“विकणार नाही हँडलूम. आयुष्य काढलंय त्याच्यावर,” घराच्या मधोमध ठेवलेल्या सात फुटी हातमागाकडे बोट दाखवत वसंत तांबे म्हणतात. “याच्यावर तुम्ही कोणत्याही प्रकारचं कापड विणू शकता,” अगदी अभिमानाने ते सांगतात.
या सागवानी मागावर तांबे एका पंधरवड्यात ६६ मीटर कापड विणतात आणि महिन्याला १३० मीटर सूत वापरतात. या कापडाचे अगदी उत्तम दर्जाचे सदरे बनतात. गेली ६० वर्षं वेगवेगळ्या मागांवर त्यांनी हेच काम केलंय – आणि आजवर त्यांनी १ लाख मीटरहून जास्त कापड विणलंय.
आणि या एक लाख मीटरची सुरुवात झाली एका नऊवारी साडीपासून. आज ८२ वय असणारे तांबे जेव्हा १८ वर्षांचे होते तेव्हा ते पहिल्यांदा रेंदाळमधल्या एका कारखान्यातल्या मागावर शिकाऊ कामगार म्हणून साडी विणण्यासाठी बसले. “आम्हाला एक महिना कारखान्यात फुकट काम करावं लागायचं,” ते सांगतात.
लवकरच तांबे चार तासात एक नऊवारी साडी विणू लागले आणि दर साडीमागे सव्वा रुपया मिळू लागला. “जास्तीत जास्त पातळं विणण्याची स्पर्धा लागायची. सर्वात जास्त म्हणजे एका आठवड्यात २१ साड्या,” तेव्हाच्या आठवणी ते सांगतात. १९६० ते ७० च्या त्या काळात त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अशी काही करामत केली की २ रुपये बोनस मिळायचा.
कारखान्यातलं हे प्रशिक्षण गरजेचं होतं कारण तांबेंच्या कुटुंबातलं इतर कुणीच विणकाम केलेलं नव्हतं. त्यांचं कुटुंब धनगर समाजाचं आहे, ज्यांची नोंद भटक्या जमातीत करण्यात येते. वसंत तांबेंचे वडील शंकर तांबे गवंडीकाम करायचे, आणि आई सोनाबाई शेतात मजुरी करून घरचं बघायची. “मला घराच्या छतावरून खाली पडायचं भ्या होतं,” तांबे सांगतात, त्यांनी गवंडी काम का केलं नाही त्याचं हे कारण. “म्हणून मी वेगळं काही तरी करण्याचा निर्णय घेतला.”
तांबे दुसरीपर्यंत शाळेत गेले आणि मग आई-वडलांना शिक्षणाचा खर्च परवडणारा नव्हता त्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली. तशाच दिशाहीन अवस्थेत ते त्यांच्या वडलांसोबत कामाला जाऊ लागले आणि कालांतराने एका सराफाकडे चांदीचं काम करू लागले. मात्र लवकरच, गावातल्या मागांचा खडखडाट ऐकून तरण्या वसंताची पावलं तिकडे वळली.
१९६० मध्ये पातळाचा दर नगाला २.५० रुपये झाला होता आणि जसं काम मिळेल तसं करत करत तांबे महिन्याला ७५ रुपयांची कमाई करत होते. या कमाईला जोड देण्यासाठी ते शेतात मजुरीदेखील करायचे. ते सांगतात १९५० च्या दशकात त्यांना रानात १० तास काम केल्यानंतर सव्वाचार रुपये मजुरी मिळायची. “१९६० मध्ये दोन रुपयाला एक किलो तांदूळ विकत घेत होतो आम्ही,” ते सांगतात आणि रानातली तूर ६२ पैसे किलोनी विकली जायची.
कारखान्यातल्या मागांवर २० वर्षं काम केल्यानंतर, १९७५ साली तांबेंनी रेंदाळमधल्याच कारखानदारांकडून दोन जुने माग प्रत्येकी १,००० रुपयांना विकत घेतले. त्यांच्या स्वतःच्या मागावर विणलेली साडी स्थानिक सहकारी हातमाग संस्थांना विकून त्यांना नगाला ३ रुपयांची कमाई होत होती.
मजुरीबद्दल बोलणं निघालं तेव्हा तांबे सांगतात, १९६४ साली एकदा कामगारांनी मजुरी वाढवण्यासाठी कारखानदारांविरुद्ध आंदोलन केलं. तेव्हा ते रेंदाळमध्ये हातमाग कामगार युनियनचे अध्यक्ष होते. “एका पातळामागे अडीच रुपये मिळायचे त्यात वाढ करावी अशी आमची मागणी होती,” ते सांगतात. ती महिने आंदोलन केल्यानंतर कारखाना मालक तयार झाले. “आम्हाला पाच पैसे दर वाढवून मिळाला,” तांबे सांगतात. आणि विणलेल्या पातळाची घडी घालायचं काम जे पूर्वी विणकरच करायचे ते आता दुसऱ्या कामगारांकडून करून घेण्यात येणार होतं. “जेव्हा कामगारांना तीन महिने मजुरी दिली जात नव्हती, तेव्हा गावच्या शेतकऱ्यांनी त्यांना घरातला माल फुकट देऊ केला होता,” ते पुढे सांगतात.
१९७० उजाडेपर्यंत यंत्रमागावरच्या स्वस्त साड्या मिळू लागल्या होत्या आणि साध्या सुती साड्यांची मागणी महाराष्ट्रात कमी होऊ लागली होती. रेंदाळच्या हातमाग विणकरांनी सुती साड्या विणण्याऐवजी सदऱ्याचं कापड विणायला सुरुवात केली.
“[आमच्या मागावरच्या] साड्या अगदी साध्या असायच्या, काही धुण्यातच त्यांची रया जायची. तसल्या साड्या कोण विकत घेणार, सांगा?” तांबे विचारतात. १९८० येईपर्यंत रेंदाळच्या कापडाला रंग चढवण्याच्या कारखान्यांना (जे बहुतकरुन कारखानदारांचेच होते) इंचलकरंजी शहरातल्या वाढत असलेल्या रंग उद्योगांचा सामना करावा लागला. रेंदाळहून १५ किलोमीटरवर असणाऱ्या इचलकरंजीतले हे कारखाने रसायनं वापरत होते ज्यामुळे कापडाला रंग चढवण्याची प्रक्रिया वेगाने होत होती.
तांबेच्या अंदाजानुसार रेंदाळमध्ये पहिला यंत्रमाग १९७० मध्ये आला. इथल्याच एका व्यापाऱ्याने मुंबईहून तो आणला होता. त्यांना स्मरतंय त्याप्रमाणे त्याची किंमत ५००० रुपये होती. लवकरच इतर काही गावकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज घेऊन मुंबई, अहमदाबाद आणि सुरतेहून यंत्रमाग खरेदी करायला सुरुवात केली. आज, एका यंत्रमागाची किंमत किमान १ लाख रुपये आहे आणि १९,६७४ इतकी लोकसंख्या (जनगणना, २०११) असणाऱ्या या मोठ्या गावामध्ये आज किमान ७००० यंत्रमाग आहेत.
२००९-१० साली झालेल्या हातमागांच्या गणनेनुसार गणतीच्या वेळी महाराष्ट्रात ४,५११ हातमाग होते आणि ३,४१८ विणकर विणकाम करत होते तर फेब्रुवारी २०१८ मधील महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या कागदपत्रांनुसार महाराष्ट्रात सध्या १३ लाख यंत्रमाग आहेत.
आणि रेंदाळमध्ये, तांबेंसकट केवळ चार विणकर त्यांच्या हातमागावर आजही विणकाम करतायत.
किती तरी काळ रेंदाळचे विणकर त्यांच्या कारखानदारांनी चालवलेल्या दोन सहकारी सोसायट्यांना कापड विकत होते – स्वयंचलित हातमाग सहकारी सोसायटी आणि हातमाग विणकर सहकारी सोसायटी. तिथून हे कापड सोलापूरच्या मोठ्या सोसायट्यांना विकलं जात असे.
पण नव्वदीचं दशक संपता संपता हातमागाच्या कापडाची मागणी घटल्यामुळे रेंदाळमधल्या या सोसायट्या बंद पडल्या. इमारतीचे दोन मजले असलेली त्यांच्या कचेऱ्या आता बंद आहेत आणि एक मजला एका खाजगी शाळेला भाड्याने दिला आहे. जवळच्या गावांमधल्या आणि शहरांतल्या इतर सहकारी सोसायट्या बंद पडू लागल्या, त्यामुळे मग विणकरांनी रेंदाळपासून २२ किलोमीटरवरच्या बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील कोगनोळी गावातल्या कर्नाटक हातमाग विकास महामंडळाच्या उप-केंद्रात कापड विकायला सुरुवात केली – आणि आजही ती तशीच चालू आहे.
या महामंडळाकडून तांबे आणि रेंदाळच्या इतर तीन विणकरांना ३१ किलो वजनाचा यार्नबीम दिला जातो, त्याला २४० मीटर सूत किंवा पॉलिस्टर धागा गुंडाळलेला असतो. याशिवाय ५ किलो सुताचा बिंडाही दिला जातो. “[या सुताचा वापर करून] मी जे कापड विणतो ते उत्तम दर्जाचं असतं [ज्यात धाग्यांची संख्या जास्त असते] आणि मला मीटरमागे २८ रुपये मिळतात,” तांबे सांगतात. “इतर विणकरांना यापेक्षा कमी पैसे मिळतात [सुमारे १९ रुपये].” हातमागावर कापड विणण्याच्या कामातून तांबे यांची महिन्याला रु. ३००० ते रु. ४००० इतकी कमाई होते. जोडीला आपल्या एक एकर रानात उसाची लागवड करून त्यातून काही पैसा येतो.
“हातमाग चालवायचा म्हणजे अंगमेहनतीचं काम आहे. आणि बहुतेक लोकांना ते करायचं नाहीये. यंत्रमागाचं कसंय, तुम्हाला फक्त यंत्र चालवायला लागतं,” तांबे म्हणतात. “याच्या जोडीला दुसरा व्यवसाय हवा. इतक्या कमी कमाईत घर चालतंय का?”
तांबेंच्या पत्नी विमल हातमाग चालवायला शिकल्या नाहीत. रेंदाळमध्ये केवळ पुरुषच मागावर काम करतात. आणि बाया चरख्यासारख्या एका यंत्राचा वापर करून बाण्याचे धागे गोल रिळावर गुंडाळण्याचं काम करतात. (२००९-२०१० च्या भारतीय हातमाग गणतीनुसार देशातल्या ३८ लाख ४७ हजार प्रौढ विणकर आणि संलग्न कामगारांपैकी ७७ टक्के स्त्रिया आहेत आणि २३ टक्के पुरुष). “मला चिक्कार घरकाम असायचं आणि हाताने सूत गुंडाळाया लागायचं,” त्या हातमाग का चालवत नाहीत या प्रश्नावर विमलताई सांगतात. त्या शेतात मजुरीही करायच्या मात्र दहा एक वर्षांपूर्वी त्यांनी वय झाल्यामुळे ते काम थांबवलंय.
विमलताईंना २५ रिळं भरायला सुमारे तीन तास लागतात आणि त्यांचे पती वसंत यांना एक मीटर कापड विणण्यासाठी तीन रिळं लागतात. पूर्वी त्या जमिनीवर बसून हे काम करायच्या, मात्र गेल्या वर्षी एका अपघातात त्यांचा पाय मोडला तेव्हापासून त्या खुर्चीवर बसून काम करतात.
तांबे दांपत्याची दोघं मुलं लहानपणीच वारली. एक मुलगी आहे, ती शिवणकाम करते. १९८० मध्येच तांबेनी त्यांच्याकडचा दुसरा माग मोडून त्यापासून दरवाज्याची चौकट तयार केली होती. या दरवाज्यातून आपण ज्या दुनियेत प्रवेश करतो तिचा रंग मात्र फिटून विटून गेलाय.
अनुवादः मेधा काळे