अमरोहाहून दिल्लीला जाणाऱ्या, सकाळी लवकर निघणाऱ्या काशी विश्वनाथ एक्सप्रेसमध्ये ऐनुल बसली तेव्हा तिच्या मनात शंकांचं वादळ उठलं होतं. “मी घाबरले होते. माझ्या मनात एकच विचार येत होता, मी बंबईला निघालीये. मी इथनं खूप लांब चाललीये. तिथले लोक कसे वागतील माझ्याशी? मला कसं जमेल सगळं?” या चिंतेने महिलांसाठीच्या जनरल डब्यात बसलेल्या या १७ वर्षांच्या ऐनुलचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही.
तिचे सासरे अलीम त्याच गाडीने प्रवास करत होते. दिल्लीहून त्या दोघांनी दुसरी गाडी पकडली आणि ते बांद्रा टर्मिनसवर उतरले. मग त्यांनी ऐनुलला माहिमच्या नयी बस्ती या वस्तीतल्या तिच्या नव्या घरी नेलं. आणि मग स्वतः मखदूम अली माहिमी दर्ग्याच्या बाहेर भीक मागायच्या त्यांच्या कामावर गेले.
तीन वर्षांनी ऐनुल शेखलादेखील काही काळासाठी हे काम करावं लागलं. तिचा १८ महिन्याचा मुलगा मध्य मुंबईतल्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये अनेक आठवडे दाखल होता, कसल्या आजाराने ते काही ऐनुलला माहित नाही. त्याचा खर्च भागवण्यासाठी हे काम तिच्या कामी आलं. “मला [दवाखान्याचे पैसे देण्यासाठी] कुणाकडूनच कर्ज मिळत नव्हतं कारण ते कोण फेडणार ना?”
मुंबईच्या गाडीत बसल्यावर तिच्या मनाला लागलेली चिंता काही बिनबुडाची नव्हती.
त्या दिवशी गाडीत ऐनुलजवळ फक्त एक कापडी पिशवी होती ज्यात तिचे काही कपडे होते. आपल्या सासरी नेण्यासाठी एक एक करत जमा केलेली सगळी भांडीकुंडी आतापर्यंत विकली गेली होती. लहानपणापासून तिने अपार कष्ट केले होते – लोकांच्या घरी धुणी-भांडी, केर फरशी करायची, रानात मजुरी करायची. “बदल्यात मला खायला मिळायचं किंवा थोडे पैसे. मग मी ते पैसे डब्ब्यात साठवून ठेवायची. असं करत करत माझ्या लग्नापुरते पैसे मी जमा केले होते. मला वाटतं, मी ५००० रुपये तरी जमा केलेच असणार. मग त्यातले थोडे पैसे घेऊन मी दुकानात जायची आणि पितळी वाट्या, थाळ्या, डाव असं काही विकत घ्यायची, अगदी तांब्याची डेकचीसुद्धा घेतली होती मी.”







