“कधीपण येऊन पहा, अर्धी माणसं कायम गावाबाहेर असतात. काही हैदराबादच्या अंबरपेट बाजारात, काही विजयवाडाच्या बेझंट रोडवर, बाकीचे वाशी मार्केटला, तर काही मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ, किंवा दिल्लीच्या पहाडगंज मध्ये - सगळे जण टोपल्या अन् झुले विकत असतात,” मायलापिल्ली पट्टाय्या सांगतात, जे स्वतः नुकतेच उत्तरांचल मधून विक्रीची एक फेरी आटोपून परतले आहेत.
४२ वर्षांच्या पट्टाय्या यांनी २० वर्षांपूर्वी, या गावातील इतरांप्रमाणे नायलॉनच्या दोरीपासून टोपल्या, पिशव्या, झोपाळे आणि पाळणे बनवायला सुरुवात केली. तोपर्यंत, मासेमारी हा कोव्वाडमधील (जनगणनेत जेरूकोव्वाड म्ह्णून नोंद) मुख्य व्यवसाय होता. कोव्वाड हे श्रीकाकुलम् जिल्ह्यातील रणस्थलम् मंडलात बंगालच्या उपसागराला लागून असलेलं, २५० लोकांचं एक छोटं किनारी गाव आहे.
मग, पाण्याच्या प्रदूषणाने या भागातील जलसंपदा उद्ध्वस्त केली. ९० च्या दशकात या गावाहून फार तर १० किमी दूर असलेल्या पायडीभीमावरम् या गावात औषध निर्माते कारखाने उदयास आले. त्यांनी भूजल तसेच समुद्राचं पाणी प्रदूषित केलं आहे असं अभ्यास दाखवतात.
भारताचं पर्यावरण खातं औषध निर्मात्या कारखान्यांना त्यांच्या धोकादायक सांडपाण्यामुळे ‘लाल’ प्रवर्गात वर्ग करतं. ९० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काही वर्षांत जागतिक स्तरावर औषध निर्माण क्षेत्र वाढू लागलं, तेव्हा हा उद्योग “भारतीय अर्थव्यवस्थेतील आघाडीचा उद्योग होता,” असं औषध निर्माण प्रदूषणाचा भारतीय समुदाय आणि पर्यावरणावर होणारा परिणाम नावाच्या एका अहवालात नमूद केलं आहे. या उद्योगाचं केंद्र होतं आंध्र प्रदेश आणि तेलंगण. या अहवालामध्ये “औषधनिर्माण उद्योगाच्या आंध्र आणि तेलंगणातील अनिर्बंध विस्ताराचे सातत्यपूर्ण विपरित परिणाम” नोंदवले आहेत.









