पल्लवी गावित, पाच महिन्यांची गरोदर होती. असह्य वेदना सहन करत ती तीन तास खाटेवर पडून होती. तिचं गर्भाशय योनिमार्गातून खाली आलं, आत पाच महिन्यांचं मृत अर्भक होतं. हे सगळं झालं तेव्हा तिची नणंद सपना गरेल तिच्यापाशीच होती. वेदना सहन झाल्या नाहीत, अंगावरून रक्त जायला लागलं आणि पल्लवीची शुद्ध हरपली.

२५ जुलै २०१९. पहाटे ३ वाजले होते. सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या हेंगलापाणी पाड्यातल्या पल्लवीच्या कुडाच्या घरावर मुसळधार पाऊस कोसळत होता. महाराष्ट्राच्या वायव्येला असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातला या ५५ भिल्ल आदिवासींच्या पाड्यावर ना पक्का रस्ता, ना मोबाइलची सेवा. “संकटं काय आवतन देऊन येत नाहीत. ती कधी पण येऊन गाठतात,” पल्लवीचा नवरा गिरीश सांगतो. (या कहाणीतली सगळी नावं बदलली आहेत). “फोनच लागत नाहीत तर आम्ही गाडी किंवा डॉक्टरला कसं बोलवायचं?”

“मी तर हादरूनच गेलो,” ३० वर्षांचा गिरीश सांगतो. “मला फक्त तिचा जीव वाचवायचा होता.” पहाटे चार वाजता, किर्र काळोखात, मुसळधार पावसात गिरीश आणि त्याचा शेजारी बांबूला चादर बांधून केलेल्या झोळीत पल्लवीला निजवून सातपुडा पर्वताच्या निसरड्या वाटांनी १०५ किलोमीटर लांब धडगावच्या दिशेने निघाले.

हेंगलापाणी पाडा अक्राणी तालुक्याच्या तोरणमाळ ग्राम पंचायतीत येतो. तोरणमाळचं ग्रामीण रुग्णालय जास्त जवळ पडलं असतं पण रात्री-अपरात्री हा रस्ता धोक्याचा आहे. अनवाणी पायाने (चपला घातल्या तर पाय घसरतो) गिरीश आणि त्याचा शेजारी मातीत पाय रोवत कसेबसे वाट कापत होते. प्लास्टिकचा कागद पांघरलेली पल्लवी वेदनांनी तळमळत होती.

तीन तासांची चढण चढून ते तोरणमाळ घाटवाटेपर्यंत पोचले. “३० किलोमीटरची चढण आहे,” गिरीश सांगतो. तिथून १,००० रुपये भाडं देऊन त्यांनी धडगावपर्यंत जीप केली. पाच तासांचा प्रवास केल्यानंतर पल्लवीला धडगावच्या एका खाजगी दवाखान्यात दाखल केलं गेलं – ग्रामीण रुग्णालय आणखी १० किलोमीटर दूर होतं. “जो पहिला दवाखाना दिसला तिथे मी तिला नेलं. पैसे जास्त गेले, पण माझी पल्लवी वाचली तरी,” तो म्हणतो. डॉक्टरांनी ३,००० रुपये घेतले आणि दुसऱ्या दिवशी तिला घरी पाठवलं. “रक्तस्राव होऊन तिचा जीव गेला असता असं ते म्हणाले,” गिरीश सांगतो.

In the dark and in pelting rain, Girish (also in the photo on the left is the ASHA worker), and a neighbour carried Pallavi on a makeshift stretcher up the slushy Satpuda hills
PHOTO • Zishaan A Latif
In the dark and in pelting rain, Girish (also in the photo on the left is the ASHA worker), and a neighbour carried Pallavi on a makeshift stretcher up the slushy Satpuda hills
PHOTO • Zishaan A Latif

अंधारात आणि मुसळधार पावसात गिरीश (फोटोत डावीकडे आशा कार्यकर्ती देखील आहे), आणि एका शेजाऱ्याने पल्लवीला बांबूच्या झोळीत घातलं आणि सातपुड्याच्या निसरड्या वाटेने दवाखान्यात नेलं

इतके महिने झाले तरी पल्लवीचा त्रास आणि वेदना थांबल्या नाहीत. “काही पण जड उचललं किंवा खाली वाकलं की माझी काट योनीतून खाली येते,” ती सांगते. पल्लवी २३ वर्षांची असून तिला एक वर्षाची मुलगी आहे, खुशी. हेंगलापाणी पाड्यावर काम करणाऱ्या आशा कार्यकर्तीच्या मदतीने खुशीचा जन्म घरीच झाला होता. आता मात्र पल्लवीचं अंग खाली सरकलंय आणि त्यावर उपचार झाले नाहीयेत त्यामुळे आपल्या एक वर्षाच्या बाळाची काळजी घेणं तिला अवघड जातंय.

“खुशीला अंघोळ घालायची, खाऊ घालायचं, दिवसातून किती तरी वेळा उचलून घ्यायचं, तिच्या संगं खेळायचं,” पल्लवी मला सांगते. “इतकी सगळी हालचाल झाली की मग पोटात आग पडते, छातीत जळजळतं आणि उठायला, बसायला त्रास होतो.”

गिरीश त्यांच्या दोन गायी चरायला घेऊन जातो, पल्लवीला रोज डोंगराखालच्या झऱ्यातून पाणी भरून आणावं लागतं.  “दोन किलोमीटर उतरून जावं लागतं. फक्त तिथंच पाणी मिळतं,” ती सांगते. एप्रिल-मे पर्यंत तो झराही सुकून जातो. आणि मग पल्लवी आणि तिच्या पाड्यावरच्या इतर बायांना पाण्याच्या शोधात आणखी खाली उतरून जावं लागतं.

खरिपात ती आणि गिरीश त्यांच्या दोन एकरावर ज्वारी आणि मका पेरतात. असल्या डोंगराळ जमिनीत उतारा जास्त पडत नाही, गिरीश सांगतो. “आम्हाला चार-पाच क्विंटल धान्य होतं, त्यातलं १-२ क्विंटल तोरणमाळच्या किराणा दुकानात १५ रु किलोनं जातं.” पिकाची कापणी झाली की गिरीश शेजारच्या गुजरातेतल्या नवसारी जिल्ह्यात ऊसतोडीला जातो. वर्षातले किमान १५० दिवस गिरीशला कसं तरी करून २५० रुपये रोजाने काम मिळतं.

घरचं आणि रानातलं सगळं काम केल्यानंतर जवळच्या – म्हणजे ३५ किलोमीटर लांब असलेल्या जापी गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचं त्राण काही पल्लवीमध्ये उरत नाही. मग अंगात ताप असो, चक्कर येवो किंवा कधी कधी तर शुद्ध हरपते तरीही. ती सांगते की आशा कार्यकर्ती तिला थोडी औषधं देते. “मला डॉक्टरकडे जायचंय, पण कशी जाणार? मी लई अशक्त झालीये,” ती सांगते. अंग बाहेर आलं असताना डोंगरदऱ्यांतून चालत जाणं तिच्यासाठी अशक्यप्राय आहे.

'I have to bathe Khushi, feed her, lift her several times a day, play with her', says Pallavi Gavit. 'With a lot of physical activity, sometimes I have a burning sensation in my stomach, pain in the chest, and difficulty sitting and getting up'
PHOTO • Zishaan A Latif
'I have to bathe Khushi, feed her, lift her several times a day, play with her', says Pallavi Gavit. 'With a lot of physical activity, sometimes I have a burning sensation in my stomach, pain in the chest, and difficulty sitting and getting up'
PHOTO • Zishaan A Latif

खुशीला अंघोळ घालायची, खाऊ घालायचं, दिवसातून किती तरी वेळा उचलून घ्यायचं, तिच्या संगं खेळायचं, पल्लवी गावित सांगते. इतकी सगळी हालचाल झाली की मग पोटात आग पडते, छातीत जळजळतं आणि उठायला, बसायला त्रास होतो

तोरणमाळ ग्राम पंचायतीची लोकसंख्या १४ गावं आणि ६० पाडे मिळून (ग्राम पंचायत सदस्याच्या अंदाजानुसार) सुमारे २०,००० इतकी आहे. या लोकसंख्येला आरोग्य सेवा देण्यासाठी जापीमध्ये एक आरोग्य केंद्र, सहा उप-केंद्रं आणि तोरणमाळ जुने गावात एक ग्रामीण रुग्णालय आहे. इथे निरोध, गर्भनिरोधक गोळ्यांचं वाटप, नसबंदी आणि तांबी बसवणे अशा गर्भनिरोधनविषयक सेवा तसंच गरोदरपण आणि प्रसूतीपश्चात सेवाही दिल्या जातात. पण इथले पाडे इतके दुर्गम भागात आहेत की बहुतेक स्त्रिया घरीच बाळंतपणं करतात.

“तोरणमाळमध्ये अडलेल्या बाळंतपणांचं प्रमाण बरंच जास्त आहे कारण या आदिवासी बाया डोंगरमाथ्यावर राहतात आणि अगदी गरोदरपणातही त्यांना दिवसांतून अनेक वेळा पाणी भरून आणण्यासाठी डोंगर चढावा-उतरावा लागतो. त्यामुळे मग गुंतागुंत निर्माण होते आणि वेळेआधी बाळंतपणं होतात,” जापीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातले एक डॉक्टर सांगतात. त्यांनी आपलं नाव सांगितलं नाही. २०१६ सालीच हे आरोग्य केंद्र सुरू करण्यात आलंय. इथे दोन डॉक्टर, दोन नर्स आणि एक वॉर्ड मदतनीस असे कर्मचारी असले तरी दिवसातून केवळ चार-पाच रुग्णच इथे येतात. “परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली किंवा भगताचे सगळे उपाय थकले की मग लोक आमच्याकडे येणार,” ते म्हणतात.

एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या काळात डॉक्टरांनी अडलेल्या बाळंतपणाच्या पाच केसेस पाहिल्या आहेत. “सगळ्यांना शस्त्रक्रिया केल्यावाचून पर्याय नव्हता. त्यामुळे आम्ही त्यांना नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात पाठवलं. इथे अवघड बाळंतपणं करण्यासाठीच्या सुविधा नाहीत,” ते सांगतात.

गर्भाशय योनीतून बाहेर येतं कारण त्याला आधार देणारे कटिर पोकळीतले स्नायू आणि तंतु ताणले जातात आणि कमजोर होतात. “गर्भाशय स्नायूंनी बनलेलं असतं आणि ते विविध प्रकारच्या इतर स्नायू, पेशी आणि तंतूंनी कटिर पोकळीत एका जागी बांधलेलं असतं,” डॉ. कोमल चव्हाण सांगतात. त्या प्रसूती व स्त्रीरोग संघटनांच्या महासंघाच्या (फॉग्सी) अध्यक्ष आहेत. “गरोदरपण, अनेक बाळंतपणं, अडलेली-जास्त काळ लांबलेली बाळंतपणं किंवा चुकीच्या पद्धतीने प्रसूती केल्यामुळे देखील काही स्त्रियांमध्ये हे स्नायू कमजोर होतात आणि मग गर्भाशय बाहेर येतं.” हे स्नायू पूर्ववत करण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी रिकन्स्ट्रक्शन सर्जरी – पुनर्रचना शस्त्रक्रिया किंवा गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागते, ज्यामध्ये स्त्रीच्या शरीरातील प्रजनन अवयव काढून टाकले जातात. स्त्रीचं वय आणि समस्या किती गुंतागुंतीची आहे त्यावर हा निर्णय घेतला जातो.

२००६-०७ साली नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रसूतीसंबंधी किचकट आजारपणांविषयी एक अभ्यास करण्यात आला ज्याचे निष्कर्ष २०१५ साली इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च या मासिकात प्रसिद्ध झाले. या अभ्यासानुसार, अशी समस्या असणाऱ्या १३६ स्त्रियांमध्ये सर्वात जास्त प्रमाण योनीतून गर्भाशय बाहेर येण्याचं होतं (६२ टक्के). सोबत जास्त वय आणि स्थूलता या कारणांसोबतच, “जास्त बाळंतपणं आणि दाई किंवा सुइणीने केलेलं बाळंतपण हे घटकही अंग बाहेर येण्यासाठी कारणीभूत आहेत,” असं हा अभ्यास नोंदवतो.

Pallavi and Girish are agricultural labourers in Nandurbar; Pallavi's untreated uterine prolapse makes it hard for her to take care of their daughter
PHOTO • Zishaan A Latif
Pallavi and Girish are agricultural labourers in Nandurbar; Pallavi's untreated uterine prolapse makes it hard for her to take care of their daughter
PHOTO • Zishaan A Latif

पल्लवी आणि गिरीश नंदुरबारमध्ये शेतमजुरी करतात, पल्लवीचं अंग बाहेर येत असल्यामुळे तिला तिच्या लहान लेकीची काळजी घेणं जड जातंय

नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात पल्लवीच्या समस्येसाठी मोफत शस्त्रक्रिया होऊ शकते. पण हे रुग्णालय तिच्या हेंगलापानी पाड्यापासून १५० किलोमीटर लांब आहे. तिथे पोचायचं म्हणजे तीन तास डोंगराची चढण चढून जायचं आणि तिथून पुढे चार तास बसचा प्रवास. “मी बसले की असं वाटतं, मी कशावर तर बसलीये आणि दुखायला लागतं,” पल्लवी सांगते. “मी एका जागी जास्त वेळ बसू शकत नाही.” या मार्गावर राज्य परिवहन मंडळाची एकच गाडी धावते, तोरणमाळहून दुपारी १ वाजता. “डॉक्टरच इथे नाय येऊ शकत का?”

रस्तेच नाहीत त्यामुळे तोरणमाळमधल्या रुग्णांना दुर्गम भागात फिरत्या दवाखान्यात मिळणारी सेवा देखील मिळत नसल्याचं डॉक्टर नमूद करतात. अक्राणी तालुक्यातली ३१ गावं आणि त्याहून किती तरी जास्त पाडे रस्त्याने जोडलेलेच नाहीत. महाराष्ट्र शासनाच्या नवसंजीवनी योजनेअंतर्गत दुर्गम भागातल्या गावांमध्ये फिरते दवाखाने चालतात ज्यामध्ये एक डॉक्टर, एक नर्स गावोगावी जातात. अक्राणी तालुक्यात अशा दोन गाड्या आहेत असं महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वार्षिक आदिवासी उपयोजना अहवाल २०१८-१९ मधून कळतं. पण हे दवाखाने देखील पल्लवी राहते तशा पाड्यांपर्यंत पोचू शकत नाहीत.

जापी प्राथमिक आरोग्य केंद्रातही “वीज नाही, पाणी नाही, ना कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय,” तिथले डॉक्टर सांगतात. “मी याबाबत आरोग्य विभागाला अनेक पत्रं लिहिली आहेत पण काहीही फरक झालेला नाही.” नंदुरबारहून रोज जापीला यायचं हे आरोग्य कर्मचाऱ्यांना शक्य नाही. “त्यामुळे आम्ही आठवड्यातले पाच दिवस इथे काम करतो, आणि आशा कार्यकर्तीच्या घरी मुक्काम करतो. शनिवार-रविवार आम्ही नंदुरबारला आमच्या घरी जातो,” डॉक्टर सांगतात.

अशा परिस्थितीत इथल्या आशा कार्यकर्त्यांची भूमिका जास्तच महत्त्वाची ठरते. पण त्यांच्यापुढेही औषधांच्या तुटवड्याची समस्या आहेच. “आमच्याकडे गरोदर बायांना द्यायला लोह आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्याही नियमितपणे येत नाहीत किंवा प्रसूतीसाठीची किट ज्यात तोंडाला बांधायचा मास्क, हातमोजे आणि कात्री येते, तेही जवळ नसतात,” हेंगलापाणीची आशा प्रवर्तक, विद्या नाईक (नाव बदललं आहे) सांगते. ती १० पाड्यांवरच्या १० आशांच्या कामावर देखरेख ठेवते.

काही आशा कार्यकर्त्यांना बाळंतपण करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे, मात्र गुंतागुंतीची प्रसूती त्या करू शकत नाहीत. दर महिन्यात घरी बाळंतपण झाल्यामुळे दोन-तीन अर्भक मृत्यू आणि एक किंवा दोन मातामृत्यू होत असल्याची नोंद विद्याकडे होते. “आम्हाला दुसरं काहीही नको – आम्हाला सुरक्षित प्रसूतीसाठी फक्त एक चांगला रस्ता हवाय,” ती म्हणते.

“लवकर उपचार व्हावेत यासाठी प्रसूतीपूर्व सेवा तर हव्यातच पण दुर्गम भौगोलिक प्रदेशांमध्ये प्रशिक्षित स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध असणं फार महत्त्वाचं आहे. कारण अशा भागांमध्ये स्त्रियांची रोजचं जिणंच तेवढं खडतर असतं,” डॉ. चव्हाण सांगतात.

With no road connectivity, patients in Toranmal have no access even to the mobile medical units that provide doorstep healthcare in remote regions
PHOTO • Zishaan A Latif
With no road connectivity, patients in Toranmal have no access even to the mobile medical units that provide doorstep healthcare in remote regions
PHOTO • Zishaan A Latif

रस्तेच नसल्यामुळे तोरणमाळमधल्या रुग्णांना दुर्गम भागात घरापर्यंत आरोग्य सेवा देणाऱ्या फिरत्या दवाखान्यांची सुविधाही मिळू शकत नाही

पण, भारत सरकारच्या ग्रामीण आरोग्य सांख्यिकी २०१८-१९ मध्ये नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रात सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये १,४५६ विशेषज्ञ – ज्यात प्रत्येक केंद्रावर एक शल्यचिकित्सक, एक स्त्रीरोग तज्ज्ञ, एक जनरल डॉक्टर आणि एक बालविकार तज्ज्ञ - अपेक्षित आहेत. ३१ मार्च २०१९ पर्यंत यातली केवळ ४८५ पदं भरण्यात आली होती, म्हणजेच एकूण ९७१ - तब्बल ६७ टक्के पदं रिक्त होती.

राष्ट्रीय कुटुंब पाहणी अहवाल – ४ ( एनएफएचएस-४ , २०१५-१६) नुसार नंदुरबारच्या ग्रामीण भागातल्या केवळ २६.५ टक्के मातांना गरोदरपणातल्या सगळ्या सेवा मिळाल्या, केवळ ५२.५ टक्के जणींनी दवाखान्यात बाळंतपण केलं आणि ज्यांचं बाळंतपण घरी झालं त्यातल्या केवळ १०.४ टक्के स्त्रियांना प्रशिक्षित आरोग्य कार्यकर्तीची मदत मिळाली.

नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे – इथे भिल्ल आणि पावरा आदिवासींची संख्या जास्त आहे. २०१२ सालच्या महाराष्ट्र मानव विकास निर्देशांकांवर हा जिल्हा सर्वात खालच्या पायरीवर आहे. कुपोषण, अर्भक आणि माता आरोग्याच्या समस्यांनी इथे गंभीर रुप धारण केलं आहे.

पल्लवीच्या घरापासून ४० किलोमीटरवर लेगापाणी पाडा आहे, तोरणमाळच्या जंगलातल्या दुसऱ्या एका डोंगरमाथ्यावर. तिथे, आपल्या अंधाऱ्या, कुडाच्या झोपडीत सारिका वसावे (नाव बदललं आहे) पळसाची पानं पाण्यात उकळत होती. “माझ्या मुलीला ताप आलाय. या पाण्यानं तिला न्हाऊ घालते. मग तिला बरं वाटेल,” भिल्ल आदिवासी असणारी ३० वर्षाची सारिका सांगते. तिला सहावा महिना लागलाय, दगडाच्या चुलीसमोर जास्त वेळ बसून राहणं तिला मुश्किल व्हायला लागलंय. “माझे डोळे चुरचुरतात. आणि तिथे [जांघेकडे बोट दाखवत] दुखतं. पाठ पण भरून येते,” ती सांगते.

थकलेली, अशक्त झालेल्या सारिकाचं अंगही बाहेर आलंय. पण तशाच स्थितीत तिला रोजची सगळी कामं करावी लागतायत. दर वेळी लघवी करताना किंवा जरा कुंथलं तर तिचं अंग खाली सरकतं आणि योनीतून खाली येतं. “मी साडीच्या काठानं ते आत ढकलते, पण लई दुखतं,” ती सांगते. धापा टाकत, चेहऱ्यावरचा घाम पुसत ती सांगते. चुलीतनं धुराचा लोट येतो आणि ती मान दुसरीकडे फिरवते.

गेली तीन वर्षं तिला अंग बाहेर येण्याचा त्रास होतोय. २०१५ साली तिला आठवा महिना चालू होता आणि अचानक रात्री एक वाजता तिला कळा सुरू झाल्या. सहा तास कळा दिल्यानंतर तिच्या सासूने तिचं बाळंपण केलं पण सारिकाचं अंग योनीतून बाहेर आलं होतं. “असं वाटलं कुणी तरी माझ्या अंगातलं काही तरी खेचून बाहेर काढलंय,” ती सांगते.

PHOTO • Zishaan A Latif

सहा महिन्यांची गरोदर सारिका वसावे पळसाची फुलं टाकून पाणी उकळतीये (खाली, उजवीकडे): ‘माझ्या मुलीला [पाच वर्षांची] ताप आलाय. या पाण्याने न्हाऊ घालते. बरं वाटेल’

“अंग बाहेर येण्याच्या समस्येवर वेळीच उपचार झाले नाहीत तर पुढे आणखी समस्या होतात, मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग, काही घासलं गेल्यास, रक्तस्राव, जंतुलागण आणि वेदना होतात आणि या सगळ्यामुळे रोजच्या हालचालींमध्येही अडचणी येतात,” डॉ. चव्हाण सांगतात. वय वाढत जातं तसं त्रास जास्तच वाढत जातो असं त्या सांगतात.

थोडं जरी अंग बाहेर येत असेल तरी बायांना जड काही उचलू नका असा सल्ला दिला जातो. सोबत जास्त चोथा असणारा, पोषक आहार आणि बद्धकोष्ठ होऊ नये म्हणून भरपूर पाणी घ्या असं सांगितलं जातं. पण सारिकाला तर दिवसभरात एक पोटभर जेवण आणि हंडाभर पाणी मिळणं मुश्किल. गरोदर असो वा नसो, तिला रोज आठ किलोमीटर डोंगर उतरून जाऊन हापशावरून पाणी भरून आणावं लागतं. चढण तर अजूनच अवघड. ती चढायला आणखी जास्त वेळ लागतो. “काट मांडीला घासते आणि आग आग होते. कधी कधी रक्तही येतं,” ती मला सांगते. घरी पोचल्याक्षणी ती बाहेर आलेलं अंग आत ढकलते.

शारीरिक वेदना तर आहेतच पण या समस्येचे सामाजिक-आर्थिक परिणामही आहेतच. अंग बाहेर आलं तर त्याचा वैवाहिक नात्यावरही परिणाम होऊ शकतो. नवऱ्याने सोडून देणं, नातं नाकारणं असंही घडतं. सारिकाच्या सोबत तेच झालं.

सारिकाचं अंग बाहेर यायला लागलं आणि तिच्या नवऱ्याने, संजयने (नाव बदललं आहे) दुसरं लग्न केलं. तो धडगावच्या एका खानावळीत काम करतो आणि दिवसाला ३०० रुपये कमावतो. महिन्याला त्याला चार-पाच दिवसच काम मिळतं. “त्याचा पैसा तो त्याच्या दुसऱ्या बायकोवर आणि पोरावर खर्च करतो,” सारिका सांगते. तो रानात क्वचितच काम करतो. त्यामुळे २०१९ च्या खरिपात सारिकाने एकटीनंच त्यांच्या दोन एकरात मक्याची पेरणी केली. “माझ्या नवऱ्याने सवतीसाठी आणि तिच्या पोरासाठी म्हणून ५० किलो मका नेली आणि बाकीची मी भाकरीसाठी दळून ठेवली.”

उत्पन्नाचा दुसरा काहीच स्रोत नाही त्यामुळे आशा कार्यकर्ती किंवा गावकरी जो काही डाळ-भात देतील त्यावरच सारिका अवलंबून आहे. कधी कधी तिला पैसे उसने घ्यावे लागतात. “[२०१९ च्या] जून महिन्यात मी गावातल्याच एकाकडून किराणा आणि बी-बियाणं आणायला ८०० रुपये उसने घेतले होते, ते परत करायचेत,” ती सांगते.

आणि कधी कधी तिचा नवरा तिला मारहाण करतो आणि जबरदस्ती संबंध ठेवतो. “माझी अशी गत झालीये [अंग बाहेर आलंय], त्याला ते आवडत नाही. म्हणून त्याने दुसरं लग्न केलं. पण मग दारू प्यायल्यावर तो येतो. मी [संभोगाच्या वेळी] कळवळून रडते, मग तो मला मारतो,” ती सांगते.

With no steady source of income, Sarika often depends on the ASHA worker and some villagers to give her rice and dal
PHOTO • Zishaan A Latif
With no steady source of income, Sarika often depends on the ASHA worker and some villagers to give her rice and dal
PHOTO • Zishaan A Latif

उत्पन्नाचा दुसरा काहीच स्रोत नाही त्यामुळे आशा कार्यकर्ती किंवा गावकरी जो काही डाळ-भात देतील त्यावरच सारिका अवलंबून आहे

मी तिला भेटले तेव्हा चुलीजवळ एका भगुल्यात शिजवलेला भात होता. ती आण तिची पाच वर्षांची मुलगी, करुणा या दोघींचं आजचं हे एवढंच जेवण. “घरात फक्त किलोभर तांदूळ उरलाय,” ती सांगते. गरिबी रेषेखालील कुटुंबासाठीच्या तिच्या शिधापत्रिकेवर तिला तीन किलो तांदूळ आणि आठ किलो गहू मिळाला होता, त्यातला हा इतकाच शिल्लक आहे. तिच्या तीन शेरडांमुळे थोडे फार पैसे हाती येतात. “एका शेळीचं एक पेलाभर दूध रोज मिळतं,” ती सांगते. ते देखील तिची मुलगी आणि सावत्र मुलगा सुधीर यांच्यात वाटलं जातं. तो त्याच्या आईबरोबर दोन किलोमीटर अंतरावर  राहतो.

तोरणमाळचं ग्रामीण रुग्णालय सारिकाच्या घरापासून १५ किलोमीटरवर आहे. आणि उप-केंद्र पाच किलोमीटरवर. काळी पिवळी येते, पण नियमित नाही. त्यामुळे तेवढं अंतर तिला चालत जावं लागतं. “मला जास्त चालवत नाही, लगेच धाप लागते,” ती सांगते. उप-केंद्रात झालेल्या गरोदरपणातल्या तपासण्यांमध्ये तिलाही सिकल सेल रक्तपांढरी असल्याचं निदर्शनास आलं होतं. या अनुवांशिक आजारात रक्तपेशींचा आकार बदलल्याने रक्तपांढरी होते.

२०१६ साली बांधलेल्या तोरणमाळच्या ग्रामीण रुग्णालयात ३० खाटा आहेत. बाह्योपचार विभागात इथे रोज ३० ते ५० रुग्ण येतात, इथले वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास पाटील सांगतात. ताप, सर्दी आणि जखमांसारख्या साध्या आजारांवर उपचारासाठी लोक इथे येतात. आसपासच्या २५ गावांमधून दर महिन्याला एक किंवा दोनच बाया बाळंतपणासाठी इथे येतात. रुग्णालयात दोन डॉक्टर, सात नर्स आहेत, एक प्रयोगशाळा आहे (पण तंत्रज्ञ नाही) आणि एक मदतनीस आहे. प्रसूती आणि स्त्री रोगतज्ज्ञ किंवा सारिकासारख्या गंभीर समस्येवर उपचार करण्यासाठी विशेषज्ञाची इथे जागाच नाहीये.

“आमच्याकडे गर्भाशय बाहेर येण्याच्या केसेस येत नाहीत. बहुतेक केसेस अंगावरून रक्तस्राव किंवा सिकल सेलच्या येतात. आणि अशा केसेस आल्या तरी त्यावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या सुविधा किंवा विशेषज्ञ आमच्याकडे नाहीत,” डॉ. पाटील सांगतात. २०१६ सालापासून ते इथे कार्यरत आहेत आणि इथल्याच कर्मचारी निवासात राहतात.

त्यांच्याकडे अगदी सगळ्या सोयी असत्या तरीही सारिकाने त्यांना अंग बाहेर येतंय हे सांगितलं असतंच असं नाही. “बाप्या डॉक्टर आहे. माझी काट खाली येतीये हे त्यांना कसं सांगायचं?” ती विचारते.


शीर्षक चित्रः प्रियांका बोरार नव माध्यमांतील कलावंत असून नवनवे अर्थ आणि अभिव्यक्तीच्या शोधात ती तंत्रज्ञानाचे विविध प्रयोग करते. काही शिकता यावं किंवा खेळ म्हणून ती विविध प्रयोग करते , संवादी माध्यमांमध्ये संचार करते आणि पारंपरिक कागद आणि लेखणीतही ती तितकीच सहज रमते.

छायाचित्रं – झिशान लतीफ मुंबई स्थित मुक्त छायाचित्रकार आणि चित्रपटकर्ते आहेत. त्यांचं काम जगभरातल्या अनेक संग्रह, प्रदर्शनं आणि प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध झालं आहेः https://zishaanalatif.com/

पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे ? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा

अनुवाद: मेधा काळे

Jyoti

ଜ୍ୟୋତି ପିପୁଲ୍‌ସ ଆର୍କାଇଭ ଅଫ୍‌ ରୁରାଲ ଇଣ୍ଡିଆର ଜଣେ ବରିଷ୍ଠ ସାମ୍ବାଦିକ ଏବଂ ପୂର୍ବରୁ ସେ ‘ମି ମରାଠୀ’ ଏବଂ ‘ମହାରାଷ୍ଟ୍ର1’ ଭଳି ନ୍ୟୁଜ୍‌ ଚ୍ୟାନେଲରେ କାମ କରିଛନ୍ତି ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ Jyoti
Illustration : Priyanka Borar

ପ୍ରିୟଙ୍କା ବୋରାର ହେଉଛନ୍ତି ଜଣେ ନ୍ୟୁ ମିଡିଆ କଳାକାର ଯିଏ ନୂତନ ଅର୍ଥ ଓ ଅଭିବ୍ୟକ୍ତି ଆବିଷ୍କାର କରିବା ପାଇଁ ବିଭିନ୍ନ ଟେକ୍ନୋଲୋଜି ପ୍ରୟୋଗ ସମ୍ବନ୍ଧିତ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତି। ସେ ଶିକ୍ଷାଲାଭ ଓ ଖେଳ ପାଇଁ ବିଭିନ୍ନ ଅନୁଭୂତି ଡିଜାଇନ୍‌ କରିବାକୁ ଭଲ ପାଆନ୍ତି। ସେ ଇଣ୍ଟରଆକ୍ଟିଭ୍‌ ମିଡିଆରେ କାମ କରିବାକୁ ଯେତେ ଭଲ ପାଆନ୍ତି ପାରମ୍ପରିକ କଲମ ଓ କାଗଜରେ ମଧ୍ୟ ସେତିକି ସହଜତା ସହିତ କାମ କରିପାରନ୍ତି।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ Priyanka Borar
Series Editor : Sharmila Joshi

ଶର୍ମିଳା ଯୋଶୀ ପିପୁଲ୍ସ ଆର୍କାଇଭ୍‌ ଅଫ୍‌ ରୁରାଲ ଇଣ୍ଡିଆର ପୂର୍ବତନ କାର୍ଯ୍ୟନିର୍ବାହୀ ସମ୍ପାଦିକା ଏବଂ ଜଣେ ଲେଖିକା ଓ ସାମୟିକ ଶିକ୍ଷୟିତ୍ରୀ

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ଶର୍ମିଲା ଯୋଶୀ
Translator : Medha Kale

ମେଧା କାଲେ ପୁନେରେ ରହନ୍ତି ଏବଂ ମହିଳା ଓ ସ୍ଵାସ୍ଥ୍ୟ କ୍ଷେତ୍ରରେ କାମ କରିଛନ୍ତି । ସେ ମଧ୍ୟ PARIର ଜଣେ ଅନୁବାଦକ ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ମେଧା କାଲେ