नोसुमुद्दिन रडत होता. पहिल्यांदाच घर सोडून तो दूर चालला होता – आपल्या घरापासून १०-१२ किलोमीटरवर, आई-वडलांना सोडून. सात वर्षांच्या लहानग्यासाठी हे खूपच अवघड होतं. “मला खूप वाईट वाटत होतं आणि मी रडत होतो. घर आणि घरच्यांना सोडून जायचं या विचाराने माझे डोळे भरून येत होते,” ते सांगतात.
त्यांची राखाल (गुराखी किंवा राखुळी) म्हणून पाठवणी होत होती. “आमच्या घरी खूपच गरिबी होती आणि माझ्या आई-वडलांकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता,” आता ४१ वर्षांचे असणारे नोसुमुद्दिन सांगतात. “आम्हाला पोटभर खायला पण मिळायचं नाही. बहुतेक वेळा दिवसातून एकदाच जेवायचो, तेही रानात उगवणाऱ्या फुकटचा भाजीपाल्यातलं काही तरी. आमच्या गावातली मोजकी लोकंच दिवसांतून दोन वेळा जेवायची.” शिक्षण वगैरे तर कल्पनेच्या पलिकडचं होतं. “त्या काळी मी शाळेत जायचा विचारसुद्धा करू शकत नव्हतो. माझ्या घरची परिस्थिती इतकी हालाखीची होती की शाळा वगैरे कसं परवडणार?”
तर, तेव्हाच्या धुबरी जिल्ह्यातल्या उरारभुई गावातलं आपलं साधंसं झोपडीवजा घर सोडून ते मनुल्लापारा या गावी पोचले. बसला ३ रुपयांचं तिकिट पडलं. तिथे ७ गायी असणाऱ्या, १२ बिघा (सुमारे ४ एकर) जमीन असणाऱ्या एका इसमाने त्यांना कामावर घेतलं होतं. “राखाल म्हणून काम करणं काही सोपं नाही. त्या वयात मला कित्येक तास सलग काम करावं लागायचं. कधी कधी पोटभर जेवण पण मिळायचं नाही. किंवा शिळंपाकं मिळायचं. भुकेने कळवळून मला रडू यायचं,” नोसुमुद्दिन सांगतात. “सुरुवातीला मला काहीच पगार मिळायचा नाही. जेवण आणि निजायला जागा तेवढी होती. माझ्या मालकाला वर्षाला १००-१२० मण भात होत असे. चार वर्षांनंतर त्यांनी मला दोन मण (सुमारे ८० किलो) भात द्यायला सुरुवात केली.” खरिपाचा हंगाम संपला की त्यांना हे धान्य मिळत असे.
आसाम आणि मेघालयाच्या सीमेवरील ग्रामीण भागात काही दशकांपूर्वीपर्यंत लहान मुलांना एखाद्या कुटुंबाकडे राखाल किंवा राखुळी म्हणून पाठवण्याची रीत होती. गरीब घरातली मुलं श्रीमंत शेतकऱ्यांना ‘देऊन टाकली’ जात असत आणि हे शेतकरी त्यांना गुरं राखण्याच्या ‘कामावर घेत.’ ही व्यवस्था स्थानिक भाषेत ‘पेटभात्ती’ (अक्षरशः पोटभर भात) म्हणून ओळखली जाते.











