मीना रात्रभर जागी होती. पावसाचं पाणी तिच्या घरात शिरलं होतं. कुचकामी ताडपत्री पावसाच्या माऱ्यात मिनिटात खाली आली. मीना आणि तिच्या कुटुंबाने पळत जाऊन एका बंद दुकानासमोर आसरा घेतला.
“आम्ही रात्रभर तिथे बसून होतो [जुलैच्या सुरुवातीला], पाऊस थांबेपर्यंत,” ती सांगते. दुपारच्या वेळी मुख्य रस्त्याच्या कडेला एका छापील चवाळीवर ती बसलीये. शेजारी तिची दोन वर्षांची मुलगी, शमा झोपलीये.
त्या दिवशीच्या मुसळधार पावसानंतर मीना परत आलीये आणि पुन्हा एकदा तिने तिचं खोपट बांधलंय. पण तोपर्यंत त्यांचा बहुतेक संसार – भांडीकुंडी, धान्य, शाळेची पुस्तकं – वाहून गेला होता.
“मास्क पण वाहून गेले,” मीना सांगते. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात काही सेवाभावी कार्यकर्त्यांनी त्यांना हिरवे मास्क दिले होते. “मास्क घालून काय फरक होणारे?” ती म्हणते. “आम्ही मेल्यासारखेच आहोत, आम्हाला करोना झाला किंवा नाही, कुणाला फरक पडणारे”
मीना (ती आडनाव लावत नाही) आणि तिच्या कुटुंबासाठी – नवरा आणि चार लेकरं – असा संसार वाहून जाणं फार काही नवीन नाही. या वर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून असं किती तरी वेळा झालंय. दर वर्षीचीच कहाणी आहे ही – मुंबईच्या उत्तरेकडच्या कांदिवली पूर्व उपनगरातल्या फूटपाथवरचं त्यांचं खोपट मुसळधार पावसात मोडून पडतं.
पण गेल्या वर्षीपर्यंत, असा जोराचा पाऊस आला, की हे सगळे शेजारच्या बांधका सुरू असलेल्या इमारतीत सहारा घेऊ शकायचे. पण आता तसं करता येत नाही. सुमारे तिशीची असलेली मीना म्हणते, “आम्हाला पावसाची सवय आहे. पण यंदा, करोनाने सगळं अवघड झालंय. आम्ही त्या बिल्डिंगीत जायचो आणि तिथे थांबायचो. तिथला वॉचमन आम्हाला ओळखायचा. दुकानदार पण आम्हाला दुपारचं त्यांच्या दुकानाच्या बाहेर बसू द्यायचे. पण आता ते आम्हाला जवळून चालू पण देत नाहीयेत.”













