साठ फूट खोल खणल्यानंतरही पांडुरंग अडसूळ आणि त्यांच्यासोबतच्या कामगारांना “भांडंभर देखील पाणी लागलं नाही,” त्यांच्या विधवा पत्नी इंदुबाई सांगतात. “ते गावासाठी पाणी आणाया निघाले, अन् बघा, काय होऊन बसलं.”
२०१२ साली कापूस आणि सोयाबीनसाठी पाण्याची विवंचना कायमची दूर व्हावी म्हणून पांडुरंग यांनी बँकेचं तब्बल १ लाखाचं कर्ज काढलं, नातेवाइकांकडून अजून थोडे पैसे घेतले. विहिरीला पाणी लागलं की भरघोस पीक येणार, मग सगळ्यांचे पैसे परत करता येईल असा त्यांचा विचार होता.
पण दुष्काळी मराठवाड्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या भोगाजी गावातल्या धरणीच्या पोटात पाणीच नव्हतं. कर्जाच्या चिंतेने पांडुरंग विहिरीपेक्षा खोल गर्तेत गेले. २०१४ साली (नक्की कधी ते इंदुबाईंना आठवत नाही), त्यांनी घरातच फास घेतला. “मी रानात होते,” त्या सांगतात. “त्यांनी स्वतःला कोंडून घेतलंय असं सांगत शेजारी धावत आले...”
दुःखातून सावरत नाही तोपर्यंतच इंदुबाईंपुढे इतर संकटं वाढून ठेवली होतीः इंदुबाईंच्या पतीची आत्महत्या सरकारच्या विशिष्ट निकषांनुसार (ज्यांचा मुख्य उद्देश आहे, आत्महत्यांचे आकडे कमी करणं) ‘पात्र’ धरण्यात आली नव्हती. जर पांडुरंग यांनी जीव देताना सरकारी निकष पाळले असते तर इंदुबाईंना राज्य शासनाकडून रु. १ लाख नुकसान भरपाई मिळाली असती – ३०,००० रुपये रोख आणि ७०,००० रुपये बँकेत मुदत ठेवीच्या रुपात.









