नर्मदाबाई आपल्या खोपटात पाट्यावर टोमॅटो वाटत होत्या. त्यांचे पती मोहन लाल टोमॅटो बारीक चिरून फोडी कापडावर ठेवत होते.
“आम्ही याची चटणी वाटतो. शेजारच्या घरातले लोक कधी कधी आम्हाला भात देतात. नाहीच तर आम्ही फक्त चटणी पोटात ढकलतो. पोटातली गुरगुर तर थांबते,” एप्रिलच्या अखेरीस मी या कुटुंबाला भेटलो तेव्हा नर्मदाबाई म्हणाल्या होत्या. त्या शेजारच्या इमारतींमध्ये राहणाऱ्यांबद्दल बोलत होत्या. जम्मूच्या पश्चिमेकडे असणाऱ्या दुर्गानगरच्या मागच्या बोळातल्या तीन वस्त्यांमध्ये राहणाऱ्या कामगारांना या इमारतीचे रहिवासी अधून मधून धान्य देतात.
२५ मार्चला टाळेबंदी जाहीर झाली आणि नर्मदाबाई चंद्रा आणि मोहन लाल चंद्रा यांना अन्न मिळवणं दुरापास्त झालं – तसंही फेब्रुवारीपर्यंत हिवाळ्यात त्यांना फारसं काही काम मिळालंच नव्हतं. त्यामुळे गाठीला फारसा पैसाही नव्हता.
४८ वर्षांच्या नर्मदाबाई जम्मूमध्ये बांधकामावर रोजंदारीने काम करतात. महिन्यातून २०-२५ दिवस काम मिळतं आणि दिवसाला ४०० रुपये मजुरी. मोहन लाल ५२ वर्षांचे आहेत आणि दिवसाला ६०० रुपये कमवतात. “फेब्रुवारीत नुकती कामं मिळायला सुरुवात झाली होती, आणि टाळेबंदी लागली,” मोहन लाल म्हणाले. “मूठभरच होतं, तेही संपलं.”
मोहन लाल यांच्या शेजारच्या खोलीमध्ये त्यांचे धाकटे बंधू अश्विनी कुमार चंद्रा राहतात. चाळिशी पार केलेले अश्विनीकुमार आणि त्यांची पत्नी राजकुमारी, वय ४०. अश्विनी देखील गवंडीकाम करतात आणि दिवसाला ६०० रुपये मजुरी कमवतात. त्यांची पत्नी राजकुमारी बांधकामावर, आसपासच्या शेतात आणि बागांमध्ये काम करतात आणि दिवसाला त्यांना ४०० रुपये मजुरी मिळते.
ही दोन्ही कुटुंबं छत्तीसगडच्या जांजगीर-चंपा जिल्ह्याच्या नवग्रह तालुक्यातल्या बारभाटा गावाहून इथे जम्मूत आली आहेत. नर्मदाबाई आणि मोहन लाल २००२ साली इथे आले – दुष्काळाने त्यांना गाव सोडणं भाग पडलं. “दुष्काळाने सगळ्याचाच घास घेतला,” मोहन लाल मला सांगतात, “जनावरं, आमच्या उपजीविका आणि सगळ्याचंच जगणं. आम्ही इतकं काही गमावलं की आम्हाला गाव सोडण्याशिवाय काही पर्यायच नव्हता.”







