“माझ्या लहानपणी लोक सांगायचे आपलं बेट एका मोठ्या प्रवाळावर आहे. खालच्या मोठ्या प्रवाळाने बेट उचलून धरलंय. आणि आमच्या चहुबाजूंचं खाऱ्या पाण्याचं सरोवर महासागरापासून आमचं संरक्षण करतं,” बित्रा बेटावर राहणारे ६० वर्षांचे मच्छीमार बी. हैदर सांगतात.
“आमच्या लहानपणी ओहोटीच्या वेळी आम्हाला प्रवाळ बघायला मिळायचं,” बित्राचेच आणखी एक मच्छीमार ६० वर्षीय अब्दुल खादर सांगतात. “फार सुंदर दिसायचं. आता मात्र फार काही राहिलेलंच नाहीये. या मोठ्या लाटा थोपवायला ते प्रवाळ गरजेचं आहे.”
लक्षद्वीप द्वीपसमूहांवरची परिस्थितिकी, उपजीविका, आयुष्यं आणि कहाण्या आणि कल्पनाविश्वाच्याही केंद्रस्थानी असणारं हे प्रवाळ हळू हळू झिजत चाललंय. इथल्या मच्छीमारांनी गेल्या काही दशकांमध्ये याशिवाय इतरही अनेक सारे बदल होताना पाहिलेत.
“साधी सरळ गोष्ट आहे. निसर्ग बदललाय,” अगात्तीचे ६१ वर्षीय मुनियामीन के. के. सांगतात. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी मासेमारीला सुरुवात केली. “त्या काळात पाऊस बरोबर वेळेवर यायचा [जून महिन्यात] पण आता मात्र आम्हाला तो कधी येईल याची खात्री देता येत नाही. अलिकडे मासे पण कमी मिळतात. पूर्वी मासे धरण्यासाठी आम्हाला इतकं आतपर्यंत जावं लागत नसे. माशांचे थवे जवळच असायचे. पण आता मात्र लोक दिवस दिवस, कधी कधी तर अनेक आठवडे दर्यावर असतात, मासे शोधत.”
अगात्तीहून बित्रा बोटीने सात तासांच्या अंतरावर आहे. केरळच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात असलेली ही बेटं भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहेत. या बेटांवरच्या मच्छिमारांचं कसब वाखाणण्यासारखं आहे. लक्षद्वीप या शब्दाचा मल्याळम आणि संस्कृतमध्ये अर्थ होतो एक लाख बेटं. आपल्या आजच्या काळात इथे केवळ ३६ बेटं आहेत आणि तीही जास्तीत जास्त ३२ किलोमीटरच्या क्षेत्रात. पण या द्वीपसमूहांचं पाणी मात्र ४,००,००० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलंय. सागरी जीव आणि सागरी संपत्तीने समृद्ध.
एकच जिल्हा असणाऱ्या या बेटांवरची दर सातवी व्यक्ती मच्छीमार आहे – ६४,५०० लोकसंख्येतल्या ९,००० हून जास्त जणांनी आपला हाच व्यवसाय असल्याचं सांगितलं आहे (जनगणना, २०११).






