठाल्या चिंचांच्या सावलीत मणीराम मंडावी बासरीचा बांबू तासण्याचं काम करतायत. या बासरीतून वारा गेला की गोड सूर उमटतातच पण जंगली जनावरांना घाबरवायला ही बासरी शस्त्र म्हणूनही उपयोगी पडते. ४२ वर्षीय मंडावी म्हणतात, “त्या काळी वाघ, चित्ते आणि अस्वलं होती जंगलात. पण ही बासरी अशी घुमवली ना की ते प्राणी जवळ यायचे नाहीत.”
ते या बांबूच्या वाद्याला ‘फिरती बासरी’ किंवा छत्तीसगढीमध्ये सुकुड बांसुरी म्हणतात. त्याला फुंकण्यासाठी तोंड नसतं फक्त दोन्ही बाजूला हवा आत जाण्यासाठी भोकं असतात. आणि यातून स्वर उमटण्यासाठी ती हवेत घुमवावी लागते.
मणीराम दिवसाला एक बासरी बनवू शकतात आणि जवळपासच्या शहरांमध्ये जर प्रदर्शनं असतील तर तिथे किंवा हस्तकला संस्थांकडून त्यांना एका बासरीमागे ५० रुपये मिळतात. गिऱ्हाईक याच बासऱ्या नंतर ३०० रुपयाला एक विकत घेतात.
तीस वर्षं झाली असतील, मणीराम यांची एकदा अचानक मंदार सिंग मंडावी या निष्णात बासरी कारागिराशी भेट झाली. “मी १५ वर्षांचा असेन,” ते म्हणतात. “मी जंगलात सरपण गोळा करायला गेलो होतो तेव्हा त्यांनी मला हाक मारली आणि म्हणाले, ‘तू तसाही शाळेत जात नाहीस ना. ये, मी तुला काही तरी शिकवतो’.” आणि मग मणीराम यांनी शाळा सोडली आणि दिवंगत मंडावींसोबत काम करू लागले.
मणीराम जिथे त्यांच्या बासऱ्या बनवतात ती जागा घडबंगाल या त्यांच्या पाड्याच्या वेशीवर आहे. गोंड आदिवासींचा हा पाडा छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्याच्या अबूजमाड (ओरछा) तालुक्यात आहे. वेगवेगळ्या आकाराचे बांबू आजूबाजूला रचून ठेवलेल्या दिसतात आणि अवजारं तापवण्यासाठी आग पेटवलीये, तिचा धूर हिवाळ्याच्या हवेत भरून राहिलाय. एका बाजूला एक तात्पुरती खोली दिसतीये जिथे तयार बासऱ्या आणि छिन्नी, आणि विविध आकाराचे चाकू वगैरे ठेवलेत. मणीराम दिवसांतले आठ तास इथे काम करतात – बांबूचा हवा तेवढा तुकडा कापायचा, गुळगुळीत करून तासायचा आणि त्यानंतर विविध अवजारं गरम करून त्यावर फुलांची किंवा भौमोतिक आकारांचं कोरीव काम करायचं. उष्णतेचा वापर करून बांबूवर गडद आणि फिकी नक्षी तयार करायची.
मणीराम जेव्हा बासऱ्या घडवत नसतात तेव्हा आपल्या दोन एकर शेतात काम करत असतात. आपल्या पाच जणांच्या कुटुंबासाठी – आपली बायको आणि तिघं किशोरवयीन मुलं – पावसाच्या पाण्यावर येणारा भात हे त्यांचं पीक. ते सांगतात की त्यांची मुलं मिळेल ती कामं करतात पण त्यांना काही ही कला (जी केवळ त्यांच्या समुदायातले पुरुष वापरतात) शिकण्यात रस नाही.
बासऱ्यांसाठी लागणारा बांबू इथून साधारणपणे तासाच्या अंतरावर असणाऱ्या नारायणपूर शहरात मिळतो. “वीसेक वर्षांपूर्वी जंगल अगदी इथे होतं आणि आम्हाला बांबू अगदी सहज मिळायचा. आता उपयोगाचं काही हवं असेल तर आम्हाला किमान १० किलोमीटर आत जावं लागतं,” ते म्हणतात. “जंगल घनदाट होतं, सागुन (साग) आणि जांभूळ आणि मोडिया (स्थानिक फळ)ची मोठमोठाली झाडं होती. आता वृक्ष राहिलेच नाहीयेत. या बासऱ्या बनवणं दिवसेंदिवस अवघड होत जाणार आहे.”
चिंचेच्या गार सावलीतल्या त्यांच्या बासरीच्या कार्यशाळेत आम्ही गप्पा मारत होतो. सगळं काही भरपूर होतं तो काळ मणीराम यांना आठवतो, ते दुःखी होतात, त्यांचे डोळे ओलावतातः “ससे यायचे आणि हरणं आणि कधी कधी एखादी नीलगाय. रानडुकरं तर आता दिसेनाशी झाल्यात जमा आहेत... उद्या माझ्या लेकरांनी जर विचारलं ‘जंगलाचत काहीच कसं नाही? जंगलातले प्राणी आणि झाडं कुठे गेली?’ त्यांना द्यायला आमच्यापाशी काहीही उत्तर नाही.”
अनुवादः मेधा काळे