“ए, तिकडे काय करतीयेस?” त्यांनी विचारलं. नजरेच प्रश्नचिन्ह आणि आवाज एकदम कडक.
आणि क्षणात माझ्या लक्षात आलं की त्या नदीतीरावर त्यांना फारसं कुणी भेटत नसणार.
अनिरुद्ध सिंग पातार यांनी नदीच्या दिशेने त्या किनाऱ्यावर उडी घेतली खरी. पण अचानक ते थांबले आणि वळून मला म्हणालेः “तिथे मढी जाळतात. कालच कुणी तरी गेलंय. तिथे नको थांबायला. ये माझ्या मागे!”
बरोबरच होतं म्हणा. आणि गेलेल्या माणसाने कष्टाने मिळवलेली शांती आपण कशाला भंग करायची, मीही विचार केला.
दोन मीटर उंचीच्या त्या नदीतीरावरून नदीच्या दिशेने मी जायला लागले. माझं सगळं लक्ष त्यांच्यावर होतं. पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात कांग्साबाती नदीत गुडघाभर पाण्यात ते अगदी चपळाईने चाललेले होते. त्यांच्या गतीने जाता जाता माझी मात्र दमछाक होत होती.
साठीला टेकलेल्या त्यांच्या वयाच्या मानाने ते अगदी चपळ होते आणि मी थक्क होऊन त्यांच्या हालचाली पाहत होते. मग मात्र अगदी न राहवून मी त्यांना विचारलं, “काका, नदीत काय करताय?”
कंबरेला ओचा करून बांधलेलं पांढरं कापड सैलावून त्यातली एक कोळंबी हळूच बाहेर काढत ते अगदी लहान मुलाच्या उत्साहाने मला सांगतात, “चिंगरी पाहिलीस? हे आहे [आमच्या कुटुंबाचं] आजचं जेवण. शुक्नो लोंका (सुकी मिरची) आणि रोसून (लसूण) घालून ही कोळंबी परतायची. गरम भाताबरोबर एकदम भारी लागते.” खरंच भारीच लागत असणार.






