“नुसतं चाक फिरवलं म्हणजे काही मडकं घडवता येत नाही; आपण जे बनवतो त्याला गोंजारायला पाहिजे,” सुदामा पंडित म्हणतात. ते बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील रसूलपूर सोहवान या गावातील एका वाडीवरचे कुंभार आहेत. “हे अगदी आपल्या पोटच्या मुलाला वाढवण्यासारखं आहे बघा... पहिले तर त्याला काळजीपूर्वक घडवून आकार देणं, आणि नंतर त्याला भट्टीतील गरमी देऊन मजबूत बनवणं.”
आता ५४ वर्षांचे असलेले सुदामा वयाच्या १५ व्या वर्षी मातीकाम शिकले. “माझे आजोबा फार कुशल कारागीर होते, पण माझ्या वडलांना या कामात रस नव्हता. त्यामुळे माझ्या आजोबांनीच मला ही कला शिकवली, आणि गावकरी मला या कलेचा ‘खरा’ वारस मानतात – सुदामा कुंभार,” ते अभिमानाने सांगतात.
भल्या पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटात सुदामांचा दिवस सुरु होतो. त्यांच्या पत्नी सुनीता देवी अंगणाची झाडलोट करतात, चाकातून आणि इतर उपकरणांतून आदल्या दिवशीची वाळलेली माती काढतात. सुदामा नवीन गारा तयार करतात. “जेवढं लवकर काम सुरु करावं तेवढं चांगलं – मी बनवलेल्या वस्तू वाळायला पुरेसा वेळ मिळाला पाहिजे,” ते म्हणतात.
सुदामा जी माती वापरतात ती जवळपास २५ किमी दूर, मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कुरहानी भागातील तुर्की गावातून आणली जाते. “आमचे आजोबा होते तेंव्हा आम्ही घराजवळच ३० फूट खोल जमीन खोदायचो. आम्हाला चांगली माती मिळत असे,” सुदामा म्हणतात. त्यांच्या मते पूर्वी कुंभारकाम कौटुंबिक व्यवसाय असल्याने बरेच हात मदतीला येत असत. आता त्यांना दिवसभर एवढं खोल खोदणं परवडत नाही. शिवाय, ते म्हणतात, खोदण्यापेक्षा माती विकत घेणं जास्त सोयीस्कर असतं: “आता जमिनीतून माती खोदून काढायची यंत्रं आली आहेत आणि आम्हाला पैसे देऊन माती विकत घेता येते. पण, अशा मातीत दगड असल्याने ते काढून टाकण्यात बराच वेळ जातो.”










