दररोज सकाळी, हिमांशी कुबल शर्ट आणि टी-शर्ट अंगावर चढवते आणि आपल्या पतीसोबत त्यांची लहानशी नाव समुद्रात घालते. आणि संध्याकाळी रंगीत साडी नेसून, केसात अबोली माळून ती बाजारात मासे साफ करून कापून देते.
आता तिशीत असलेली हिमांशी अगदी लहान असल्यापासून मासेमारी करतीये. सुरुवातीला मालवण तालुक्यातल्या नद्या आणि खाड्यांमध्ये आणि तीन वर्षांपूर्वी त्यांनी नाव विकत घेतली तेव्हापासून नवऱ्यासोबत अरबी समुद्रात ती मासे धरतीये. मालवणच्या दांडीच्या किनाऱ्यावर अगदी चपळाईने जाळं टाकू शकणाऱ्या मोजक्याच महिला मच्छीमार आहेत त्यातल्या त्या एक. या तालुक्याच्या १,११,८०७ लोकसंख्येपैकी १०,६३५ रहिवासी मासेमारीत गुंतलेले आहेत.
“मी माझ्या नवऱ्यासोबत इतर बोटींवर माशाची छाटणी करण्याचं काम करायचे,” ती सांगते. “पण तीन वर्षांपूर्वी आमची स्वतःची छोटी [इंजिन नसलेली नाव] बोट विकत घेण्याइतके पैसे जमले, आणि मग तेव्हापासून आम्ही एकत्र मासे धरायला जातो.”
जवळच, लिलावाचा आवाज येतो, “तीनशे, तीनशे दहा, तीनशे वीस!” अनेक मच्छीमार त्यांच्या बोटींमधून मासळीने भरलेले क्रेट समुद्रकिनाऱ्यावर मांडून ठेवतायत. व्यापारी आणि दलाल सगळ्यात चांगला बाजार व्हावा म्हणून या गर्दीतून वाट काढत सौदे करतायत. भटकी कुत्री, मांजरं आणि पक्षीही त्यांचा वाटा पळवतायत.
“शक्यतो, आम्ही रोज सकाळी मासे धरायला जातो.” हिमांशी सांगते. “पण जर हवा खराब असेल किंवा इतर काही कारणांनी जर आम्ही दर्यावर गेलो नाही, तर मग आम्ही बाजारात मासे कापायला आणि साफ करायला जातो. आणि रोज संध्याकाळी लिलावाला तर आम्ही आम्ही हजेरी लावतोच.”
खरं तर भारतभरात मासे धरायचं काम पुरुष करतात आणि धंद्यातल्या बाकी सगळ्या गोष्टी, म्हणजे मासेविक्री, त्याची सगळी उस्तवार हिमांशीसारख्या बाया करतात. देशभरात मासे धरून आणल्यानंतरच्या कामात गुंतलेल्या कामगारांपैकी ६६.७ टक्के स्त्रिया आहेत आणि या व्यवसायाचा अविभाज्य भाग आहेत. २०१० साली झालेल्या समुद्री मत्स्यव्यवसाय गणनेच्या नोंदी दाखवतात की मासे धरल्यानंतरच्या कामात (प्रत्यक्ष मासेमारी वगळता अन्य सगळी कामं) तब्बल ४ लाख स्त्रियांचा समावेश आहे. शिवाय, मत्स्यशेतीसाठी ‘मत्स्य बीज’ (अंडी) गोळा करण्याच्या कामात जवळपास ४०,००० स्त्रिया गुंतलेल्या आहेत.
“हे दमवणारं काम आहे – मासे खरेदी करायचे, लादून न्यायचे, बर्फात घालून साठवायचे आणि मग कापून विकायचे. आणि हे सगळं आम्ही आमच्या जोरावर करतो,” जुअनिता सांगतात (पूर्ण नाव नोंदवलेलं नाही). मासे व्यापारी असणाऱ्या, विधवा जुअनिता दांडीच्या किनाऱ्यावरच्या त्यांच्या सिमेंट-विटांच्या एका खोलीच्या घरात बसल्या आहेत. लिलावात केलेल्या खरेदीच्या पावत्या भिंतीला लटकवलेल्या एका तारेत अडकवून ठेवल्या आहेत.

















