रिटा अक्कांकडे पाहिलं की जीवन आपल्याला काय शिकवू पाहतं ते समजतं– आणि ते हे की जगण्याला एक हेतू असतो. या अपंग सफाई कामगार (त्यांना ऐकू किंवा बोलता येत नाही) विधवा आहेत, त्यांची मुलगी १७ व्या वर्षी तिच्या आजीबरोबर घर सोडून गेली. ४२ वर्षीय रिटाअक्कांच्या आयुष्यावर एकटेपणाचं सावट असलं तरीही त्या एकाकी पडणार नाहीत.
रोज सकाळी उठून रिटा अक्का – त्यांच्या वस्तीतील सगळे जण त्यांना या नावाने ओळखतात (काहीजण त्यांना ऊमाची, बोलू न शकणाऱ्यांसाठी वापरण्यात येणारा अवमानकारक शब्द, अशी हाक मारतात) – चेन्नई महानगर पालिकेत आपल्या कचरा गोळा करण्याच्या कामावर नेमाने जातात. मात्र कधीकधी त्या दिवसभराच्या कष्टातून अंग दुखत असल्याची त्यांची तक्रार असते. त्यांनी आपल्या कचरा गोळा करणाऱ्या खास हातगाडीच्या बाजूवर पाहिलं, की त्यांची आपल्या कामावरील निष्ठा दिसून येते. त्यांनी त्यावर आपलं नाव तीनदा गिरवलंय – तीन वेगवेगळ्या रंगांत. दिवसा अखेरीस त्या शहरातील कोट्टुरपुरम या भागात हाउसिंग बोर्ड क्वार्टरमधल्या आपल्या लहानशा, रिकाम्या घरी परत जातात.
प्राण्यांची भेट घेण्यापूर्वी रिटा अक्का यांचे दोन थांबे ठरलेले आहेत, कुत्र्यांसाठी बिस्किटं विकत घ्यायला एक छोटं दुकान आणि मांजरांसाठी चिकनची छटन विकत घ्यायला एक
तरीही, या मधल्या वेळात त्यांना आपल्या जगण्याचा हेतू गवसलाय. काम उरकल्यावर आपल्या अंधाऱ्या घरात स्वतःला कोंडून घेण्यापूर्वी रिटा भटके कुत्रे आणि मांजरींना गोळा करून त्यांना खाऊ घालण्यात आणि त्यांच्याशी गप्पा मारण्यात बराच वेळ घालवतात. कोट्टुरपुरमच्या रस्त्यांवरचे कुत्रेदेखील संध्याकाळी रिटा अक्का काम संपवून त्यांना कधी भेटायला येतात, याची वाट पाहत असतात.
त्या मूळच्या तिरुवन्नामलई (२०११ जनगणनेनुसार या जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्या जवळपास ८०% होती) या ननगरातल्या आहेत. त्या साधारण वीसेक वर्षांपूर्वी आपल्या पालकांसोबत कामाच्या शोधात चेन्नईला आल्या. नेमकी तारीख त्यांना आठवत नाही. मात्र तेंव्हापासून बहुतेक वर्षं त्या बऱ्याच ठिकाणी अगदी कवडीमोल मोबदल्यावर घरकाम करायच्या, हे त्यांच्या पक्कं ध्यानात आहे. सात वर्षांपूर्वी त्यांनी चेन्नई महापालिकेत (आता बृहत् चेन्नई महापालिका) कंत्राटी कामगार म्हणून कामाला सुरुवात केली. रू. १०० रोजीपासून सुरुवात करून त्या आज दरमहा रू. ८,००० कमावतात.
रिटा कोट्टुरपुरममधील किमान सहा मोठे रस्ते ब्लिचिंग पावडर, झाडू आणि कचऱ्याची बादली अशा साहित्याच्या मदतीने स्वच्छ करतात. हे त्या कुठलेही ग्लोव्ह, जोडे किंवा संरक्षक साहित्य न वापरता करतात. गोळा केलेला केरकचरा महापालिकेच्या पेट्यांमध्ये टाकण्यात येतो. इथून महापालिकेच्या व्हॅन आणि लॉरी हा कचरा पुनःप्रक्रियेसाठी घेऊन जातात. रिटा सकाळी ८:०० पासून कामाला लागतात आणि दुपारपर्यंत सफाई पूर्ण करतात. त्या म्हणतात की रस्ते झाडत असताना त्यांच्या एका डोळ्याच्या दृष्टीवर परिणाम झाला. आणि अनवाणी चालून त्यांच्या पायांना फोड आले आहेत. बाकी त्या अगदी ठणठणीत आहेत, असं त्या ठणकावून सांगतात.
त्यांच्या कमाईचा बराचसा हिस्सा कुत्रे आणि मांजरांसाठी खाऊ विकत घेण्यात खर्च होतो. शेजाऱ्यांच्या मते त्या त्यांच्यावर रोज रू. ३० खर्च करत असतील, मात्र त्या स्वतःहून याबद्दल काहीच सांगत नाही.
प्राण्यांची भेट घेण्यापूर्वी रिटा अक्का यांचे दोन थांबे ठरलेले आहेत, कुत्र्यांसाठी बिस्किटं विकत घ्यायला एक छोटं दुकान आणि मांजरांसाठी चिकनचे उरलेसुरले तुकडे म्हणजेच छटन विकत घ्यायला एक. ही छटन साफ करून रिटा अक्कांसारख्या गिऱ्हाइकांना १० रुपयांना विकली जाते.
रिटा यांच्याकरिता आपल्या श्वान आणि मार्जार सवांगड्यांसोबत राहून मिळणारा आनंद हा त्यांच्यावर केलेल्या खर्चापेक्षा खूप मोठा आहे.
त्यांचा नवरा जाऊन वर्षं झालीत – रिटा अक्कांना एकतर कधी ते आठवत नाही किंवा त्याबद्दल बोलायचं नसेल – आणि तेंव्हापासून त्या स्वतःच्याच भरवशावर आहेत. शेजाऱ्यांच्या मते तो दारूडा होता. त्यांची मुलगी त्यांना एखाद्या वेळी भेटायला येते.
तरीही, रिटा आनंदी दिसतात – आणि कुत्रे सोबत असले की त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणखीनच खुलतं.
अनुवाद: कौशल काळू