कधी काळी तो या राजाचं दुसरं मन होता. त्याचा सवंगडी आणि सल्लागार. प्रेमाच्या, खाण्याचपिण्याच्या गप्पा चालत त्यांच्या. आणि तो दरबाराचा आत्मा होता. मग आता त्याच्या हातून असं काय पातक घडलं? आणि कधी? तुरुंगाच्या काळकोठडीत विदूषक राजाशी आपलं काय बिनसलं त्याचा धांडोळा घेण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. महामहिम राजेसाहेबांना नक्की काय खुपलं बरं? त्यांनी किमान काय ते सांगायला पाहिजे का नको? आता इतका दुरावा आला का? आपल्या नशिबाच्या या फेऱ्यावर त्याला हसू देखील येत नव्हतं.
पण देशाच्या राजधानीची हवा फार वेगात पालटलीये. प्लेटोचं रिपब्लिक असो, ओशनिया किंवा भारत, काही फरक पडत नाही. एकच गोष्ट चालते, ती म्हणजे राजाचं फर्मान. कुठेही, कुणीही आणि कसंही हसता कामा नये. प्रहसन, विडंबन, विनोद, हास्यचित्रं किंवा वात्रटिका आणि शाब्दिक चातुर्य असलेल्या कशालाही परवानगी नाही म्हणजे नाही.
काही मोजक्या देवांचा आणि देशप्रेमी नायकांचा उदोउदो करणाऱ्या महाकाव्यांना (हास्यपोलिसांनी तपासून प्रमाणित केलेल्या) आणि राज्याने प्रायजित केलेले इतिहास आणि खऱ्याखुऱ्या नेत्यांची आत्मचरित्रं तेवढी वाचली जावीत. मनाला उत्फुल्ल करणारं किंवा रोमांचित करणारं असं काहीही खपवून घेतलं जाणार नाही. हसणं हा मूर्खांचा खेळ आहे – न्यायालयं, संसदेची सभागृहं, नाट्यगृहं, पुस्तकं, टीव्ही, छायाचित्रं, अगदी मुलांच्या चेहऱ्यावरही हास्य उमटता नये...



