तिने रात्रीचं जेवण आटोपलं, पण रोजसारखं टीव्ही बघायचा नाही, असं ठरवलं. मुलांनी आज व्हेजिटेबल्स इन शेझवान सॉस विथ राईसची फर्माईश केली होती. आज सकाळी भाजीवाल्याकडे लाल किंवा पिवळी शिमला मिरची नव्हती. "मंडी बंद कर दिया, मॅडम. लॉकडाऊन तो हैं ही, उपर से कर्फ्यू. सब्जी कहाँ से लाए? ये सब्जी भी अभी खेत से लेके आते हैं," गाडीवर त्याच त्या भाज्या घेऊन येतो अशी तिने तक्रार केली, तेंव्हा त्या भाजीवाल्याने आपली व्यथा मांडली.
जीवन आपली कशी परीक्षा पाहतंय, यावर तो बरंच काही बोलत राहिला, पण तिने ऐकणं थांबवलं होतं. तिचं डोकं रात्रीचं जेवण मागणीनुसार कलात्मकतेने कसं बनवता येईल, यात लागून होतं. दिवसाअखेरीस चायनीज-थाई ग्रेव्हीबरोबर कोकची सोय केल्याने मुलांनी कुरकुर केली नाही, त्यामुळे तिला आनंद झाला. पण, गेले काही दिवस तिला टीव्ही पाहून बरं वाटत नव्हतं.
वृत्तवाहिन्यांचा तिला प्रचंड तिटकारा होता. पडद्यावर तेच ते चित्र वारंवार दाखवत राहतात. झोपडपट्ट्यांमध्ये पाणी न मिळणारे गरीब लोक, संरक्ष साहित्याशिवाय काम करणारे सफाई कर्मचारी, आणि त्याहून वाईट - घरी जाताना मध्येच किंवा शहरांमध्ये अडकून पडलेले लाखो उपाशी स्थलांतरित लोक, औषधोपचार आणि अन्नाअभावी मरून पडताहेत, काही जण आत्महत्या करताहेत आणि कित्येक लोक आंदोलन करीत, मागण्या करीत, रस्त्यावर दंगे करीत आहेत.
सैरावैरा पळणाऱ्या वाळवीसारखं हे दृश्य कोणी किती वेळ पाहू शकेल? ती आपलं लक्ष परत व्हॉट्सॲपमध्ये घालते, जिथे तिच्या एका ग्रुपमधील मैत्रिणी आपल्या नवलाईच्या पाककलेचं प्रदर्शन करताहेत. तीही आपल्या डिनर टेबलवरून एक फोटो काढून पाठवते. दुसऱ्या ग्रुपमध्ये लोक मुंबईच्या ब्रीचकँडी क्लबजवळील समुद्रात बागडणाऱ्या डॉल्फिन्सचे, नवी मुंबईत आलेल्या बगळ्यांचे, कोळीकोड मधील रस्त्यांवर फिरणाऱ्या मलबार उदमांजराचे, चंदिगढमधील सांभरचे व्हिडीओ शेअर करीत आहेत. अचानक, तिला आपल्या मोबाईलवर चढून येणाऱ्या लाल मुंग्यांची एक रांग दिसून येते…



