१० एप्रिल २०२१. सकाळी १०.३०. हैयुल रहमान अन्सारी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर आलाय. १२.३० वाजता झारखंडच्या रांजी जिल्ह्यातल्या हातियाला जाणारी हातिया एक्सप्रेस येईल. तिची तो वाट पाहतोय. तिथे उतरून रिक्षाने बस स्टँडला जायचं आणि तिथून शेजारच्या छत्रा जिल्ह्यातल्या आपल्या गावी, असारहियाला जाणारी बस पकडायची.
या सगळ्या प्रवासाला दीड दिवस तरी लागणार.
आपल्या गाडीत चढण्यापूर्वी स्थानकाच्या एका निवांत कोपऱ्यात उभ्या असलेल्या ३३ वर्षीय रहमानने मला सांगितलं की गेल्या वर्षभरातली मुंबई सोडून गावी जाण्याची ही त्याची दुसरी वेळ आहे.
घरी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत असलेल्या रहमानला काहीच दिवसांपूर्वी त्याच्या नव्या कामावर सांगण्यात आलं होतं की कामं कमी झालीयेत. “ते म्हणाले, ‘रहमान, सॉरी. आम्ही काही तुला कामावर घेऊ शकणार नाही. काही दिवसांनी परत बघ’.” इतक्या सहज त्याची नोकरी गेली. जी अजून सुरू देखील झाली नव्हती.
दहा वर्षांपूर्वी जमशेदपूरच्या करीम सिटी कॉलेजमधून मास कम्युनिकेशन विषयात बीए केल्यानंतर रहमान मुंबईला आला होता. व्हिडिओ एडिटर म्हणून तो छोटी छोटी कामं घ्यायचा. स्वतःपुरती कमाई करून तो घरी पैसे पाठवत असे.




