वरसोवा जेट्टीवर काही दिवसांपूर्वी एक दिवस सकाळी रामजीभाई खाडीच्या काठावर बसले होते. मी त्यांना विचारलं ते काय करतायत. “टाइमपास,” ते म्हणतात. “मी एवढा घरी नेणार आणि खाणार.” नुकत्याच पकडलेल्या एका छोट्या टेंगड्याकडे बोट दाखवत ते म्हणाले. बाकीचे मच्छीमार आदल्या रात्री खाडीत टाकलेली जाळी साफ करत होते – त्यांच्या जाळीत मासे नाही भरपूर प्लास्टिकच घावलं होतं.
“खाडीत मासे धरणं आजकाल जवळ जवळ अशक्य झालं आहे,” भगवान नामदेव भांजी म्हणतात. त्यांच्या आयुष्याची ७० हून अधिक वर्षं मुंबई के वेस्ट वॉर्डाच्या वरसोवा कोळीवाडा या मच्छिमार गावात गेली आहेत. “आम्ही लहान होतो ना तेव्हा इथले किनारे अगदी मॉरिशससारखे होते. पाण्यात नाणं टाकलं ना तर ते आरपार दिसायचं... पाणीच तेवढं नितळ होतं.”
भगवान यांच्या शेजाऱ्यांच्या जाळ्यात जी काही मासळी घावतीये – आणि आता जाळी समुद्रात खोलवर टाकली जातायत – ती देखील आकाराने लहान आहे. “पूर्वी आम्हाला मोठे पापलेट मिळायचे, पण आता फक्त लहान घावतायत. त्यामुळे आमच्या धंद्यावर परिणाम झालाय,” भगवान यांच्या सूनबाई, ४८ वर्षीय प्रिया भांजी म्हणतात. गेली २५ वर्षं त्या मच्छी विकतायत.
इथल्या जवळ जवळ प्रत्येकाकडे मिळेनाशा झालेल्या किंवा लहान होत चाललेल्या मासळीच्या कहाण्या आहेत. या कोळीवाड्यात १,०७२ कुटुंबं राहतात आणि इथल्या ४,९४३ व्यक्ती मासेमारीत सहभागी आहेत (२०१० समुद्री मासेमारी जनगणना). आणि याची त्यांच्याकडची कारणं अगदी स्थानिक पातळीवरचं प्रदूषण ते जागतिक तापमान वाढ अशी आहेत. आणि या दोन्हीचा एकत्रित परिणाम वरसोव्यात पहायला मिळत असून वातावरणातल्या बदलांचे परिणाम शहराच्या किनाऱ्यांपर्यंत पोचल्याचंच त्यातून दिसून येतं.











