शेताच्या मधोमध पाच फूट बाय दहा फूट विटा-मातीचा एक चबुतरा, त्यावरच्या पाटीवर लिहिलेलंयः ‘चेतन दादाराव खोब्रागडे. जन्मः ८/८/१९९५. मृत्यूः १३/५/२०१८.’ चेतनच्या आई-वडलांनी त्याच्या स्मृतीत बांधलेली ही समाधी.
२३ वर्षांचा चेतन बहिणीच्या लग्नासाठी थांबला होता. तिच्यानंतर स्वतःही लग्न करण्याचा त्याचा मानस होता. “जवळपास वाघ आहे आम्हाला माहित होतं,” २५ वर्षांची पायल सांगते. “पण आम्हाला स्वप्नातही असं कधी वाटलं नव्हतं की तो एका वाघाच्या हल्ल्यात मरून जाईल, आणि तेही आमच्या स्वतःच्या रानात.”
मे महिन्यातला उन्हाचा कार. गायींसाठी हिरवा चारा आणायला म्हणून चेतन आमगावच्या आपल्या रानात गेला. संध्याकाळचे ७ वाजले तरी तो परत आला नाही म्हणून त्याचा धाकटा भाऊ साहिल आणि चुलत भाऊ विजय त्याला शोधायला बाहेर पडले. चेतनचा विळा जमिनीवर पडलेला त्यांना दिसला. खोब्रागडे कुटुंबाचं शेत त्यांच्या घरापासून रस्त्याच्या पलिकडे ५०० मीटरवर देखील नसेल, पुढे सगळं सागाचं आणि बांबूचं जंगल.
ते दोघंही “वाघ, वाघ,” असं ओरडू लागले आणि त्यांनी इतरांना मदतीसाठी बोलावलं. थोडं पुढे, कड्याळूचा चाऱ्यामध्ये चेतनचा जखमी देह त्यांच्या नजरेस पडला. सगळ्या गावाला माहित असलेल्या, या भागात बस्तान बसवलेल्या वाघानेच त्याला ठार केलं होतं.
“आम्ही तो वाघ जंगलात जाताना पाहिला,” त्यांच्या रानापासून जंगलाकडे जाणारा रस्ता आम्हाला दाखवत विजय सांगतो. तो एक भला मोठा, पूर्ण वाढ झालेला वाघ होता, आणि कदाचित तो तहानलेला आणि भुकेला असावा.
सामुदायिक मालकीच्या जागांवर घाला
या लहानशा गावातला सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये पुढाकार घेणारा तरूण मुलगा असा गेल्याने आमगाव (इथले लोक आमगाव-जंगली म्हणतात) मधले लोक भीतीने खचून जाऊन एकदम सुन्न झाले. अगदी पाऊस सुरू झाल्यानंतरही रानं रिकामीच – कुणाची रानात जायची हिंमतच होईना.
वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातलं हे गाव बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये आहे. वन्यजीव सुरक्षा कायद्यानुसार बफर झोनमध्ये गायरानांच्या वापरावर, चराईवर आणि बांधकामावर मर्यादा आहेत. संरक्षित वनांमधील कोअर एरिया, जिथे माणसांच्या प्रवेशावर वन खात्याचं नियंत्रण असतं आणि बफरच्या बाहेरचं वन जिथे गावं आहेत त्यामधला पट्टा म्हणजे बफर झोन.
नागपूरहून सुमारे ५० किमी अंतरावर असणारा बोर व्याघ्र प्रकल्प हा देशातला सर्वात नवा आणि आकाराने छोटा प्रकल्प आहे. केवळ १३८ चौ. किमी क्षेत्र असणारं हे राखीव वन २०१४ मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर करण्यात आलं.












