“मी खूप तणावात आहे पण काम तर करावं लागणारच. जे काही फुटकळ मिळतंय ते मिळवून माझं घर चालवायचंय,” चाळिशीची सेंथिल कुमारी सांगते. रोज १३० किलोमीटर प्रवास करून ती मच्छी विकायला जाते. कोविड-१९ ची टाळेबंदी लागली तेव्हा तर तिच्यावरचा कामाचा बोजा जास्तच वाढला. कारण मासेमारी, वाहतूक, बाजारपेठा आणि सगळंच ठप्पच होऊन गेलं होतं. “माझ्यावरचं कर्ज वाढत चाललंय. ऑनलाइन वर्गासाठी माझ्या मुलीला स्मार्टफोन घ्यायचाय, तोही मला परवडण्यासारखा नाहीये. सगळ्याचंच ओझं झालंय,” ती म्हणते.
तमिळनाडूच्या मायिलादुतरई जिल्ह्यातलं वनगिरी हे मच्छीमारांचं गाव आहे. सेंथिल कुमारी इथेच राहते. विविध वयोगटातल्या ४०० बाया इथे मच्छीचा धंदा करतात. काही जणी डोक्यावर पाटीत मासळी ठेवून वनगिरीत गल्लोगल्ली जाऊन विक्री करतात, काही रिक्षा, व्हॅन किंवा बस करून आसपासच्या गावांना जाऊन मासळी विकतात. तर काही जणी इतर जिल्ह्यात जाऊन तिथल्या बाजारात मासळी विकतात.
सेंथिल कुमारी आणि इतर बायांच्या कमाईवर त्यांची घरं चालू आहेत. वेगवेगळी आव्हानं त्या पेलत असतात पण महासाथीने मात्र त्यांना जबर फटका बसला आहे. घरच्या साध्या साध्या गरजा भागवण्यासाठी त्यांना सावकारांकडून आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय त्यांच्यापाशी उरला नव्हता. कर्ज परत करण्याचे मार्गही फारसे नाहीत. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं घ्यायचं आणि मग जास्त व्याज भरायचं असं सगळं चक्र सुरू झालं होतं. “मला वेळेवर पैसे फेडता येत नाहीत त्यामुळे व्याज वाढत चाललंय,” वनगिरीतली ४३ वर्षीय मच्छी विक्रेती अमृता सांगते.
असं असलं तरी मासळी विक्रेत्या स्त्रियांच्या आर्थिक गरजा, त्यांची भांडवलाची गरज या बाबी राज्याच्या धोरणामध्ये दिसत नाहीत. त्यात अधिकाधिक पुरुष बेरोजगार होत असल्यामुळे मच्छीमार समुदायाबाहेरच्या स्त्रियाही मासळी विक्रीच्या धंद्यात येऊ लागल्या आहेत. आणि याचा परिणाम म्हणजे मच्छीची किंमत वाढलीये, वाहतूक खर्च वाढलाय आणि उत्पन्न मात्र ढासळायला लागलंय. पूर्वी दिवसभर मच्छी विकली तर त्यातून २००-३०० रुपयांची कमाई होत होती तीच आता १०० रुपयांवर आली आहे. कधी कधी तर तोटाही सहन करावा लागू लागलाय.
जगणं त्यांच्यासाठी खडतर आहे. तरी, रोज पहाटे उठायचं, बंदरावर जायचं, मासळी विकत घ्यायची, लोकांची दूषणं ऐकायची आणि तरीही जमेल तितकी चांगली विक्री करायची हा नेम काही त्यांनी सोडला नाहीये.
अनुवाद: मेधा काळे