‘जब प्यार किया तो डरना क्या… प्यार किया कोई चोरी नही की… घुट घुट कर यूं मरना क्या…’
साठच्या दशकात आलेल्या ‘मुघल-ए-आझम’मधलं हे गाणं विधी बराच वेळ गुणगुणत असते. मध्य मुंबईत नव्यानेच भाड्याने घेतलेल्या खोलीत आम्ही बसलोय. गाणं मधेच थांबवत ती म्हणते, ‘‘आम्ही तरी कुठे गुन्हा केलाय! मग असं भीत भीत का जगायचं?’’
प्रश्नाचं उत्तर तिला नकोच असतं, पण आपल्याला मात्र तो सलत राहातो, टोचत राहातो. आपल्याला कोणीतरी मारून टाकेल, ही तिची भीती शब्दशः खरी असते आणि गेली काही वर्षं हीच भीती सोबत घेऊन ती जगत असते. या भीतीचं कारणही तसंच असतं. विधी आपल्या कुटुंबाविरोधात बंड करून आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर, म्हणजेच शाळेतली मैत्रीण असलेल्या आरुषीबरोबर पळून गेलेली असते. दोघी एकमेकींवर प्रेम करतायत आणि त्यांना लग्न करायचंय. पण त्यांना एकत्र येण्यासाठीचा कायदेशीर रस्ता खूप दूरचा आहे, थकवणारा आहे, पावलोपावली नवी आव्हानं समोर ठेवणारा आहे. दोघींना भीती वाटतेय की, त्यांची कुटुंबं त्यांचं हे नातं मान्यच करणार नाहीत, समजून घेणार नाहीत. आरुषीचा जन्म झाला तो मुलगी म्हणून. पण आपण मुलगी नाही, असं तिला अगदी आतून, प्रकर्षाने वाटतंय आणि तिचा हा झगडा त्यांच्या घरच्यांना समजणं शक्यच नाही. आरुषी आता पारलिंगी (ट्रान्सजेंडर) पुरुष आहे आणि ती आता आपलं नाव ‘आरुष’ असं लावते.
महानगरात आल्यामुळे कुटुंबापासून सुटका होईल आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, असं विधी आणि आरुषीला वाटत होतं. विधीचं कुटुंब ठाणे जिल्ह्यातल्या एका गावात राहातं आणि आरुषचं कुटुंब विधीच्या गावापासून वीसेक किलोमीटरवर, पालघर जिल्ह्यातल्या एका गावात. २२ वर्षाची विधी आगरी आहे, तर २३ वर्षांचा आरुष कुणबी. महाराष्ट्रात आगरी आणि कुणबी, दोन्ही समाजांचा इतर मागासवर्गीयात समावेश आहे, पण त्यांच्या गावांमधल्या जातीच्या उतरंडीत कुणबी सामाजिक दृष्ट्या आगर्यांच्या ‘खालचे’ आहेत.
आपापली घरं सोडून दोघं मुंबईत आले, त्याला आता वर्ष झालं. गावाला परत जायचा विचारही करत नाहीयेत ते. आपलं गाव, कुटुंब याविषयी आरुष खूपच कमी बोलतो. ‘‘मी कच्च्या घरात राहायचो. मला अज्जिबात आवडायचं नाही ते. आईशी कितीतरी वेळा भांडायचो मी त्यावरून,’’ तो सांगतो.












