३३ वर्षीय अरेटी वासूंवर २३ फौजदारी खटले दाखल आहेत. त्यांची आई, ए. सत्यवती, वय ५५ यांच्यावर आठ. आंध्र प्रदेशातल्या तुंडुर्रू या आपल्या गावी वासूंना किती तरी प्रलोभनं दाखवण्यात आली, टवाळी करण्यात आली आणि तीनदा त्यांना तुरुंगाची हवाही खायला लागलीये. सप्टेंबर २०१६ पासून त्यांनी तुरुंगात एकूण ६७ दिवस काढलेत. तर त्यांच्या आईने ४५.
“मी काय केलं, तर माहितीच्या अधिकाराखाली एक अर्ज दाखल केला,” ते अगदी साधेपणाने सांगतात.
मात्र त्या एका कृतीचा परिणाम काही तितका साधा नाही. पोलिसांचे छापे, धमक्या, लोकांना घरातून हुडकून काढून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून कोठडीत टाकणे हे सगळं आता तुंडुर्रूमध्ये सर्रास चालू आहे. हेच चित्र शेजारच्या भीमावरम मंडलमधल्या जोन्नलगरुवु आणि नरसापूर मंडलच्या के बेतपुडी या गावांमध्येही दिसू लागलंय. ही सगळी गावं पश्चिम गोदावरी जिल्ह्यात येतात.
इथले गावकरी – यातले बहुतेक छोटे शेतकरी, मच्छिमार आणि मजुरी करणारे आहेत – गोदावरी मेगा अॅक्वा फूड पार्क प्रा. लि. (GMAFP गोदावरी सागरी अन्न महा-प्रक्रिया केंद्र) या प्रकल्पाची उभारणी करण्याला विरोध करत आहेत. त्यांच्या मते या प्रकल्पामुळे हवा आणि पाणी दोन्हीचं प्रदूषण होत आहे आणि त्यांची जीविका धोक्यात आली आहे. या भव्य अन्न प्रक्रिया केंद्रामध्ये मासे, कोळंबी आणि खेकड्यासारख्या सागरी अन्नावर प्रक्रिया करून ते युरोपीय महासंघ आणि अमेरिकेला निर्यात करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी गठित झालेल्या ‘गोदावरी प्रक्रिया केंद्रविरोधी आंदोलन समिती’चं ठाम म्हणणं आहे की “या सगळ्या प्रक्रियांसाठी रोज किमान दीड लाख लिटर पाणी लागणार आहे.” त्यांचं असंही म्हणणं आहे की “रोज या केंद्रातून प्रदूषणकारी घटक असणाऱ्या ५०,००० लिटर पाण्याचं उत्सर्जन होणार आहे.” हे सगळं घाण पाणी गोंटेरू प्रवाहात सोडलं जाणार आहे जिथून ते समुद्राला जाऊन मिळेल.










