हसन अलींचं आयुष्य, त्यांच्या पायाखालील सरकत्या वाळू प्रमाणेच ठिसूळ आहे. ब्रह्मपुत्रेने जमिनीची धूप केल्यानंतर, बहुतेक चार-रहिवासी, नदीकिनारी किंवा नदी पलीकडे स्थानांतर करतात, परंतु अलींनी नदी किनार्यावरील पानिखैती गावातून या चार वर स्थानांतर करून अनिश्चिततेकडे उलटा प्रवास केला.
आसाम राज्यातील कामरूप जिल्ह्याच्या महटोली पंचायतीचे पानिखैती एक गाव आहे.
“तीन वर्षांपूर्वी पूर आणि जमिनीची धूप होऊन माझे घर वाहून गेल्याने माझ्याकडे एक पैसादेखील नव्ह्ता, तेव्हा, जिवंत राहण्यासाठी मी या चार वर येऊन निदान डोक्यावर छप्पर तरी बांधू शकलो,” अली सांगतात.
ब्रह्मपुत्रेतून चार चे एक दृश्य: अशा रेत बंधार्यांनी आसामच्या एकूण क्षेत्रफळाचा ५ टक्के भूभाग व्यापलेला आहे
अली चार वर स्थायिक झाले तेव्हा त्यांच्याकडे तीन बिघा शेतजमीन (सात बिघा एक हेक्टरच्या बरोबरीने) होती; पण गेल्या तीन वर्षांत धूप होऊन संपूर्ण शेत नष्ट झाले. आता जरी चार वर रहात असले, तरी ह्या वाळूची सातत्याने धूप होत राहते, पुन्हा स्थानांतर करायची वेळ आल्यास, कुठे जायचं ह्याची अलींना कल्पना नाही.
आसामच्या पूर्वेपासून पश्चिमेकडे ७२८ किलोमीटर पर्यंत वाहणार्या अफाट ब्रह्मपुत्रा नदीमुळे चार निर्माण होताना दिसतात. चार म्हणजे उपनद्यांमध्ये नैसर्गिकरित्या निर्माण होणारे रेतबंधारे किंवा वाळूचा छोटा टापू. राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या ५ टक्के भूभाग ह्या टापूंनी व्यापलेला असून आसामच्या १४ जिल्ह्यांतील ५५ ब्लॉक्समध्ये हे टापू पसरलेले आढळतात.
२०१४ च्या आसाम मानव विकास अहवालानुसार, नदी आणि तिच्या उपनद्या यांच्या प्रवाह प्रक्रियेमुळे चार निर्माण होणे ही त्या प्रवाहाची अभिन्न प्रक्रिया आहे. पूराच्या वेळी निलंबित कण आणि पात्रातील गाळ एकत्र येऊन हा बदामाच्या आकाराचा भाग तयार होतो. या भूभागाची समृद्ध रेताड माती मोहरी, ऊस, ताग, शेंगदाणे, तीळ, उडीद, बटाटे आणि इतर भाज्या पिकविण्यासाठी उत्तम आहे. पण ह्या चार टापूंची उंची ही कधीही सर्वाधिक पूर पातळीपेक्षा जास्त उंच नसते, त्यामुळे ह्या टापूचे अस्तित्व अस्थिर असून ते नष्ट होण्याचा धोका कायम असतो.
आसाम सरकारच्या चार क्षेत्र विकास संचालनालयाद्वारे प्रकाशित सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार (२००२-०३; सर्वांत अलीकडील उपलब्ध असलेला लोकसंख्या डेटा), ब्रह्मपुत्रेच्या खोर्यात २,२५१ चार गावे आहेत. त्यांची लोकसंख्या २४ लाखाहून अधिक असून त्यातील ९० टक्के लोक हे तत्कालिन पूर्व बंगालमधून विस्थापित झालेले मुस्लिम परिवार आहेत.
नावेतून चार चे एक दृश्य: नदी किनार्यावरून भूटभूटी (एक यांत्रिक देशी बोट) ने हसन अलींच्या चार पर्यंत पोहोचायला जवळजवळ २५ मिनिटे लागतात
वसाहतीवादाच्या ब्रिटीश सरकारने, कृषी जमिनीतून महसूल उकळण्याच्या प्रयत्नात, पूर्व बंगालातील गरीब शेतकर्यांना ह्या चार कडे स्थलांतर करण्यास प्रोत्साहन दिले. इथे वाढलेल्या पिढ्या बंगालीसह आसामी भाषाही बोलू लागल्या आणि जनगणेत ते आसामी भाषिक म्हणून सूचीबद्ध झाले.
अलींच्या चारची तीन वेगवेगळी नावे आहेत – पानिखैती (पूर्वेचा भाग, जिथे ते राहतात), लाखिचार (मध्य भाग) आणि मोरिशाकंदी (पश्चिमेकडील भाग). प्रत्येक विभाग विस्थापित निवासींच्या मूळ गावाचा संदर्भ दर्शवितात.
नदी किनार्यापासून भूटभूटीने (एक यांत्रिक देशी बोट) चार पर्यंत पोहोचायला जवळजवळ २५ मिनिटे लागतात. नदी किनारा आणि चार यांच्या दरम्यान आजची नदीची रूंदी तीन किलोमीटर आहे – दहा वर्षांपूर्वी प्रथम जेव्हा चार निर्माण झाले तेव्हा नदी किनार्यापासून चार आणि पानिखैती गावास वेगळं करणारा ब्रह्मपुत्रेचा केवळ एक छोटा ओढा होता. इथे राहणार्यांच्या मते, आज जवळजवळ दोन किलोमीटर रूंद आणि दोन किलोमीटर लांब चार वर अंदाजे ८०० विस्थापितांची कुटुंबे स्थायिक झालेली आहेत.
घरोघरी आम्हांला केवळ वृद्ध, माता आणि मुले आढळली. तरूण मुली घरगुती कामात मदत करतात आणि अल्पवयातच, १४ किंवा १५ व्या वर्षी त्यांचं लग्न करून दिलं जातं. बहुतेक तरूण मुले कामासाठी स्थलांतर करतात. ते गुवाहाटी किंवा उत्तर-पूर्वेच्या शहरांमध्ये किंवा अगदी दूर दिल्ली, मुंबई किंवा चेन्नईतही, बांधकाम कामगार, सुरक्षा रक्षक, औद्योगिक कामगार किंवा हॉटेल कर्मचारी म्हणून काम करायला जातात. ते सर्व विस्थापन आणि त्यानंतरच्या दु:खांचे अनुभव सांगतात. अलींच्या मोठा मुलानेही उच्च माध्यमिक परिक्षा पूर्ण करून गुवाहाटीत रोजंदारीवर काम करण्यासाठी स्थलांतर केलेले आहे.
अनिश्चिततेमुळे आलेली दिशाहिनता: हसन अली त्यांच्या चार शेजार्यांसह
वृद्ध स्थलांतर करत नाहीत कारण कंत्राटदार त्यांना रोजदारीवर काम देण्यायोग्य समजत नाहीत. वृद्ध सामान्यपणे स्वत:च्या शेतात किंवा शेतात मजदूर म्हणून काम करतात. अली आता ६० वर्षांचे असावेत, तेही कुटुंबासह राहतात. त्यांच्या उपजीविकेचं साधन आहे मासेमारी, आणि त्यातून त्यांना महिन्याकाठी कसेबसे रू. १,५०० मिळतात. त्यांचा मुलगा कुटुंबाला हातभार म्हणून अजून रू. १,५०० पाठवितो. अलींची सात मुले असून, ४ मुलींची लग्नं झाली आहेत, पाचवी मुलगी १३ वर्षांची असावी, आता तिचेही लवकरच लग्न लावून दिले जाईल.
आम्ही चारवर पोहोचलो तेव्हा अलींकडे आमच्याशी बोलायला वेळ होता कारण त्या दिवशी त्यांना नदी पलीकडे आठवड्याच्या बाजारात जायचे नव्हते. बाजाराचे ठिकाण चार निवासींसाठी एकमेकांना भेटण्याचे एक स्थानही आहे. “आमच्या रोजच्या गरजांसाठी आम्ही या बाजारावर अवलंबून आहोत. तिथे येण्या-जाण्याचा रोजचा खर्च रू. २० आहे आणि माझ्याकडे पैसे नाहीत,” अली सांगतात. सरकारी फेरी सेवेचा अभाव असल्याने, खाजगीपणे चालणार्या यांत्रिक बोटीच येथे दळणवळणाचे एकमेव साधन आहेत.
व्हिडिओ: हसन अली अस्थिर वाळूवरील त्यांच्या अनिश्चित आयुष्याची कहाणी सांगतात
जिल्हा प्रशासनासह चार क्षेत्राचे एक संचालनालय विशिष्ट विकास कार्यक्रम लागू करते. पानिखैती चार वर दोन उच्च प्राथमिक शाळा आहेत. ज्या विद्यार्थ्याला अभ्यास करायचाय त्याने रोजचा खर्च करून, नदी ओलांडून शाळेत जावे – जे शाळेतील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमुख कारण आहे.
पानिखैती मध्ये एक छप्पर नसलेले आरोग्य-उपकेंद्र देखील आहे. इमारतीच्या आजूबाजूला वाढलेल्या गवती झाडांमुळे ती एक वापरात नसलेली जागा असल्यासारखी दिसते. बाळंतपणात सहाय्य करणारी परिचारिका (ANM) चार वर कधी कधी येते, पण ती या केंद्रात जाण्याऐवजी कोणाच्या तरी घरून काम करण्यास प्राधान्य देते, असं इथले लोक सांगतात. आरोग्याच्या आपातकालीन प्रसंगी चार-निवासी, नदी ओलांडून तीन किलोमीटर अंतरावरील, सोंताली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतात.
चार मध्ये मूलभूत सोयींचा अभाव आहे: पानिखैती मध्ये हे बिना छताचे एकमेव ‘आरोग्य उप-केंद्र’ आहे
“सप्टेंबर [२०१६] च्या पूराच्या गंभीर परिस्थितीत, कोणत्याही आरोग्य अधिकार्याने आमची भेट घेतली नाही. प्रशासनाने मदतीच्या नावाखाली पूरग्रस्तांना फक्त दोन किलो पशु-खाद्य वाटले,” अली सांगतात. तागाच्या काठ्यांपासून बनविलेल्या भिंतींवरील पूराच्या पातळीच्या खुणा वेळोवेळी आलेल्या पूरात घरे कुठपर्यंत बुडाली होती ते दर्शवितात.
तागाच्या काठ्यांपासून बनविलेल्या भिंतींवरील पूराच्या पातळीच्या खुणा वेळोवेळी आलेल्या पूरात घरे कुठपर्यंत बुडाली होती ते दर्शवितात
जवळजवळ १० कुटुंबांसाठी पिण्याच्या पाण्याचं फक्त एकच हापसं आहे, ज्याची निगराणी ते पदर खर्चाने करतात
उघड्यावर मलविसर्जन ही येथे साधारण गोष्ट असून, पूरानंतर विशेषत: घरोघरी होणारा अतिसाराचा त्रास येथे सामान्य आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जवळजवळ १० कुटुंबे फक्त एका हापशावर अवलंबून आहेत, ज्याची निगराणी ते पदर खर्चाने करतात.
“आमचे चार हे दोन विधानसभा मतदार संघांमध्ये समान विभागलेले आहे – दक्षिण किनार्यावरील बोको आणि उत्तर किनार्यावरील चेंगा. काही सरकारी चुकांमुळे चेंगा मतदारसंघातील लोक फार काळापासून दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) शिध्यापासून वंचित राहिलेले आहेत,” अली सांगतात. त्यांची नोंदणी बोको मतदारसंघात असून बीपीएलच्या तांदळाशिवाय त्यांना कोणताही लाभ मिळत नाही.
इथे वीज तर दूरच पण कोणत्याही कुटुंबात साधा सौर दिवाही नाही. ते रॉकेलवर अवलंबून असून लिटरमागे रू. ३५ मोजतात – अलींच्या कुटुंबाची महिन्याची गरज ५-७ लीटर आहे. इथे रेडिओ असणे म्हणजे श्रीमंतीचे लक्षण वाटते.
“इथली वाळू निदान २० वर्षे टिकली असती तर आयुष्य थोडं सुसह्य झालं असतं. पण इथली वाळू १० वर्ष देखील टिकत नाही. खडतर प्रयत्न करून कुठे स्थिरस्थावर होतो, तर लगेच धूप होण्यास सुरूवात होते आणि आम्हांला स्थानांतर करावेच लागते,” अली सांगतात.
"ही झाली इथल्या प्रत्येक चार-रहिवाशाची कहाणी, पण माझी कहाणी अजून पुढे आहे..." अली त्यांच्या दुसर्या मुलाबद्दल सांगतात. १८ वर्षांचा दुसरा मुलगा, खालच्या आसाममधील बारपेटा जिल्ह्याच्या एका कॉलेजमध्ये १२ वीत विज्ञान शाखेत शिकतोय. सध्या तो वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करतोय. अली आपल्या मोठ्या मुलाच्या शिक्षणात त्याची काही मदत करू शकले नाही. पण त्यांच्या या दुसर्या मुलाने, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने, दोन वर्षांपूर्वी माध्यमिक परीक्षेत, एवढ्या सगळ्या विपरित परिस्थितीतही ८३ टक्के गुण मिळविले.
"त्याने मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळविण्याचा निर्धारच केलाय," अली सांगतात. "त्याचे शिक्षक म्हणतात की मेडिकलचा अभ्यासक्रम पूर्ण करायला कमीत कमी ३० लाख रूपयांची आवश्यकता असणार आहे. माझ्या मुलाने प्रवेश परीक्षा पास केली तरी तो मेडिकलचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करणार आहे याची मला काहीही कल्पना नाही."
पण अलींच्या डोळ्यांमध्ये अजूनही आशा दिसते की, कधीतरी आयुष्य एका चांगल्या वळणावर आपल्याला घेऊन जाईल.
छायांकन : रत्ना भराली तालुकदार