दोन वर्षांपूर्वी रुखसाना खातूनने बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात आपल्या सासरी, मोहन बाहेरामध्ये रेशन कार्डासाठी अर्ज केला होता. त्याच महिन्यात तिच्या घराचं बांधकाम पूर्ण झालं होतं. रुखसानाने आधार कार्डासाठी देखील अर्ज केला होता, ते तिला मिळालं. तिने या पूर्वी दोन वेळा रेशन कार्डासाठी अर्ज केलेला आहे पण ते काही आलंच नाही.
२०१८ च्या ऑगस्ट मध्ये तिने तिसऱ्यांदा अर्ज केला आणि ती रेशन कार्ड येण्याची वाट पहात होती.
रुखसाना, वय ३०, आणि तिचा पती मोहंमद वकील, वय ३४, दोघेही खूप कष्टाने आपलं घर चालवत होते. रुखसाना पश्चिम दिल्लीतल्या पटेल नगर मध्ये पाच घरात घरकाम करत होती आणि वकील शिलाईकाम. दोघांचं मिळून महिन्याला २७,००० रुपये घरात येत होते. घरातील सहा सदस्य (तीन मुली वय १२, ८, २ वर्षे आणि एक १० वर्षाचा मुलगा) आणि २००० रुपये आईसाठी गावी पाठवून देखील, हे जोडपं थोडीफार शिल्लक महिन्याला मागे टाकू शकत होते.
कष्टाचं फळ मिळत होतं. वकीलने पश्चिम दिल्लीतल्या नवीन रणजित नगर मध्ये स्वतःचं छोटेखानी शिलाईचं छोटेखानी दुकान सुरु केलं होतं. त्याला आशा होती कि तो नोकरीतून मिळणाऱ्या १२,००० रुपयांहून अधिक कमावू शकेल. ही १५ मार्च २०२० ची गोष्ट आहे.
त्या नंतरच्याच आठवड्यात संपूर्ण भारतात देशव्यापी टाळेबंदी लागली.
रुखसाना कामाला जायची त्यांनी तिला कामावर येऊ नको म्हणून सांगितलं आणि लवकरच तिच्या लक्षात आलं की टाळेबंदीच्या काळात रुखसानाला पगार मिळणार नव्हता. तिने एका घरी स्वयंपाकाचं काम सुरूच ठेवलं. पाच घरी काम करून मिळणाऱ्या १५००० ऐवजी तिला केवळ २,४०० रुपये मिळाले. जून महिन्यात तिची ती नोकरी पण गेली पण तिने लगेच दुसरीकडे साफसफाई आणि स्वयंपाकाचं काम मिळवलं. नवीन ठिकाणची मालकीण ‘सुपर स्प्रेडर’ बद्दलच्या बातम्या ऐकून चिंतित होती. ती मशिदीत जाते का याची खोदून खोदून चौकशी करत असे. “मला त्याचं काही वाईट वाटलं नाही. सगळेच कोरोनाला भीत होते, तिची चिंता मला कळत होती,” रुखसाना सांगते.








