शिवाजी ठोमरे यांची एकूण १३ एकर शेती आहे. कापूस, ज्वारी आणि मक्यासाठी नांगरट केलेल्या त्यांच्या रानातून फिरताना आम्ही एका वाळवी लागलेल्या झाडांच्या पट्टयात शिरलो. तिथे करपून लिंबाएवढ्या झालेल्या पिवळ्या फळांचा सडा पडला आहे. “ही मोसंबी,” त्यातलं एक फळ उचलत शिवाजी सांगतात. “प्रत्येक झाडाला नीट वाढ व्हायला दररोज ६० लिटर पाणी लागतं. आता तीच मोसंबी पूर्णपणे करपून गेली आहे.”
आपल्या दोन एकर रानात त्यांनी मोसंबीच्या ४०० झाडांची लागवड केली होती – म्हणजेच उन्हाळ्यात दिवसाला २४,००० लिटर पाणी, पावसाळ्यात चांगला पाऊस आणि हिवाळ्यातही तितकंच पाणी लागणार.
इतर झाडांना या तुलनेत कमी पाणी लागतं. उदाहरणार्थ, डाळिंब. डाळिंबाच्या एका झाडाला उन्हाळ्यात दररोज २० लिटर पाणी लागतं.
औरंगाबाद शहराच्या सीमेवर १३०० लोकांची वस्ती असलेल्या कारजगावात ठोमरेंच्या वडिलांनी २००२ साली हा बाग लावला. ठोमरे त्यावेळी अवघे २० वर्षांचे होते. ठोमरेंना तो काळ चांगला आठवतो. “त्यावेळी पाण्याचा एवढा तुटवडा नव्हता,” ते म्हणतात. त्याकाळी भरवशाचा पाऊस पडत असे आणि घरच्या विहिरीलाही पुरेसं पाणी होतं. “मोसंबीचा बाग लावण्याचा निर्णय हुशारीचा आणि फायद्याचा होता.”
औरंगाबाद महामार्गापासून जालन्यापर्यंतच्या ६० किमीच्या पट्टयात प्रत्येक गावात मोसंबीच्या बागा पसरल्या आहेत. प्रत्येक बाग २००० च्या दशकात लावलीये आणि आता त्या जगवणं कठीण होऊन बसलंय.
मोसंबीचं फळ फार कष्टाने हाती पडतं. फळं लागण्याअगोदर ४-५ वर्षे झाडं जोपासावी लागतात. मात्र, एकदा फळं यायला सुरुवात झाली की पुढील २५-३० वर्षं मोसंबीचं दुबार उत्पादन होतं. शिवाजींच्या बागेत मात्र २००६ ते २०१० या चार वर्षांतच मोसंबी निघाली.




