“ही यंत्रं जरा आधी आणली असती तर माझ्या लेकरांचे पापा त्यांना सोडून गेले नसते. मला आता त्यांचा काहीही उपयोग नाही, पण इतर स्त्रियांसाठी ती कामी येतील. त्यांचे पुरुष तरी नाल्यात आणि गटारांत मरणार नाहीत. मी जे भोगलंय ते कुणाच्याच वाट्याला येऊ नये.” असं म्हणत दुःखाचा आवेग सहन न होऊन राणी एकदम गप्प झाली.
गेल्या वर्षी मी पहिल्यांदा राणीला भेटले तेव्हा सफाई कर्मचारी आंदोलनाने आयोजित केलेल्या एका परिषदेला ती आली होती आणि पायऱ्यांवर बसली होती. माणसांकडून मानवी मैला सफाईच्या पद्धतीचं निर्मूलन व्हावं आणि वारंवार गटारात सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूंना आळा बसावा यासाठी ही संघटना काम करते. या कार्यक्रमादरम्यान, माणसांनी अशी सफाई करण्यास पर्याय ठरू शकणारी अनेक तांत्रिक उपाय प्रदर्शित करण्यात आले होते.
पायऱ्यांवर बसल्या बसल्याच राणीने प्लास्टिकच्या पिशवीतून एक फोटो बाहेर काढला. तिचा जोडीदार, ३० वर्षीय अनिल कुमार. आपल्या जीर्णशा सफेद ओढणीने तिने तो पुसला आणि ती अस्वस्थ झाली. सात वर्षांची लक्ष्मी आणि ११ वर्षांचा गौरव, कडेवर २.५ वर्षांची सोनम या आपल्या लेकरांना घेऊन ती पायऱ्यांवर वर खाली करू लागली.
एखाद्या स्त्रीचं घरचं एखादं कुणी जेव्हा गटारामध्ये मरण पावतं तेव्हा त्या दुःखाचा सामना करत असतानाच तिला न्याय आणि नुकसान भरपाई मिळण्यासाठी झगडावं लागतं आणि आपलं कुटुंब कसं तगून राहील याचाही घोर असतोच. राणीची परिस्थिती तर आणखीच बिकट आहे. नैऋत्य दिल्लीच्या डाबरी या वसाहतीतल्या तिच्या घरी आम्ही एकमेकींशी बरंच काही बोललो.







