“इन्किलाब जिंदाबाद,” एका शेतकरी नेत्याने घोषणा दिली. “जिंदाबाद, जिंदाबाद,” शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. १८० किलोमीटरचा लांबचा पल्ला पार करून आझाद मैदानात पोचलेल्या थकल्या भागल्या शेतकऱ्यांच्या घोषणांचा जोर जरासा कमी झाला होता. १२ तारखेला संपन्न झालेला हा मोर्चा ६ मार्चला नाशिकमध्ये सुरू झाला, तेव्हाचा बुलंद आवाज काहीसा नमल्यासारखा वाटत होता. तळपत्या उन्हात आठवडाभर चालून, पायाला फोड येऊन पाय रक्ताळले तरी, रात्री मोकळ्यावर झोपायला लागलं असलं आणि पोटात कसेबसे दोन घास गेले असले तरी “इन्किलाब जिंदाबाद” चा नारा पुकारल्यावर त्याला प्रतिसाद येणारच.
मैलाचा दगड ठरेल असा हा मोर्चा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची शेतकरी संघटना असणाऱ्या अखिल भारतीय किसान सभेने आयोजित केला होता. नाशिक शहरातल्या सीबीएस चौकातून २५००० आंदोलकांसोबत मोर्चाची सुरुवात झाली. मुंबईला पोचेपर्यंत शेतकऱ्यांची संख्या ४० हजारापर्यंत पोचली होती असं किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले सांगतात जे आयोजकांपैकी एक आहेत.
सगळेच दमले होते मात्र त्यांचा निश्चय काही ढळला नव्हता.
जसजसे ते मार्गक्रमण करत होते, राज्यभरातून शहापूर (मुंबईपासून ७३ किमी) आणि ठाण्याला (मुंबईपासून २५ किमी) शेतकरी सामील होत होते.
“सरकार आम्हाला जशी वागणूक देतंय तितका काही हा प्रवास असह्य नव्हता,” टेंपोला रेलून उभे असलेले विलास बाबर सांगतात. भिवंडी तालुक्यातल्या सोनाळे गावात (आझाद मैदानापासून ५५ किमी) १० मार्चच्या दुपारी सगळे शेतकरी जेवणासाठी थांबले होते. जेवण त्यांनीच रांधलं होतं, प्रत्येक तालुक्याने आपापला शिधा गोळा करून आणलेला होता.








