न पडणारा म्हणूनच ठाऊक असणारा पाऊस आणि स्वाभाविकच त्यामुळे न मिळणारं पाणी… खरं तर कच्छचं हे वैशिष्ट्य. पण हे लोकगीत मात्र आपल्यापुढे आणतं कच्छचं ‘गोड पाणी’, अर्थात, तिथली सांस्कृतिक विविधता आणि ती जोपासणारी माणसं.
कच्छ, सिंध आणि सौराष्ट्र या भागावर हजाराहून अधिक वर्षांपूर्वी लाखो फुलाणी (जन्म: इस ९२०) हा राजा राज्य करत होता. आपल्या प्रजेची काळजी करणारा आणि काळजी घेणारा असा हा राजा. या प्रेमळ, उदार राजाची लोक आजही आठवण काढतात ती या शब्दांत… ‘लाखा तो लाखो मळशे, पण फुलाणी ए फेर (लाखो नावाची माणसं लाखो असतील, पण जनतेच्या हृदयावर राज्य करणारा लाखो फुलाणी मात्र एकच आहे).’
हे गीत लाखो फुलाणीबद्दल सांगतं, त्याचबरोबर कच्छच्या संस्कृतीतच असणार्या धार्मिक सलोख्याविषयीही बोलतं. कच्छमध्ये अशी अनेक प्रार्थनास्थळं आहेत, जिथे हिंदू आणि मुस्लिम, दोघंही जातात. हाजीपीर वलीचा दर्गा, देशदेवीमध्ये असलेलं आशापुरा देवीचं मंदिर, ही केवळ काही उदाहरणं. या गीतात फुलाणी राजाने बांधलेल्या कारा किल्ल्याचाही उल्लेख येतो.
कच्छी लोकगीतांच्या संग्रहातल्या या आणि इतरही गीतांनी प्रेम, तळमळ, कुणाला गमवण्याचं दुःख, लग्न, मातृभूमी ते स्त्रीपुरुष समानता, लोकशाही अधिकार या आणि अशा अनेक विषयांना स्पर्श केला आहे.
पारी कच्छमधल्या ३४१ लोकगीतांचं ‘मल्टिमीडिया अर्काइव्ह’ तयार करत असून त्यामध्ये ही गीतं प्रकाशित आणि जतन करणार आहे. सोबत असलेल्या ऑडिओ फाइलमध्ये स्थानिक कलाकारांनी मूळ भाषेत हे गीत गायलं आहे. गीताला साथ देणारे वादकही स्थानिकच आहेत. वाचकांसाठी हे गीत गुजराती लिपीत दिलं आहे, त्याचबरोबर त्याचा मराठी आणि पारीवर प्रकाशित होणाऱ्या इतर १४ भाषांमध्ये अनुवाद केला आहे.
कच्छचा विस्तार ४५ हजार ६१२ चौरस किलोमीटर आहे. अत्यंत नाजूक परिसंस्था असलेल्या या प्रदेशाच्या दक्षिणेला समुद्र आहे, तर उत्तरेला वाळवंट. भारतातल्या सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असलेला हा जिल्हा रखरखीत आहे. पाणीटंचाई आणि कोरडा दुष्काळ त्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे.
वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने नांदतात. त्यापैकी बहुतेक जण हजारभर वर्षापूर्वी कच्छमध्ये स्थलांतरित झालेल्या लोकांचे वंशज आहेत. त्यात हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, जैन आहेत, रबारी, गढवी, जाट, मेघवाल, मुटवा, सोधा राजपूत, कोली, सिंधी, दारबर अशा अनेक उपजातीही आहेत. अस्सल मऊ सुती कपडे, त्यावरचं भरतकाम, मोकळ्या हवेच्या झोताबरोबर दूरवर पोहोचणारं संगीत आणि इतर सांस्कृतिक परंपरांमधून कच्छचा संपन्न सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित होत असतो. १९८९ मध्ये स्थापन झालेली ‘कच्छ महिला विकास संघटन’ (केएमव्हीएस) ही स्वयंसेवी संस्था स्थानिक लोककलाकार आणि त्यांच्या कला, परंपरा जपण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देते, मदत करते.



