“कोणाला माहित,” आपल्या गावात कोरोना विषाणू येणार का यावर २३ वर्षांच्या दुभती जनावरं पाळणाऱ्या प्रफुल्ल कालोकरचं हे उत्तर. “पण त्याचे आर्थिक परिणाम मात्र इथे आधीच येऊन पोचले आहेत.”
प्रफुल्लच्या गावात, चांदणीमध्ये, रोज ५०० लिटर दूध संकलित होतं ते २५ मार्चला कोविड-१९ मुळे टाळेबंदी झाली त्यानंतर आता शून्यावर आलं आहे. आर्वी तालुक्यात असलेल्या ५२० उंबरा असणाऱ्या या गावात बहुतेक कुटुंब नंद गवळी समाजाची आहेत.
नंद गवळी हे हंगामी पशुपालक आहेत. वर्धा जिल्ह्यातल्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या भोवती असणाऱ्या ४०-५० गावांमध्ये त्यांचं वास्तव्य आहे. गवळी म्हणूनही ओळखला जाणारा हा समाज गवळाऊ या देशी वाणाची गुरं पाळतो. गाईचं दूध, दही, लोणी, तूप आणि खव्याचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा हा समाज करतो. “नंद गवळ्यांचा किमान २५,००० लिटर दुधाची विक्री घटलीये,” लॉकडाउननंतर १५ दिवसांच्या काळात समाजाचं किती नुकसान झालंय याचा अंदाज प्रफुल्ल सांगतो.
नाशवंत असणाऱ्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत प्रचंड घट आल्याने दुग्धव्यवसायाला जबर फटका बसला आहे. घरातला दुधाचा वापर तर कमी झालाच आहे पण खानावळी, हॉटेल आणि मिठाईची दुकानं बंद झाल्यामुळे या पदार्थांना उठावच मिळत नाहीये. राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळाची शाखा असणाऱ्या मदर डेअरीसारख्या मोठ्या उद्योगांनी देखील दुधाचं संकलन थांबवलं आहे.
प्रफुल्लच्या अंदाजानुसार या आर्थिक नुकसानाचे दूरगामी परिणाम होणार आहेत – या व्यवसायाच्या पुरवठा साखळीतल्या प्रत्येकालाच रोज हजारो रुपयांचं नुकसान सहन करावं लागत आहे. पीएचडीचं शिक्षण घेणारा प्रफुल्ल हा त्याच्या नंद गवळी समाजातला एकमेव विद्यार्थी आहे. नागपूर विद्यापीठात तो वर्ध्यातील कापसाचे अर्थकारण या विषयात संशोधन करत आहे.






