मानसिक आरोग्यसेवा कायदा २०१७ लागू झाल्यावर सीमा यांच्या कुटुंबाला चांगल्या दर्जाच्या आणि पर्याप्त प्रमाणात सेवा त्यांच्या घरापासून सहज अंतरावर उपलब्ध असायला हव्या होत्या. यामध्ये समुपदेशन, उपचार, उपचारानंतर समाजात रुळण्यासाठी निवासी घरं तसंच सर्व सेवा असणारी वसतिगृहं यांसारख्या सेवांचा समावेश आहे.
सामुदायिक पातळीवर, १९९६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाने (डीएमएचपी) प्रत्येक जिल्ह्यात एक मानसोपचार तज्ज्ञ, एक मानसशास्त्रज्ञ, एक मानसोपचार परिचारिका आणि मनोविकारांवर काम करणारा सामाजिक कार्यकर्ता असणे अनिवार्य केले होते. याशिवाय, तालुका स्तरावरील सामुदायिक आरोग्य केंद्रात पूर्णवेळ क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट किंवा मनोविकारांवर काम करणारा सामाजिक कार्यकर्ता असायला हवा होता.
पण यवतमाळमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील (पीएचसी) एमबीबीएस डॉक्टरच मानसिक विकारांचं निदान करतात. डॉ. विनोद जाधव, यवतमाळचे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम समन्वयक, पीएचसीमध्ये त्यासाठी पात्र कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याचं मान्य करतात. ते म्हणतात, “त्यांच्याकडून [एमबीबीएस डॉक्टर] एखादी केस हाताळली जात नसेल, तरच ते जिल्हा रुग्णालयात शिफारस करतात."
जर सीमा यांना आपल्या गावापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा मुख्यालयात समुपदेशन सेवांचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना दोन्ही वेळा तासभर बस प्रवास करण्याची तयारी ठेवावी लागेल, सोबत खर्च होईल तो वेगळा.
"जर मदत घ्यायला तासभर बसप्रवास करावा लागणार असेल तर लोक ती मदत घेणं टाळतात कारण उपचारांदरम्यान केंद्राला बरेचदा भेट द्यावी लागते,” कापसे म्हणतात. आधीच लोकांना मदतीची गरज आहे हे मान्य करणं जड जातं, त्यात या गैरसोयीची भर पडते.
जाधव म्हणतात की या कार्यक्रमाअंतर्गत त्यांचा संघ दरवर्षी यवतमाळच्या १६ तालुक्यांमध्ये मनोविकारांशी झगडत असलेल्या लोकांची ओळख करण्यासाठी एक माहिती शिबिर आयोजित करतो. ते म्हणतात, “त्यांना आमच्याकडे येण्यास सांगण्यापेक्षा ते जिथे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं जास्त चांगलं. आमच्याकडे पुरेशी वाहनं किंवा पैसा नाही, पण आम्ही जमेल तेवढं करतो.”
राज्याच्या जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमासाठी केंद्र आणि राज्य अशा दोन्ही शासनांनी तीन वर्षांत जवळपास रु. १५८ कोटी निधी मंजूर केला होता. महाराष्ट्र शासनाने त्यापैकी अंदाजे ८.५ कोटी म्हणजे जेमतेम ५.५ टक्के निधीच खर्च केला.
महाराष्ट्राच्या जिल्हा कार्यक्रमाचा घटता निधी पाहता विजय आणि सीमासारखे राज्यातील अनेक जण अशा शिबिरात पाऊल ठेवण्याची शक्यता कमीच आहे.